…तर मुस्लीम पुरुष दुसरा निकाह करू शकत नाही, अलाहबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रयागराज : आपल्या पहिली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करण्यात जर कोणी मुस्लीम पुरुष सक्षम नसेल तर पवित्र कुराणाच्या अनुसार तो दुसऱ्या महिलेशी निकाह करू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहबाद उच्च न्यायालयाने केली आहे. पवित्र कुराणच्या आदेशानुसार, जोपर्यंत एखादी व्यक्ती अनाथांना न्याय देऊ शकत नाही, तोपर्यंत दुसरे विवाहबंधन पवित्र मानले जात नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अजीजूर रहमान याने दुसरा विवाह केला होता आणि त्याची कल्पना पहिली पत्नी हमीदुन्निशा ऊर्फ ​​शफीकुन्निशा हिला दिली नव्हती. त्याला दोन्ही पत्नींसोबत राहायचे होते. पण हमीदुन्निशाने त्यास नकार दिला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हमीदुन्निशा उर्फ ​​शफीकुन्निशा हिला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पतीसोबत राहण्याचा आदेश देण्यास संत कबीर नगर येथील कौटुंबिक न्यायालयाने नकार दिला होता. यासंदर्भातील अजीजूर रहमान याची आव्हान याचिका फेटाळत अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. न्यायमूर्ती एस. पी. केसरवानी आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

कुराणमधील सूरा 4 आयत 3चा संदर्भ न्यायालयाने दिला. यात दिलेला धार्मिक आदेश सर्व मुस्लीम पुरुषांवर बंधनकारक आहे. विशेषत:, सर्व मुस्लीम पुरुषांना त्यानुसार अनाथांशी न्यायाने वागणे बंधनकारक आहे. मग ते आपल्या आवडीच्या दोन, तीन किंवा चार स्त्रियांशी निकाह करू शकतात. पण आपण त्यांच्याशी न्याय्यपणे वागू शकणार नाही, अशी एखाद्या मुस्लीम पुरुषाला भीती वाटत असेल किंवा मुस्लीम पुरुष आपल्या पहिल्या पत्नीची, मुलांची काळजी घेण्यास सक्षम नसेल तर तो पवित्र कुराणच्या उपरोक्त आदेशानुसार दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

जेथे महिलांचा सन्मान होत नाही, तो समाज सुसंस्कृत म्हणता येणार नाही. महिलांचा आदर करणाऱ्या देशालाच सुसंस्कृत देश म्हणू शकतो. मुस्लिमांनी एक पत्नी असताना दुसरे लग्न करणे स्वत:हूनच टाळले पाहिजे. खुद्द पवित्र कुराणच पहिल्या पत्नीला न्याय देऊ न शकणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला दुसऱ्या लग्नाची परवानगी देत ​​नाही, असे सांगून पहिल्या पत्नीला कल्पना न देता, त्या व्यक्तीने केलेला दुसरा निकाह म्हणजे, पहिल्या पत्नीशी क्रूर व्यवहार केल्यासारखेच आहे, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली.