देवी-देवतांचे फोटो असणाऱ्या फटाक्यांवर मध्य प्रदेशात बंदी!

firecracker

दिवाळी म्हटलं की फटाक्यांची खरेदी-विक्री सुरू होते. अनेक प्रकारचे फटाके बाजारात दाखल होतात. मात्र, यातल्या अनेक फटाक्यांवर देवी-देवतांचे फोटो लावलेले असतात. हे फटाके जेव्हा उडवले जातात, तेव्हा हे फोटो देखील लोकांच्या पायदळी तुडवले जातात. यावर आता मध्य प्रदेश सरकारने उपाय शोधून काढला आहे. आता फटाक्यांवर देवी-देवतांचे फोटो लावण्यावर मध्य प्रदेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशमधल्या फटाक्यांवर देवी-देवतांचे फोटो छापले जाणार नाहीत. यासोबतच, फटाक्यांशी संबंधित इतरही काही मुद्द्यांवर मध्य प्रदेश सरकारने निर्णय घेतला आहे.

देवी-देवतांच्या फोटोंप्रमाणेच चीनी फटाक्यांवर देखील मध्य प्रदेश सरकारने बंदी घातली आहे. चीनी फटाके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं देखील सरकराकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी दोन वर्षांच्या कैदेची देखील तरतूद करण्यात आली आहे. चीनी फटाक्यांची साठवणूक, विक्री किंवा वापर यावर नव्या निर्णयानुसार बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही प्रकारच्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून जास्तीत जास्त भारतीय बनावटीच्या वस्तूंची खरेदी केली जावी. त्यासोबतच राज्यातल्या लघु उद्योगांना मदत व्हावी म्हणून राज्यातच बनवल्या गेलेल्या वस्तूंची खरेदी केली जावी, असं देखील आवाहन शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे.