मृतदेहांची अदलाबदल; मुस्लिम महिलेवर हिंदुनी केले अंत्यसंस्कार!

west bengal son forced pay rs 51000 see fathers body who died coronavirus
कोरोना मृतदेह

दिल्लीतील एम्स रूग्णालयातील भोंगळ कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एम्स ट्रामासेंटरमध्ये दोन कोरोना संक्रमित महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाली आहे. हिंदू महिलेचा मृतदेह मुस्लिम कुटुंबाला देण्यात आला तर मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

त्यानंतर हिंदु कुटुंबाने मृतदेहावर हिंदु परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले, तर मुस्लिम कुटुंबाने मृतदेहाला दफन करणार होते. मात्र मृतदेह अदलाबदल झाले आहेत हा घोळ लक्षात येताच दोन्ही कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. या कुटुंबियांनी दिल्ली पोलिसात तक्रार केली आहे. यानंतर एम्स प्रशासनाने आपली चूक मान्य केली.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत महिलेचं नाव अंजुमन असे आहे. त्या बरेली येथील रहिवासी होत्या. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ४ जुलैरोजी त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र ६ जुलैला रात्री ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांना रात्री २ वाजता याविषयी माहिती मिळाली.

त्यानंतर दफन करण्याच्या तयारीला सुरूवात करण्यात आली. मृतदेहाला घेऊन गाडी कब्रस्तानमध्ये पोहचली मात्र त्यावेळी कुटुंबियांना धक्काच बसला. अखेरचं दर्शन घेण्यासाठी मृतदेहाचा चेहरा बघितला असता त्यांना अंजुमन यांच्या ऐवजी दुसऱ्याच महिलेचा मृतदेह दिसला. त्यानंतर कुटुंबियांनी याबाबत एम्स प्रशासनाला जाब विचारला असता अंजुमन यांचा मृतदेह चुकून हिंदू कुटुंबाला दिल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र हिंदू कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यस्कार केल्याचे समजताच कुटुंबियांना धक्काच बसला.


हे ही वाचा – कोरोना अधिक गंभीर होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय