घरदेश-विदेशधर्म खटकला म्हणून जेवण नाकारलं, झोमॅटोचं खरमरीत उत्तर!

धर्म खटकला म्हणून जेवण नाकारलं, झोमॅटोचं खरमरीत उत्तर!

Subscribe

डिलिव्हरी देणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा धर्म खटकला म्हणून एका व्यक्तीने चक्क त्याची ऑर्डरच कॅन्सल केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये घडला आहे. या प्रकारावर झोमॅटोने आणि त्यांच्या संस्थापकांनी देखील संबंधित व्यक्तीला खरमरीत उत्तर पाठवलं आहे.

केवळ ऑर्डर आणणाऱ्या मुलाचा धर्म मुस्लीम होता, म्हणून एका व्यक्तीने झोमॅटोवरून आलेलं जेवण नाकारलं आहे. तशा प्रकारचं ट्वीट त्याने केलं असून त्यासाठी त्याने झोमॅटोवर टीका देखील केली आहे. तसेच, त्यासंदर्भात कायदेशीर दाद मागण्याची देखील धमकी या व्यक्तीने ट्विटरवरच दिली आहे. मध्य प्रदेशमधल्या जबलपूरमध्ये राहणारी ही व्यक्ती असून पं. अमित शुक्ल असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या ट्विटवर झोमॅटोने देखील प्रतिक्रिया दिली असून ‘फक्त अन्न हाच धर्म मानतो’ असं झोमॅटोने म्हटलं आहे. हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावर या व्यक्तीला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.

नक्की घडलं काय?

मंगळवारी ३० जुलै रोजी पंडित अमित शुक्ल नावाच्या या व्यक्तीने झोमॅटोवरून जेवण मागवलं. मात्र, त्याचं जेवण आल्यानंतर जेवण आणणारा डिलीव्हरी बॉय मुस्लीम असल्यामुळे अमित शुक्लने हे जेवण परत पाठवून दिलं आणि त्याची ऑर्डर कॅन्सल केली. त्याऊपर या महाशयांनी थेट झोमॅटोलाच ट्विटरवर टॅग करून त्यांच्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं!

- Advertisement -

- Advertisement -

‘झोमॅटोने माझी जेवणाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी एका मुस्लीम मुलाला पाठवलं. वर ते म्हणाले की आता ते डिलिव्हरी बॉय(रायडर) बदलू शकत नाहीत. शिवाय ऑर्डर कॅन्सल केल्यावर त्याचे पैसेही परत देऊ शकत नाहीत. मी म्हणालो तुम्ही मला जेवण नको असताना ते घेण्याची माझ्यावर बळजबरी करू शकत नाहीत. मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मी पैसे न घेताच ऑर्डर रद्द केली’, असं अमित शुक्लने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय ‘आम्हाला नको असलेल्या लोकांकडून जेवणाची डिलिव्हरी घेण्याची झोमॅटो जबरदस्ती करत आहे. नाहीतर पैसे परत मिळणार नाहीत. मी हे अॅप मोबाईलमधून काढून टाकत आहे. शिवाय, या सगळ्या प्रकारावर मी आता माझ्या वकिलांसोबत चर्चा करणार आहे’, अशी धमकी देखील अमितने दिली आहे.

ऑर्डर झोमॅटोवर कन्फर्म झाल्याचा स्क्रीनशॉटही त्याने ट्वीट केला आहे.

दरम्यान, या महाशयांच्या तक्रारीवर झोमॅटो इंडियाने देखील उत्तर दिलं आहे.

‘अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न स्वत:च एक धर्म असते’, असं चोख प्रत्युत्तर झोमॅटो इंडियाने दिल्यानंतर झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी देखील अमित शुक्लला उत्तर दिलं आहे.

‘आम्हाला आपल्या भारतीयत्वाचा अभिमान आहे. आमच्या ग्राहकांच्या आणि भागीदारांच्या विविधतेचादेखील आम्हाला अभिमान आहे. मात्र, आमच्या तत्वांवर तडजोड करून मिळणारा कोणताही नफा किंवा ग्राहक आम्ही गमावल्यास आम्हाला त्याचं काहीही वाटणार नाही’, असं खरमरीत उत्तर दिपिंदर गोयल यांनी दिलं आहे.

दरम्यान, यावर नेटिझन्सही अमित शुक्लला चांगलंच ट्रोल केलं आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -