बांगलादेश सीमा आणि दिल्ली विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची ‘मालामाल’ कामगिरी

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल कोट्यवधींचे सोने आणि परकीय चलन हस्तगत करण्यात आले. एक कारवाई भारत-बांगलादेश सीमेवर तर, दुसरी कारवाई दिल्ली विमानतळावर करण्यात आली.

केंद्रीय यंत्रणा सध्या अनेक राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहेत. केंद्रातील मोदी सरकार या यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण तरीही या यंत्रणांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगलादेश सीमेवरील तस्करी उघड करत तब्बल ४१.४९ किलो सोने हस्तगत केले. तर, अन्य एका कारवाईत नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून १.२४ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय सीमेजवळील गनरमठ सीमा चौकी परिसरात तस्करी होत असल्याची खबर बीएसएफच्या १५८व्या बटालियनला मिळाली. त्यानुसार बीएसएफने शोधमोहीम राबविली. त्यावेळी एका बोटीने सात ते आठ जण इच्छामती नदीतून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे निदर्शनास आले. बीएसएफचे जवान पुढे सरसावल्याचे पाहताच, त्या सर्वांनी नदीत उडी घेतली आणि ते बांगलादेशच्या दिशेने पळून गेले.

बीएसएफ जवानांनी पाच गोणी जप्त केल्या. त्यात ३२१ सोन्याची बिस्किटे, सोन्याचे ४ बार, सोन्याचे एक नाणे होते. याशिवाय, देषशी बनावटीची एक बोट, चार मोबाइल फोन, पॅकिंग करण्याची सामग्री आणि बांगलादेशी वृत्तपत्रे बीएसएफने हस्तगत केली. हे ४१.४९ किलोचे सोने २४ कॅरेटचे असून त्याची बाजारातील किंमत सुमारे २१.२२ कोटी रुपये आहे. भारता-बांगलादेश सीमेवर आतापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे.

दिल्लीत परकीय चलन जप्त
दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) एका प्रवाशाकडून १.२४ कोटी रुपयांचे परकीय चलन हस्तगत केले. चौकशीमध्ये याबाबतची वैध कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. त्यामुळे सीआयएसएफने त्या प्रवाशाला जप्त केलेल्या रकमेसह सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.