घरताज्या घडामोडीयंदाच्या हिवाळ्याची १२० वर्षातल्या सर्वात उबदार थंडीचा हंगाम म्हणून नोंद, उकाडाही 'हॉट'...

यंदाच्या हिवाळ्याची १२० वर्षातल्या सर्वात उबदार थंडीचा हंगाम म्हणून नोंद, उकाडाही ‘हॉट’ असणार

Subscribe

यंदाचा हिवाळा हा भारतातल्या थंडीच्या हंगामाच्या इतिहासात गेल्या १२० वर्षातील सर्वात उबदार अशा हिवाळ्यापैकी एक असा होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने १९०१ पासूनच्या हिवाळ्यांमध्ये चालू वर्षाच्या हिवाळ्याची नोंद ही गेल्या १२० वर्षांमधील तिसरा उबदार असा हिवाळा असल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यासोबतच यंदाचा हिवाळा उबदार असण्यामागे काय कारणे होती याबाबतची माहितीही स्पष्ट केली आहे. हिवाळ्यात किमान तापमानाच्या आकडेवारीत यंदाचा थंडीचा हंगाम हा गेल्या १२० वर्षांमधील दुसरा किमान तापमानाचा असा हंगाम आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे विभागाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महत्वाचे म्हणजे यंदाचा हिवाळ्याचा हंगाम हा इतर वर्षांच्या तुलनेत लांबलेला असा हंगाम होता. त्यामुळेच मुंबईसह राज्यात थंडीचा मुक्काम लांबतानाच काही दिवस पावसाचीही हजेरी लागली. त्याबाबतची कारणही हवामान विभागाने स्पष्ट केली आहेत.

यंदाचा हिवाळा सर्वात ऊबदार राहण्याची प्रामुख्याने दोन कारणे भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे यांनी जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे कारण म्हणजे जगभरात असलेला हवामानाचा पॅटर्न पाहता त्याचा परिणाम हा भारतातील हिवाळ्यावरही होता. ला नीना इफेक्ट अशतानाही यंदाचा हिवाळा अधिकार ऊबदार राहिला असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. सामान्यपणे ला नीना चा परिणाम हा वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी उपयुक्त असतो. पण हिवाळा ऊबदार असण्यासाठीचे कारण म्हणजे हरित वायू उत्सर्जनचा परिणाम असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळेच ला नीनाचा परिणाम म्हणूनच हिवाळा ऊबदार राहण्याचे हे एक महत्वाचे कारण राहिले आहे अशी माहिती इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल, मेटेरोलॉजीचे वैज्ञानिक रॉक्सी कॉल यांनी हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राला दिली आहे.

- Advertisement -

याआधीचा सर्वाधिक उबदार हिवाळा

याआधीच्या सर्वात उबदार अशा हिवाळ्याची नोंद ही २०१६ मध्ये झाली आहे. त्यावर्षी सरासरी तापमान हे २१.८ डिग्री सेल्सिअस इतके होते. त्याआधीचा सर्वात उबदार हिवाळा हा २००९ होता. त्यावेळी सरासरी तापमान हे २१.५८ डिग्री सेल्सिअस इतके होते. यंदाच्या थंडीच्या हंगामात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान २१.४३ डिग्री सेल्सिअस इतके होते. १९८१ ते २०१० या कालावधीतील तुलनेत हिवाळ्यातील सरासरी तापमानापेक्षा ०.७८ डिग्री सेल्सिअस इतके अधिक तापमान यंदाच्या मौसमात होते.

भारतातील सर्वच भागात उबदार हिवाळा

भारतात सर्वच भागात यंदाचा हिवाळा उबदार राहिला. त्यामध्ये उत्तर पश्चिम, पूर्व भारतात, उत्तरपूर्व भारतात, मध्य भारतात आणि दक्षिण भारतातही यंदाच्या हिवाळ्यात सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा अधिकच राहिले. त्यामुळे संपुर्ण भारतातच यंदा थंडीचा मौसम उबदार राहिला असे हवामान विभागाचे मत आहे.

- Advertisement -

यंदाचा उकाडाही हॉट

यंदाच्या उकाड्यातही सरासरीपेक्षा तापमान अधिक असेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या उकाड्यात सरासरीपेक्षा ०.५६ टक्के ते ०.७१ टक्के इतके तापमान अधिक असेल. भारतातील साधारणपणे ६० टक्के ते ७० टक्के इतक्या भागात याचा परिणाम राहिल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर किमान तापमानही सरासरीपेक्षा ०.१२ टक्के अधिक राहील असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या भागात उकाड्याचा पारा वाढणार ?

भारतातील इंडो गॅनगेटीक प्लेन्स (आयजीपी) विभागात म्हणजे हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश या भागात यंदा उकाड्याचा कहर होईल असा अंदाज आहे. मार्च ते मे या कालावधीत उन्हाचा पारा या भागात अधिक चढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान असणाऱ्या भागात उत्तर भारतात तसेच हिमालय भागात आणि मध्य भारतात तसेच पश्चिम भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -