नीता अंबानींची घोषणा; रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत कोरोना लस

देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा संस्थापिका नीता मुकेश अंबानी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. घोषणा करताना नीता अंबानी यांनी रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा सर्व खर्च स्वत: करणार असल्याचे सांगितले आहे.

असे म्हणाल्या नीता अंबानी…

कोरोनावर आपण सर्व जण मिळून मात करू परंतु तो पर्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाच्या लढाईचा हा अंतिम टप्पा असून मी आणि मुकेश अंबानी यांनी असा निर्णय घेतला की, आम्ही रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनामूल्य कोरोना लस देणार आहे.

नीता अंबानींनी केलं कर्मचाऱ्यांना आवाहन

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लल घ्यायची आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर आपली नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकू, असे आवाहन नीता अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून आतापर्यंत ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात ही राज्ये आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचीही माहिती मिळतेय. तर ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीलगड या सोबत ९ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या ७५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली असल्याचे सांगितले जात आहे.