घरमुंबईअजोय मेहता यांनीच पत्रकारांना ठेवले लोकल प्रवासापासून वंचित!

अजोय मेहता यांनीच पत्रकारांना ठेवले लोकल प्रवासापासून वंचित!

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबईची उपनगरीय रेल्वे लोकल सेवा लॉकडाऊनमध्ये १५ जूनपासून सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई उपनगरासह ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, विरार, वसई आणि पनवेलला राहणार्‍या प्रिंट, टीव्ही आणि वेब मीडियातील शेकडो पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत असूनही आजही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. पत्रकार संघटना आणि महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी पत्रकारांना लोकलमध्ये प्रवेश देण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांना निवेदन दिले होते. पत्रकारांप्रमाणेच एमटीएनल, बीएसएनलच्या कर्मचार्‍यांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली नसल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.

विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी 9 प्रकाराच्या कर्मचार्‍यांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजोय मेहता यांना खास पत्र दिले होते. या पत्राची दखल घेतली गेली. मात्र, पत्रकारांना आणि एमटीएनएल, बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांना लोकलमध्ये अजूनही प्रवेश दिला जात नाही. आणि याला अजोय मेहताच कारणीभूत असल्याचे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना जे निवेदन दिले होते त्यात विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, एसटी महामंडळाचे कर्मचारी, टपाल खाते, माझगाव डॉक, नेव्हल डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पत्रकार या सर्व आस्थापनांमधील कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी म्हणून लोकल प्रवासाला अनुमती मिळावी, अशी मागणी केली होती. यामागणीनंतर यातील काही कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाला मान्यता दिली.

मात्र पत्रकार, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आणि बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांना अद्यापही लोकलमध्ये प्रवेश दिलेला नाही. यामुळे पत्रकारांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी मी प्रयत्न करत होतो. मात्र इतर सर्वांना प्रवेश मिळाला, फक्त पत्रकार आणि आमचे टेलिफोन निगमच्या कर्मचार्‍यांना प्रवेश मिळालेला नाही. तो का देण्यात आलेला नाही, हे मला अजूनही कळलेले नाही. मात्र मुख्यमंत्री अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना प्रवेश द्या, असे सांगत असताना अजोय मेहता यांनीच हा प्रवेश अडवला आहे, असे अरविद सावंत म्हणाले.

- Advertisement -

पत्रकारांना प्रवेश मिळायलाच हवा-देवेंद्र फडणवीस
पत्रकार आणि मीडियाचा समावेश अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना या सेवांशी संबंधित सर्वच सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. मुंबईत अनेक पत्रकार विरार, बदलापूर, पनवेलहून कार्यालयात येतात. परंतु त्यांच्या वाहतुकीची कुठलीही व्यवस्था सध्या नाही. यासंदर्भात मी केंद्र सरकारशी चर्चा केली. मात्र पत्रकारांचा लोकल प्रवास हा निर्णय राज्य सरकारशी संबंधित असल्याने मी त्यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. पत्रकारांना लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -