‘असा’ वकील म्हणजे बॅटशिवाय सचिन तेंडुलकर, सरन्यायाधीशांनी तरुण वकिलाला फटकारले

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान खटल्याच्या फाइलशिवाय आलेल्या एका तरुण वकिलाला फटकारले. न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी टिप्पणीची कागदपत्रे (ब्रीफ) न आणणारा वकील हा बॅटशिवाय मैदानात उतरणाऱ्या सचिन तेंडुलकरसारखा आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तेव्हा एका वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आपण प्रतिवादीकडून युक्तिवाद करणार आहोत. त्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्या वकिलाला संबंधित प्रकरणातील तथ्ये मांडण्यास सांगितले. मात्र, तो वकील त्याला उत्तर देऊ शकला नाही. यावर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठाने त्या वकिलाला विचारले की, तुम्ही या प्रकरणाशी संबंधित फाइल्स वाचल्या का? फाइलींशिवाय न्यायालयात हजर होऊ नका, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचा – भाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली; राहुल गांधींचा हल्लाबोल

यावरही त्या वकिलाकडून कोणतेही उत्तर न आल्याने सरन्यायाधीशांनी सांगितले की, तुम्ही बॅण्ड आणि गाऊन तर घातला आहे, पण टिप्पणीची कागदपत्रे नाहीत. हे चुकीचे आहे. कागदपत्रांशिवाय न्यायालयात आलेला वकील हा बॅटीशिवाय मैदानात उतरणारा सचिन तेंडुलकरसारखा आहे. तुम्हाला नेहमीच आपली कागदपत्रे जवळ ठेवली पाहिजेत, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी फटकारले.

जेव्हाही तुम्ही न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर रहाल तेव्हा, संबंधित फाइल्स व्यवस्थित वाचा. जेव्हा वरिष्ठ वकील अनुपस्थित असतील, तेव्हा युक्तिवाद करण्याची संधी घ्या, असा सल्लाही सरन्यायाधीशांनी त्या तरुण वकिलाला दिला.

दररोज 10 जामीन अर्ज आणि 10 हस्तांतरण याचिकांवर सुनावणी
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शुक्रवारीच फुलकोर्ट बैठकीत घेतलेला मोठा निर्णय शेअर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक खंडपीठात दररोज 10 जामीन अर्ज आणि 10 हस्तांतरण (ट्रान्सफर) याचिकांवर सुनावणी होईल, अशी घोषणा त्यांनी केली. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, हस्तांतरण याचिकांची 13 हजार प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

हेही वाचा – मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा