घरदेश-विदेशहोय, मी हमाली करते - मंजू देवी

होय, मी हमाली करते – मंजू देवी

Subscribe

महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये बाजी मारली आहे. आज महिला विमानाच्या पायलटपासून ते रिक्षा चालवण्यापर्यंत सर्वच कामात आघाडीवर आहेत. पण समजा एखादी महिला हमालीचे काम करते, असे कोणी सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आतापर्यंत हमालीचे काम पुरुष करत होते. मात्र या कामात आता जयपूरची मंजू देवी उतरली आहे. जयपूर रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करणारी मंजू देवी ही पहिली महिला आहे. कोणतेही काम कठीण नसून कुटुंबासाठी मी हमाली करत असल्याचे मंजू सांगते. रेल्वे प्रवाशांचे सामान इतर हमालांप्रमाणे त्यांच्या इच्छितस्थळी नेण्याचे काम मंजू करते.

पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी

मंजू देवीच्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले होते. घरची हलाखीची परिस्थिती आणि कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबांची सर्व जबाबदारी मंजूवर आली. मंजूला तीन मुले आहेत. मंजूचा पतीही हमालीचे काम करायचा. पतीच्या निधनानंतर मंजूने पतीचेच काम करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या नावावर असलेला हमालीचा परवाना स्वतःच्या नावावर मिळवून मंजूने जयपूर रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम सुरु केले.

- Advertisement -

नोकरी मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा केला सामना

जयपूर रेल्वे स्टेशनवर दुसरी कोणतीच महिला हमाली करत नाही, त्यामुळे हे काम करण्याआधी विचार करा असे रेल्वे अधिकाऱ्यांनी मजूंला सांगितले. तरिही मंजू आपल्या निर्णयावर आणि जिद्दीवर ठाम राहिली. तिने त्यांच्याकडून हमालीचा बॅच नंबर मिळवला. हमालीचे काम करण्यासाठी स्वत:चा गणवेश तयार करण्याचे आव्हान मंजूसमोर होते. त्यावर देखील मात करत तिने लाल कुर्ता आणि काळा सलवार, असा स्वत:चा गणवेश तयार केला.

कोणतेच काम कठीण किंवा कमीपणाचे नसते. महिला आणि पुरुष समान असतात. पतीच्या निधनानंतर माझ्या कुटुंबावर वाईट वेळ आली. घरामध्ये कोणीच कमावती व्यक्ती नसल्यामुळे मला हे काम करणे भाग होते. त्यामुळे मी माझ्या पतीची हमालीची नोकरी स्वीकारली. बॅगांचे ओझे उचलणे जरी अवघड असले तरी आता त्याचे काहीच वाटत नाही. सोबत काम करणारे इतर हमालही मला मदत करतात.
 मंजू देवी, एएनआयशी बोलताना

 

- Advertisement -

राष्ट्रपतीही भावुक झाले

महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे नुकतेच ११२ महिलांना सन्मानित केले. त्यापैकी मंजू देवी एक होत्या. या यादीत ऐश्वर्या राय, निकोल फारिया, बछेंद्री पाल, अंशू जमसेंपा, टेसी थॉमस आणि रजनी पंडित अशा आपापल्या क्षेत्रातील मातब्बर महिलांचा समावेश होता. २० जानेवारी २०१८ रोजी विविध क्षेत्रांशी जोडलेल्या ९० महिलांसोबत मंजू देवीला राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात आले. मंजू देवीच्या संघर्षाची कहानी ऐकूण आपण भावुक झाल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सोहळ्यादरम्यान सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -