घरदेश-विदेशउपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक, 10 वाजल्यापासून संसद भवनात मतदान

उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक, 10 वाजल्यापासून संसद भवनात मतदान

Subscribe

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (शनिवार) मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्यात लढत होणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणीला होणार असून शनिवारी रात्रीपर्यंत विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

एम व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत असून, नवे उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा राजस्थानच्या माजी राज्यपाल, तर एनडीएचे उमेदवार व भाजप नेते जगदीश धनकड (वय ७१) पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. धनकड हे राजस्थानातील जाट समुदायाचे नेते आहेत.

- Advertisement -

व्हीप लागू होत नाही –

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खुली मतदानपद्धती नसते. तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांत राजकीय पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांसह नामनिर्देशित सदस्य या निवडीसाठी मतदान करण्यास पात्र असतात.

- Advertisement -

गुप्त मतदानपद्धती –

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन सभागृहांतील सदस्य मतदान करतात. सर्व मतदार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने त्या खासदारांच्या मताचे मूल्य प्रत्येकी एक इतके असून, ते मत हस्तांतरणीय नसते. या निवडणुकीत गुप्त मतदानपद्धती अवलंबिली जाते.

 संसद भवनात होणार मतदान –

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसद भवन व विविध राज्यांतील विधानसभांच्या विशिष्ट दालनांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाते. मात्र, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी फक्त संसद भवनाच्या दालनामध्येच मतदान होणार आहे.

तृणमूल काँग्रेसचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय –

मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा (वय ८०) यांना उमेदवारी देताना सर्वांशी नीट चर्चा केली नव्हती, असा आक्षेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यामुळे मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय तृणमूूल काँग्रेसने घेतला आहे. तर टीआरएसने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -