शरद पवारांच्या बैठकीला सेनेला निमंत्रण नाही, संजय राऊत म्हणाले…

sharad pawar and sanjay raut

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज संध्याकाळी ४ वाजता १५ पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. हे नेते राष्ट्र मंचाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. मात्र, या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण नाही आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत महत्त्वाचं काही वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

“दिल्लीत होत असलेली ही बैठक विरोधी पक्षांची आहे का? या बैठकीला काँग्रेस नाही, समाजवादी पक्ष, मायावतींचा पक्ष आहे का? शिवसेना पण विरोधी पक्षात आहे. पण आम्ही त्या बैठकीला नाही आहोत. माझ्या माहिती प्रमाणे यशवंत सिन्हा यांनी तयार केलेल्या राष्ट्र मंचची बैठक शरद पवार यांच्याकडे आहे. याच्यापलिकडे मला त्या बैठकीचं फार महत्त्व वाटत नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. राष्ट्रमंचचे नेते त्यांच्याकडे काही सल्ल्यासाठी गेले असतील. नक्कीच ते मोदी विरोधी असतील. पण याचा अर्थ असा नाही की तिसरी आघाडी, चौथी आघाडी स्थापन होत आहे. नक्कीच मोदींविरोधात आघाडी तयार करण्याचा विचार सुरु आहे. पण आजच्या बैठकीत मला त्यात काही महत्त्वाचं वाटत नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार यांची राष्ट्र मंचसोबत होत असलेली बैठक ही प्रबळ विरोध पक्ष तयार करण्याची पहिली पायरी असू शकते, असं संजय राऊत म्हणाले. आजची बैठक युपीएविरोधात नाही आहे, असं देखल संजय राऊत म्हणाले.

पवारांशी कालच फोनवर चर्चा

आजच्या बैठकीत काही महत्त्वाचं होईल असं वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.