२०२२ पर्यंत भारताचा GDP ९.३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा मुडीजचा अंदाज

indias gdp to grow 9.3 percent in fy 2021 2022 moodys investor service
२०२२ पर्यंत भारताचा जीडीपी ९.३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा मुडीजचा अंदाज

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबगाईला आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यात सतत सुधारणा होत आहे. अशातच रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने आपल्या अहवालात २०२२ मध्ये भारताचा आर्थिक विकास वेगाने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२० मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी घसरली असतानाच मूडीज रेटिंग एजन्सीने आर्थिक वर्ष २०२१ -२२ (FY22) मध्ये भारताचा GDP ९.३ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर आर्थिक वर्ष २०२२-२३ (FY23) मध्ये देशाचा GDP हा ७.९ टक्क्यांवर पोहचणार असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, भारतात कोरोना लसीकरणाच्या वाढत्या वेगामुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचा वेग वाढला

मूडीजच्या विश्लेषक श्वेता पटोदिया यांनी सांगितले की, भारतातील कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला वेग आल्याने देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळत आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारताने अलीकडेच विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य गाठले. त्यामुळे भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण मोहिमेचा वेग वाढतोय. मूडीजने म्हटले आहे की, जर देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागला तर कंज्यूमर सेंटिमेंटमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक घडामोडी आणि ग्राहकांच्या मागणीवर मोठा फटका बसेल.

जीडीपी वाढीचा अंदाज ९.५ टक्क्यांवर- आरबीआय

विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा अंदाज ९.५ टक्के ठेवला आहे, तर सरासरी अंदाज ८.५ ते १० टक्के आहे. सरकारचा अंदाज १० टक्के इतका आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या जून तिमाहीत GDP चा दर २०.१ टक्क्यांनी वाढला.