ऑक्टोबर आणि कोरोनाची तिसरी लाट, काय आहे कनेक्शन?

CoronaVirus

सध्या देशातच नाही तर महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने बऱ्यापैकी कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. आता तर मंदिर, शाळा, नाट्यगृहांबरोबरच थिएटरही सुरू होत आहेत. पण दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्था म्हणजे NIDM च्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काय आहे यामागचं कारणं हे जाणून घेऊया. कारण जर तज्ज्ञांनीच ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय मग असे असताना सरकारने निर्बंध कसे काय शिथील केले असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने तब्बल ४० तज्ज्ञांच्या हवाल्याने एक सर्वेक्षण केले आहे. यात संशोधकांनी १५ जुलैपासून ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे. जुलैपासून हळूहळू ही रुग्णसंख्या वाढून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत त्याचा विस्फोट होईल असे यात सांगण्यात आले आहे. त्यातच रुग्णसंख्या कमी झाल्याने भारत किंवा महाराष्ट्रच नाही तर जगातील अनेक देशांनी निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणे जसे बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक, बस, रेल्वेमध्ये गर्दी वाढू लागली आहे. माणसं एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागली आहेत. याचपार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांनी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकिय प्रणालीही सज्ज ठेवल्या. जम्बो कोवीड सेंटरही सज्ज केलेली आहेत.

पण हाच संभाव्य धोका लक्षात घेत देशात लसीकरणाने वेग घेतल्याने काही प्रमाणात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात सरकारला यश मिळाले आहे. पण दोन लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होतो हे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तज्त्रांचे म्हणणे आहे.