घरदेश-विदेशभारत-बांगलादेश सीमेवर महाराष्ट्राची वाघीण

भारत-बांगलादेश सीमेवर महाराष्ट्राची वाघीण

Subscribe

त्रिपुरा राज्यात वर्षातले 8 महिन्यांचा पावसाळा, गोठवणारी थंडी आणि तितकेच कडाक्याचे ऊन असे ऋतुचक्र. पण अशा प्रतिकूल वातावरणातही सीमेवर खांद्याला 4 किलो वजनाची इनसास रायफल 12 तास घेऊन उभी राहणारी जयश्री लांबट. मूळची नागपूरच्या वरोरा येथील रहिवासी असलेली जयश्री ही कॉन्स्टेबल म्हणून पाच वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाली. पुरूष कॉन्स्टेबलसोबत तितक्याच चोख पद्धतीने भारत-बांगलादेश सीमेवर निर्भीडपणे गस्त घालण्याची तितकीच महत्त्वाची जबाबदारी जयश्रीवर आहे. ड्युटीचे पहिले कर्तव्य बजावतानाच सीमा परिसरातील महिला शेतकर्‍यांसोबत राहून आता बंगाली भाषा बोलायला येत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला

त्रिपुरा राज्याला लागून असलेली भारत देशाची सीमा आणि आंतरराष्ट्रीय सीमा या दरम्यान अनेक शेतकर्‍यांची जमीन आहे. शेतीमध्ये कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशानेच महिलांसाठी भारतीय सीमेपलीकडे जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. स्थानिकांच्या मागणीमुळे याठिकाणी 2014 साली पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलची नेमणूक त्रिपुरामध्ये करण्यात आली. जयश्री लांबट ही त्याच पहिल्या तुकडीतील महिला कॉन्स्टेबल.

- Advertisement -

बँकिंग, प्राध्यापक किंवा इतर कोणत्याही सरकारी प्रोफेशनपेक्षा सुरक्षा दलातील करिअर करणे हे आव्हान म्हणून स्वीकारल्याचे जयश्री सांगते. नववीत असतानाच सुरक्षा दलांमध्ये जायचं निश्चित केले होते. त्यानुसारच तयारी करून बीएसएफ बंगळुरू येथील टेकणपूर अकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण 27 महिला कॉन्स्टेबलची नेमणूक त्रिपुरामध्ये करण्यात आली. त्यापैकीच जयश्रीची नेमणूक ही बॉर्डर आऊटपोस्ट भागलपूर येथे सहा वर्षापूर्वी करण्यात आली. डी कॉय 120 बटालियनसाठी ती पुरूषांच्या तोडीचेच योगदान देते. तिच्या बटालियनमध्ये चार महिलांचा समावेश आहे. बीएसएफ प्रशिक्षणातच सर्व प्रकारच्या ड्युटी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी सीमेवर गस्त घालण्यापासून ते कडाक्याची थंडी,ऊन आणि पाऊस यासारख्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही काम करावे लागते. पण ही सगळी परिस्थिती आता कामाचा भाग आहे हे जयश्रीने स्वीकारले आहे. ड्युटीसमोर भावनांना दुय्यमच ठेवावे लागते. रात्रीच्या वेळी गस्त घालणे हे आव्हान सुरूवातीला खूपच कठीण वाटत होते, पण आता हे सगळे काम अनुभवातून सवयीचे झाल्याचे जयश्रीने सांगितले.

अनेकदा घरातून बहिणींकडून विचारणा होते की इतके दूर का राहतेस, घरची आठवण येत नाही का? पण देशासाठीचे योगदान पहिले आहे हे तिने मनाशी पक्के केले आहे. गेल्याच वर्षी डिसेंबर अखेरीस जयश्रीचे लग्न झाले आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांसोबतही तडजोड करावी लागली तरीही चालेल, पण देशसेवा प्रथम असे जयश्रीने स्पष्ट केले.

- Advertisement -

राजपथ परेड मानाचा क्षण
सार्क देशातील सदस्यांच्या उपस्थितांसमोर मोटरसायकलवर स्वार सीमाभवानी पथकामध्ये जयश्रीची निवड करण्यात आली होती. 26 मोटरसायकलवर 107 मुली असा नवा विश्व विक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. एका मोटरसायकलवर 9 हत्यारे असलेल्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मान हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचे जयश्रीने सांगितले. यासाठी तीन महिने प्रशिक्षण घेतले होते असे तिने सांगितले.

शेतकर्‍यांसोबत भावनिक नातं                                                                                                  भारतीय सीमेपलीकडे जमीन असणार्‍या शेतकर्‍यांची नोंद रोज नित्यनेमाने होते. बीएसएफमार्फत शेतकर्‍यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड किंवा ओळखपत्र घेऊनच शेतजमीनीच्या जागेत प्रवेश देण्यात येतो. शेतकरी कुटुंबातील महिलांशी बंगालीतून बोलण्याचा प्रयत्न होत असतो. अनेकदा हातवारे करून बोलावे लागते, पण संवाद घडतो. इतक्या वर्षातल्या ओळखीने आता एक चांगले भावनिक नाते तयार झाल्याचे जयश्री सांगते

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -