मोदी आणि अदानींच्या ऑस्ट्रेलियातील बैठकीचे रहस्य काय?; राहुल गांधींचा सवाल

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी आणि एसबीआय बॅंकेचे संचालक यांची ऑस्ट्रेलियात एक बैठक झाली. त्यानंतर एसबीआयमधून अदानी यांना पैसे देण्यात आले. या बैठकीवर मी प्रश्न उपस्थित केले. तसेच पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात नेमके काय संबंध आहेत, यावर मी प्रश्न विचारले. म्हणूनच मला लोकसभेत बोलू दिले जात नाही, असा दावा कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.

पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी हा दावा केला. ते म्हणाले, गेले तीन दिवस झाले मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. मला माझे म्हणणे मांडू दिले जात नाही. मी पंतप्रधान मोदी व अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळेच मला बोलू दिले जात नाही. पण मी बोलणार आहे. नक्कीच माझे मुद्दे लोकसभेत मांडणार आहे. खासदार म्हणून मी संसदेत माझे म्हणणे मांडणे योग्य ठरेल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्प अधिवेशनाचे दुसरे सत्र लोकसभेत सुरु झाले आहे. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे लंडन दौऱ्यावर होते. तेथील विविध कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकार व त्यांच्या कारभारावर टिका केली. त्यावरुन संसदेत सत्ताधाऱ्यांनी गदारोळ सुरु केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक होते. राहुल गांधी यांनी परदेशात भारताची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आधी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.

याला कॉंग्रेसच्या खासदारांनी विरोध केला. राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा कॉंग्रेसच्या खासदारांनी केला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या गोंधळामुळे संसदेचे कामकाज गेले तीन दिवस होऊ शकले नाही. कॉंग्रेसचे खासदार अधीर चौधरी यांनी तर लोकसभेतील बाईक बंद असल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. संसदेत मी ज्या ठिकाणी बसतो तेथील माईक गेले तीन दिवस बंद आहे. मला बोलू दिले जात नाही, असे तक्रारीचे पत्र खासदार चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे.