Corona Vaccine: पाकिस्तानने विकसित केली स्वदेशी लस; PakVac ठेवलं नाव

पाकिस्तान लवकरच पाकवॅक लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करणार

Pakistan launches covid-19 Vaccine named PakVac
Corona Vaccine: पाकिस्तानने विकसित केली स्वदेशी लस; PakVac ठेवलं नाव

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या काही देशांमध्ये कोरोना आटोक्यात आला असून काही देशांमध्ये अजूनही कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. जरी सध्या अनेक कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्या जात असल्या तरी अजूनही कोरोनाच्या लसी विकसित केल्या जात आहेत. दरम्यान पाकिस्तानने स्वदेश लस विकसित केल्याचा दावा केला आहे. या लसीचे नाव ‘पाकवॅक’ (PakVac) असे ठेवण्यात आले आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात या लसीला लाँच करण्यात आले. डॉ. फैसल सुलतान यांनी या लसीची माहिती दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे सुलतान आरोग्य सल्लागार आहेत. यापूर्वी चीन आणि रशियाकडून पाकिस्तान लस खरेदी करत होता. दरम्यान सुलतान यांनी लसीच्या कार्यक्षमतेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही आहे.

डॉ. सुलतान म्हणाले की, ‘आम्ही आमची लस तयार केली आहे. काही दिवसांत या लसीचे मोठ्या प्रमाणात आम्ही उत्पादन सुरू करू.’ माध्यमांशी बोलताना सुलतान म्हणाले की, ‘आम्ही स्वतः लसी तयार करणे, हे आमच्या देशासाठी खूप गरजेचे होते. आता लस तयार झाली आहे, तर लवकरच आम्ही लसीचे उत्पादन सुरू करू. पाकवॅक लस तयार करण्यासाठी आमच्या टीमला अनेक अडचणींच्या सामना करावा लागला. यादरम्यान चीन आमच्यासोबत खंबरीपणे उभा होता. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या टीमने देखील खूप चांगले काम केले आहे.’

पुढे डॉ. फैसल सुलतान म्हणाले की, ‘कच्च्या मालापासून लस तयार करणे हे खूप आव्हानात्मक आहे. आमच्या टीमने सर्व अडचणी असूनही लस तयार करण्यात यश मिळविले आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आजचा दिवस हा देशासाठी खूप महत्वाचा आहे.’

याबाबत नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरची अध्यक्ष असद उमर म्हणाले की, ‘कोरोना तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या पहिल्या दोन लाटेच्या प्रमाणात जास्त आहे. सध्या जवळपास ६० टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.’ तसेच पाकिस्तानमधील चीनचे राजदूत नोंग रोगं म्हणाले की, ‘या लसीच्या उत्पादनामुळे समजले की, पाकिस्तान आणि आमची मैत्री किती मजबूत आहे. चीनची लस स्वीकारणारा पाकिस्तान पहिला देश होता.’


हेही वाचा – संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांच्या काश्मीर विधानाचा वाद, भारताच्या तीव्र आक्षेपानंतर दिले हे स्पष्टीकरण