घरताज्या घडामोडीCorona Double Mutant एकट्या मुंबईतच ६० टक्के ? भारतासह कोणत्या देशांमध्ये वाढतोय...

Corona Double Mutant एकट्या मुंबईतच ६० टक्के ? भारतासह कोणत्या देशांमध्ये वाढतोय धोका ?

Subscribe

कोरोना विषाणूचा नवीन वेरीयंट म्हणजे B.1.617 हा भारतात दोन प्रकारच्या म्युटेशनच्या स्वरूपात म्हणजे E484Q आणि L452R च्या रूपात समोर आला. भारतातील वैज्ञानिकांनी या म्यूटंटबाबतचा इशारा दिला होता. या म्यूटंटचा तपशील भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेसमोर नुकताच मांडण्यात आला. जीवशास्त्रानुसार कोणताही विषाणू हा म्यूटंटच्या स्वरूपात नेहमीच वेगवेगळे रूप धारण करतो. त्यापैकी काही म्यूटंट हे कमकुवत असतात. तर काही म्यूटंट हे व्हायरसला बळ देण्याचे काम करतात. जे म्यूटंट ताकदीचे असतात, त्या म्यूटंटमार्फत नेहमीच अधिक संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळेच नव्या म्यूटंटविरोधात भारतातील लसीकरणाचा कार्यक्रम हा अधिक गंभीरतेने घेण्याची गरज अभ्यासकांनी व्य केली आहे. आय़सीएमआरने केलेल्या अभ्यासानुसार आर्थिक राजधानी असलेल्या एकट्या मुंबईतच देशातील १० राज्यांच्या तुलनेत ६० टक्के म्यूटंटचे नमुने मुंबईत आढळले आहेत.

भारताच्या आरोग्य मंत्रालयानेही मार्च अखेरीस या डबल म्यूटंट बाबतची माहिती स्वतःहून दिली. या नव्या व्हायरसवर लक्ष देणे गरजेचे आहे. पण अद्यापही भारताकडून या म्यूटंटला अधिक धोकादायक किंवा अधिक संक्रमण करणारा असा शिक्का मारण्यात आलेला नाही, असे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या वैज्ञानिक असलेल्या अपर्णा मुखर्जी यांनी ब्लूमबर्ग टीव्हीच्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. डबल म्यूटंट हा अनेक देशांमध्ये आढळत आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, आर्यलंड, नांबिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युके आणि युएस याठिकाणी आढळला आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या कोरोना व्हायरसच्या वेरीयंट मधून अधिक संक्रमणाचा धोका असल्याचे अद्याप कुठेही निष्पन्न झालेले नाही, असे पत्रकच भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

नवा वेरीयंट भारतात धोका वाढवतोय ?

जिनोम सिक्वेन्सिंगनुसार कोरोना व्हायरसचा नवीन वेरीयंट हाच भारतातील कोरोना रूग्णांची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. पण भारत सरकारमार्फत अद्यापही याबाबतची पुष्टी दिली गेली नाही. जानेवारीच्या तुलनेत नव्या वेरीयंटमुळे ५६ टक्के सॅम्पलची वाढ झाल्याचे आऊटब्रेक इन्फो या वेबसाईटच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जगभरातील आकडेवारी या वेबसाईटच्या माध्यमातून मांडण्यात येते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच नव्या वेरीयंटचा टक्का हा ६० टक्के असल्याची माहिती सीएसआयआरचे अनुराग अग्रवाल यांनी दिली आहे. मुंबईत सध्या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहे. पण देशभरातील आकडेवारीच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नवीन वेरीयंटची प्रकरणे आहेत असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. देशभरातील १० राज्यांमध्ये हा नवा वेरीयंट आढळून आला आहे. या वेरीयंटमुळे आणखी संसर्ग वाढू शकतो असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

पण या दोन्ही म्यूटेशनचा प्रभाव येत्या दिवसात कमी होईल. म्यूटेशन कमी होऊ शकते, पण हे म्यूटेशन पुर्णपणे हद्दपार होणार नाही, असे मत वॉशिंग्टन युनिवर्सिटीचे जिनॉमी सायन्स एण्ड मायक्रोबायोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक जेस ब्लूम यांनी व्यक्त केले आहे. हे दोन्ही म्युटेशन वेगवेगळ्या पद्धतीने आढळले आहेत. पण दोन्ही म्युटेशन एकत्रही आढळण्याचे प्रकार काही ठिकाणी आढळले आहेत असेही ब्लूम यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

भारताबाहेर कुठे आढळतोय नवा म्यूटंट ?

जगभरात १० देशांमध्ये नवा म्यूटंट आढळला आहे. त्यामध्ये अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशांमध्ये हा नवा म्यूटंट आढळला आहे. आऊटब्रेक इन्फोच्या आकडेवारीनुसार ही नवीन माहिती समोर आली आहे. नव्या म्यूटंटच्या सॅम्पलपैकी २६५ सॅम्पल भारतात आढळले आहेत. तसेच यूकेमध्ये ७७ सॅम्पलमध्ये नवा म्यूटंट आढळला आहे. तर स्कॉटलंडमध्येही अशीच ७७ नव्या म्यूटंटचे सॅम्पल आढळले आहेत. या सगळ्या देशांमध्ये नव्या वेरीयंटला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर न्यूझीलंडने भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी तसेच न्यूझीलंडचे नागरिकत्व मिळालेल्या भारतीयांसाठी देशातच प्रवेश रोखला आहे. तर ब्राझीलमध्येही कडक नियमावली करण्यात आली आहे. भारतातल्या दुसऱ्या लाटेच्या धोक्यामुळेच इतर देशांनीही या भारतातल्या कोरोना लाटेचा एकुणच धसका घेतला आहे.

नवा वेरीयंट डेडलियर आहे का ?

संशोधकांकडून नव्या डबल म्यूटंटला सध्या निरीक्षणाअंतर्गत ठेवण्यात आले आहे. त्यापैकी L452R mutation या म्यूटंट वेरीयंटवर अमेरिकेत सखोल अभ्यास झाला आहे. त्यानुसार नवा वेरीटंयटची संक्रमण पसरवण्याची क्षमता २० टक्के इतकी आहे. पण मह्तवाचे म्हणजे या वेरीयंटमुळे शरीरातील अॅन्टी बॉडिजची क्षमता म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती कमी करण्याची क्षमता ही ५० टक्के असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

जगभरात आतापर्यंत आढळलेल्या तीन वेरीयंटने जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांचा समावेश आहे. या तीनपैकी काही व्हायरस हे जीवघेणे असल्याचेही अभ्यासातून समोर येत आहे. भारतात पहिल्यांदा आढळलेला म्यूटंट स्ट्रेन हा आता जगभरातील व्हायलॉजिस्टचा चिंतेचा विषय ठरत आहे.

नव्या म्यूटंट विरोधात लस किती परिणामकारक ?

कोरोनाचा नवीन वेरीयंट B.1.617 असलेल्या व्हायरवर लस काम करते का ? त्यामुळे कोरोनाचा अटकाव होतो का ? याचा अभ्यास सध्या आयसीएमआरकडून सुरू आहे. याबाबतचे कोणतेही संशोधन किंवा ठोस आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. या नव्या स्ट्रेनचा परिणाम थेट रोग प्रतिकारक शक्तीवरच होत असल्याने लस घेण्याआधी किंवा लस घेतल्यावरही शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीवर हा व्हायरस प्रभाव टाकतोच. त्यामुळेच लस घेतल्यावरही कोरोनाचा नवा वेरीयंट वरचढ ठरत असेल तर भारतातील कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. आतापर्यंत भारतात १२ कोटी नागरिकांना कोरोनाची डोस देण्याची तयारी झाली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -