शक्तीशाली भूकंपाने तुर्की हादरला; अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 150 हून अधिकांचा मृत्यू

earthquake of magnitude 7.7 strikes turkey

तुर्की आज 7.8 रिश्टर स्केल इतक्या शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. तुर्कीच्या नूर्दगी भागापासून 23 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. या शक्तीशाली भूकंपामुळे तुर्कीतील अनेक इमारती अक्षरश: पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. यासह अनेक शहरांमधील घरांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तुर्कीमध्ये आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हजारोंचा घरात जाण्याची भीती व्यक्त होतेय. या भूकंपानंतर ठिकठिकाणी बचावकार्य सुरु आहे. तुर्कीनंतर सीरियातही तीव्र भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या. या इमारतींच्या ढिगाऱ्यात आत्तापर्यंत 86 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथक करत आहेत. तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गझियानटेपमध्ये भूकंप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता.

या भूकंपामुळे सीरियात मोठी खळबळ उडाली आहे. सीरियात आधीच युद्धजन्य परिस्थिती असते यात आता भूकंपाच्या धक्क्यांमुळे सीरियातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भूकंपामुळे सीरियात अनेक इमारती कोसळल्या आहेत. यात 200 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी तुर्कीच्या विविध शहरांमध्ये सुमारे 53 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.

यूनाइटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (United States Geological Survey-USGS) च्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. दक्षिणी तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी 7.8 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू गाजियांचेपमधील नुर्दगी परिसरात 23 किमी अंतरावर झालेल्या या भूकंपाची तीव्रता जमिनीपासून 24.1 किलोमीटर खोल आहे. सलग पाठोपाठ हे भूकंपाचे धक्के जाणवले. यातील पहिला धक्का पहाटे 4:17 वाजता जाणवला. ज्याची खोली सुमारे 17.9 किमी होती. पहिला धक्क्यानंतर 11 मिनिटाने 9.9 किमी अंतरावर 6.7 तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का जाणवलाय.

तुर्कीमध्ये हाय अलर्ट

बीएनओ न्युजनुसार, तुर्कस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाच्या माहितीनुसार, या शक्तीशाली भूकंपानंतर तुर्कीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या तीव्र भूकंपाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच भूकंपामुळे नुकसान झालेल्या व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे.