घरCORONA UPDATECorona: तबलिगींचं आता कौतुकास्पद पाऊल, प्लाझ्मा डोनेट करणार!

Corona: तबलिगींचं आता कौतुकास्पद पाऊल, प्लाझ्मा डोनेट करणार!

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून अवघ्या देशात टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांनी आता कौतुकास्पद काम केलं आहे. न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार राजधानी दिल्लीमध्ये आत्तापर्यंत दाखल झालेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांपैकी १२९ लोकं बरे झाले आहेत. यातल्या काहींनी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता या बऱ्या झालेल्या तबलिगींच्या रक्तातून घेतलेल्या प्लाझ्माच्या मदतीने इतर कोरोनाग्रस्तांवर उपचार करणं शक्य होणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये भरती असलेल्या तबलिगींपैकी १२९ तबलिगी बरे झाल्याची माहिती आहे.

का होत होती तबलिगींवर टीका?

देशात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडू लागले तेव्हा म्हणजेच २१ मार्च रोजी दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा मरकज हा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला परदेशांतून देखील तबलिगी सदस्य हजर होते. या कार्यक्रमानंतर यातले बरेचसे तबलिगी भारतात त्यांच्या त्यांच्या ठिकाणी परतले. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून तबलिगींवर टीका केली जात होती.

- Advertisement -

दरम्यान, आता या बऱ्या झालेल्या तबलिगींपैकी काहींनी प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आता यांच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन तो दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इंजेक्ट करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाला हरवणाऱ्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा देण्याचं आवागन केलं आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी?

कोरोनावर आत्तापर्यंत लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये प्लाझ्मा थेरेपी रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपीचा मर्यादित वापर करण्यास केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या रक्तातून रोगप्रतिकारक पेशींचा संच अर्थात प्लाझ्मा घेतला जातो आणि तो कोरोनाग्रस्त रुग्णाच्या रक्तात मिसळला जातो. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात देखील कोरोनाच्या विषाणूचा विरोध करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी तयार होऊन या विषाणूंचा नाश होऊ शकतो असा अंदाज आहे. महाराष्ट्रात देखील प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा थेरेपीला परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -