घरदेश-विदेशकिमान समान कार्यक्रमाची श्रेष्ठींकडून आठवण

किमान समान कार्यक्रमाची श्रेष्ठींकडून आठवण

Subscribe

काँग्रेस बैठकीत सेना-राष्ट्रवादीविरोधी सूर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमाची आठवण ठेवा, अशा सूचना काँग्रेस श्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेस आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सरकारमध्ये राहायचे असल्यास धार्मिक अजेंडा राबवता येणार नाही, अशा सूचनाही श्रेष्ठींनी मंत्र्यांना दिल्याची माहिती एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.

महाविकास आघाडी सरकार हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून बनवण्यात आले आहे. सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना-राष्ट्रवादीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या तक्रारी आहेत. निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे काँग्रेसचे मंत्री खासगीत सांगायचे. ही बाब या मंत्र्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनात आणल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस मंत्र्यांच्या निर्णयाबाबतही आखडते घेतले जात असल्याची तक्रार मंत्र्यांनी केल्यावर सरकारमध्ये राहायचे असल्यास किमान समान कार्यक्रम राबवावा लागेल, असे श्रेष्ठींनी सांगिलतल्याचे या मंत्र्याने म्हटले. सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्व हवे असेल तर कट्टरता आणि धार्मिक अजेंडा राबवता येणार नाही, अशा सूचना पक्ष श्रेष्ठींनी मंत्र्यांना केल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष कोण असावा, यासंबंधी मंत्र्यांची मते जाणून घेण्यात आली. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेे. सरकारमध्ये निर्णय घेताना आणि काम करताना अडचणी येत आहेत. अधिकारी नियुक्तीचे अधिकार दिले जात नाही. अशी नाराजी व्यक्त करण्यात आल्यावर ठरल्याप्रमाणे निर्णय घेण्यास भाग पाडा, असे श्रेष्ठींनी सूचित केल्याचे कळते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या यासंबंधीही बैठकीत चर्चा झाली. मात्र त्याचा तपशील कळू शकला नाही. राज्य सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावाही श्रेष्ठींनी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -