घरदेश-विदेशपाकिस्तानातील महादेवाच्या मंदिरात यावर्षी भारतीयांना प्रवेश नाही

पाकिस्तानातील महादेवाच्या मंदिरात यावर्षी भारतीयांना प्रवेश नाही

Subscribe

पाकिस्तानात महादेवाचे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. दर महाशिवरात्रीला भारतातील अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. परंतु, यावर्षी भारतीयांसाठी हे मंदिर बंद करण्यात आले आहे.

पाकिस्तानात महादेवाचे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवमंदीर आहे. दरवर्षी शिवरात्रीला लाखो शिवभक्त या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी येतात. या शिवभक्तांमध्ये भारतीय शिवभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु, यावर्षी भारतीय शिवभक्तांसाठी पाकिस्तानने नो एन्ट्री लावली आहे. भारत-पाकिस्तान संबंधाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील भक्तांना पाकिस्तानात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. पूलवामा हल्ल्यानंतर या मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

पाकिस्तानात कुठे आहे हे शिवमंदिर?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील चकवाल जिल्ह्यात महादेवाचे हे मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर कटासराज नावाने प्रसिद्ध आहे. मंदिर लाहोरपासून २८० किमीवर आहे. हे मंदिर १५० लांब आणि ९० फूट रुंद आहे. या मंदिरावर एक पौराणिक कथा आहे. माता सतीच्या मृत्यूनंतर महादेव दुःखाच्या सागरात गेले होते. त्यांच्या अश्रूंची एक नदी तयार झाली. त्यातून दोन सरोवरांची निर्मिती झाली. यातील एक कटासराजमध्ये तर दूसरे पुष्करमध्ये (राजस्थान) असल्याची आख्यायिका सांगण्यात येते.

- Advertisement -

याआधीही दोन वेळा भारतीयांसाठी मंदिर बंद

याआधीही दोन वेळा भारतीयांना या मंदिरात दर्शनासाठी मज्जाव करण्यात आला होता. १९९९ च्या कारगील युद्धावेळी आणि २००८ साली झालेल्या २६/११ मुंबई हल्ल्यानंतर हे मंदिर भारतीयांसाठी बंद होते. आता तिसऱ्यांदा हे मंदिर बंद करण्यात आले आहे. पूलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानात शिरुन जैश ए मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. यामध्ये २०० ते ३०० अतिरेकांचा खात्मा करण्यात भारताला यश आले. दरम्यान, भारत-पाकिस्तान संबंध जास्त ताणल्या गेल्यामुळे पाकिस्तानने भारत-पाकिस्तान समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे.

पाकिस्तानातील हिंदू नागरिक सरकारविरोधात जाणार

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदूनी या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी पाकिस्तान सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार करुन युनेस्कोच्या हेरीटेज यादीत या मंदिराच समावेश करावा, अशी मागणी पाकिस्तानातील हिंदूंनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -