घरCORONA UPDATECoronaEffect - एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसूनही आख्खं गाव झालं कोरोनाग्रस्त!

CoronaEffect – एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसूनही आख्खं गाव झालं कोरोनाग्रस्त!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या फैलावाचा भारतातल्या एका गावाला असा काही फटका बसला आहे, की गावात एकही करोनाग्रस्त नसून देखील आख्खं गाव करोनाग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: हैदोस घातला आहे. कोरोनाच्या हल्ल्यातून जसे अमेरिका, चीन, इटली, ब्रिटन, फ्रान्स असे दिग्गज महासत्ताक म्हणवणारे देश देखील सुटले नाहीत, तसेच इराण, इराक, दुबई, असे आखाती देश देखील वाचले नाहीत. भारतात देखील आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या १०७१ पर्यंत गेली आहे, तर २९ जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. या १०७१ कोरोनाबाधितांपैकी एकट्या महाराष्ट्रात २१५ रुग्ण सापडले असून त्यातले ८५ रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे गल्ली, दिल्ली ते थेट इटलीपर्यंत कोरोनाचा हाहा:कार सुरू आहे. मात्र, या सगळ्यामध्ये भारतातलं एक गावं असं आहे, जिथे एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसून देखील हे आख्खं गाव कोरोनाग्रस्त झालं आहे!

नक्की मॅटर काय झालाय?

ही व्यथा आहे उत्तर प्रदेशच्या सितापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या एका गावाची! या गावातली लोकं कुणा दुसऱ्या गावात जातात, तर लोकं त्यांच्या तोंडावर दरवाजे बंद करून घेतात. कुणाला फोन केला, तर पलीकडची व्यक्ती पुढचं ऐकायच्या आधीच फोन कट करते. इतकंच काय, रस्त्यात भेटणारे गस्तीवरचे पोलीस देखील या गावकऱ्यांच्याच मागे हात धुवून लागतात, इतकं हे गाव कोरोनाग्रस्त झालं आहे. पण रुग्णांचं म्हणाल, तर गावात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. पण मग नक्की मॅटर काय झालाय?

- Advertisement -

गावकऱ्यांची होतेय दमछाक!

तर झालं असं, की या गावाच्या नावानं तिथल्या गावकऱ्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. या गावाचं नाव आहे ‘कोरौना’! आता हल्ली कोरोना या नावाची इतकी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे, की दुरून जरी हे नाव ऐकलं, तरी लांबच्या माणसांचे कान टवकारतात. इथे तर चक्क गावाचं नावच कोरौना आहे. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांची मात्र इतरांना समजावता समजावता पुरती दमछाक होत आहे. अगदी कोरोनाचा पहिला रुग्ण देशात सापडल्यापासून या गावाला लोकांनी अक्षरश: वाळीत टाकलं आहे.

…त्याला आम्ही काय करणार?

राजन नावाच्या एका गावकऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं, की ‘कुणाचीही आमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. लोकांना आमच्या गावाची भिती वाटते. जेव्हा आम्ही कुणाला सांगतो की आम्ही कोरौना गावाचे आहोत, तर ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना साधी गोष्ट कळत नाही की हे गावाचं नाव आहे, गावात रोग पसरल्यामुळे असं नाव नाहीये’. तर दुसरे गावकरी सुनील सांगतात, ‘जर आम्ही बाहेर गेलो आणि पोलिसांनी आम्हाला हटकलं, तर आमच्या गावाचं नाव ऐकून
पोलीस देखील आमच्याकडे संशयानं पाहातात. आता आमच्या गावाचं नावच तसं आहे, तर त्याला आम्ही काय करणार?’

- Advertisement -

वास्तविक या वृत्तामधून कोरोनासारख्या गंभीर आजारावर कोणताही विनोद करण्याचा हेतू नाही. मात्र, लोकांच्या मनात हव्या त्या गोष्टींची (बाहेर फिरणे) बसणं कठीण असतं, पण नको त्या गोष्टींची असलेली भिती किती अनाठायी असू शकते आणि काय घडवून आणू शकते, याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणता येईल!


Coronavirus: क्वारंटाईन आणि आयसोलेशनमध्ये फरक काय आहे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -