घरअर्थजगतMukesh Ambani Plan: मुकेश अंबानींच्या संपत्तीची कशी होणार वाटणी? वॉल्टन मॉडेल विचाराधीन

Mukesh Ambani Plan: मुकेश अंबानींच्या संपत्तीची कशी होणार वाटणी? वॉल्टन मॉडेल विचाराधीन

Subscribe

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अब्ज डॉलर्सच्या संपत्तीच्या वाटणीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ते एका नव्या योजनेवर काम करत आहेत. अंबानी कुटुंबाच्या संपत्तीवरून पुढे जाऊन त्यांच्या मुलांमध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी मुकेश अंबानी प्रयत्न करत आहेत. यासाठी मुकेश अंबानी जगभरातील अनेक श्रीमंत कुंटुबातील संपत्ती आणि मालमत्तेचे वाटप कसे झाले होते याचा अभ्यास करत आहेत. या संपत्ती वाटपासाठी सध्या मुकेश अंबानी वॉल्टन कुटुंबापासून ते कोच कुटुंबाच्या मॉडेलचा विचार करत आहेत. यातील वॉलमार्ट इंकच्या वॉल्टन कुटुंबाचा संपत्ती वाटपाचा मॉडेल त्यांना सर्वाधिक आवडला आहे.

मुकेश अंबानींची संपत्ती किती?

मुकेश अंबानी यांची संपत्ती २०८ अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे. परंतु २००२ मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि त्यांचा भाऊ अनिल अंबानी यांच्यात संपत्तीवरून वाद झाला होता. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या वादात अखेर त्यांची आई आनंदीबेन अंबानी यांनी पुढाकार घेत हा संपत्तीचा वाद मिटवला आणि त्याची रितसर वाटणी केली. स्टॉकहोल्डर्सचा विरोध असून मुंबई उच्च न्यायालयाने या संपत्ती वाटपाला परवानगी दिली. त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुकेश अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

वॉल्टन फॅमिली मॉडेल नेमकं काय आहे?

एका अहवालानुसार, १९९२ साली वॉलमार्ट इंकचे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी ज्या पद्धतीने झाली ती पद्धत मुकेश अंबानी यांना खूप आवडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या वॉल्टन कुटुंबाने १९८८ पासून कंपनीचा दैनंदिन कारभार व्यवस्थापकांकडे सोपवला आणि त्यावर देखरेख करण्यासाठी एका बोर्डची स्थापना केली. या बोर्डामध्ये सॅम यांचा मोठा मुलगा रॉब वॉल्टन आणि त्यांचा पुतण्या वॉलमार्ट यांचा या बोर्डात समावेश केला. सॅम यांनी त्याच्या मृत्यूच्या ४० वर्षांआधी १९५३ मध्ये संपत्तीच्या उत्तराधिकार योजनेवर काम करण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातील ८० टक्के हिस्सा त्यांनी त्यांच्या चार मुलांमध्ये वाटला.

अंबानी ट्रस्टला करणार संपत्ती हस्तांतरित

दरम्यान मुकेश अंबानी आपली संपत्ती एका ट्रस्टला हस्तांतरित करु इच्छितात. ही ट्रस्ट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची असेल. त्यामुळे ही ट्र्स्ट देशातील सर्वाधिक मूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजवर नियंत्रण ठेवेल. यामध्ये मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, तीन मुले आकाश, अनंत आणि ईशा यांचा हिस्सा असेल. त्यांचा समावेश त्या ट्रस्टच्या बोर्डमध्येही असेल. तर मुकेश अंबानींच्या काही खास लोकांना ट्रस्टचे सल्लागार म्हणून नियुक्त करतील. परंतु बोर्डाचा कारभार बाहेरून नेमलेल्या व्यावसायिकांच्या हाती असेल, हीच मंडळी रिलायन्सचा कारभार पाहतील असे मानले जातेय.

- Advertisement -

रिलायन्स उद्योग समूहाचा पसारा रिफायरिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकम्युनिकेशन्स, ई-कॉमर्स, ग्रीन एनर्जीसह अनेक क्षेत्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील संपत्ती कशाप्रकारे विभाजित करायची यासाठी अंबानी सध्या अनेक पर्यांयांचा विचार करत आहेत. परंतु अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सोडल्याची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र त्यांची मुलं व्यवसायात सक्रिय होत आहेत. दरम्यान मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमावेळी आकाश, इशा, अनंत रिलायन्स उद्योग समूहात महत्वाची भूमिका निभावतील. असं अंबानी म्हणाले होते. त्यामुळे अंबानी कुटुंबाची संपत्ती नेमकी कशी वाटली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -