Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या वेट ॲण्ड वॉच

राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या वेट ॲण्ड वॉच

राष्ट्रवादी ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार आणि भाजप सोबत जाणार...?

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलच तापलं आहे. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचा थेट आरोप केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारची देशभरात नाचक्की झाली आहे. भाजपने याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यासह गुजरातमधील अहमदाबाद येथे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भेट झालीच नसल्याचे सांगत या गुप्त भेटीचा इन्कार केला आहे. तर दुसरीकडे अमित शहा यांनी पवारांसोबत झालेली भेट यावर बोलताना सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे यामुळे राष्ट्रवादी ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार आणि भाजप सोबत जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण खरंच सरकारमधून बाहेर पडणं आणि भाजपबरोबर जाणं राष्ट्र्वादीला शक्य आहे का ? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

तर जाणकारांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार हेच महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. जनतेशी ते बांधिल आहेत. पवार हे राजकारण कोळून प्यायलेले व्यक्तिमत्व आहे. वेळेप्रमाणे राजकीय समीकरणे बदलण्यात त्यांचा हात देशातला कोणताही नेता धरू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो. यामुळे देशमुख यांच्यावरील १०० कोटी खंडणीच्या आरोपानंतर जर पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभारले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. यामुळे इतक्यात तरी ठाकरे सरकारमधून बाहेर पडणे पवार यांना कठीण आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुंबई पोलिसांना दिलेले दरमहा १०० कोटींचे हप्ता वसुलीचे टार्गेट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्की झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी क्रॉंगेसमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काही निर्णयांमुळे नव्याने वाद निर्माण झाल्याचे दिसते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना सादर केलेल्या अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेच्या डायरीतूनही अनिल देशमुखांच्या कार्यालयातील काही जणांची नावे उघड झाली आहेत.

तर दुसरीकडे आतापर्यंत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना प्रसिद्ध आहे. गुरु शिष्याचे हे नाते असल्याचे आवूर्जून सांगितले जाते . पण शहा आणि पवार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे यापूर्वी कधीही दिसले नाही. उलट शरद पवार य़ांनी जाहीर व खासगीत अमित शहा यांच्या कार्यशैलीवर कठोर टीका केली आहे. असे असतना पवार आणि पटेल खास विमानाने अहमदाबादला जातात याचा अर्थ काय असा सवाल आता शिवसेनेतून दबक्या आवाजात विचारला जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर महाराष्ट्राच्या रााजकारणात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

तर देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे. सर्वांच्या नजरा पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. ममता दीदी आणि अमित भैय्या यांच्यात ही कांटे की टक्कर दिसते. अशा परिस्थितीत आणि महाराष्ट्राचे एकूण राजकारण वाझे, जिलेटीन कांड आणि परमबीर लेटरबॉम्बमुळे अगोदरच अडचणीत आले आहे. एकूणच तीन पक्षांच्या पाठींब्यावर उभे असलेले ठाकरे सरकार पंधरा महिन्यातच डळमळीत झाले आहे. आयएएस., आयपीएस अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने तीन पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय. यामुळे राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.


- Advertisement -