घरसंपादकीयअग्रलेखभेंडवळची घटमांडणी!

भेंडवळची घटमांडणी!

Subscribe

भविष्यात काय घडणार किंवा काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता बहुतेक सर्वांनाच असते, किंबहुना तो मनुष्य स्वभाव आहे. यासाठी ज्योतिषातील वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. प्रसंगी मंत्रतंत्र वापरून छातीठोकपणे भविष्यावाणी करणार्‍यांची आपल्याकडे बिलकूल वानवा नाही. विज्ञान अतिप्रगत झाल्याचे म्हटले जात असले तरी २१ व्या शतकात ग्रहतार्‍यांवर आधारित पारंपरिक फलज्योतिषाचा आधार घेतला जातो ही वस्तुस्थिती आहे.

भविष्यात काय घडणार किंवा काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता बहुतेक सर्वांनाच असते, किंबहुना तो मनुष्य स्वभाव आहे. यासाठी ज्योतिषातील वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. प्रसंगी मंत्रतंत्र वापरून छातीठोकपणे भविष्यावाणी करणार्‍यांची आपल्याकडे बिलकूल वानवा नाही. विज्ञान अतिप्रगत झाल्याचे म्हटले जात असले तरी २१ व्या शतकात ग्रहतार्‍यांवर आधारित पारंपरिक फलज्योतिषाचा आधार घेतला जातो ही वस्तुस्थिती आहे. ज्योतिष किंवा भाकीत सांगणार्‍यांचा अजिबात तोटा नाही. एकापेक्षा एक नावे या ज्योतिषशास्त्र क्षेत्रात आहेत. असाच ज्योतिष किंवा भाकीत वर्तविण्याचा एक प्रकार विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. घटमांडणीचा अंदाज असे त्याला म्हटले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणी ३७० वर्षांची परंपरा असणारी ही घटमांडणी भलतीच लोकप्रिय आहे.

त्यावर लोकांचा इतका विश्वास आहे की घटमांडणीचा अंदाज ऐकण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे अक्षय्य तृतीयेला भेंडवळला जत्रेचे स्वरुप येते. वर्षभरातील पाऊस, पीक, आरोग्य, राजकीय परिस्थिती यावर त्यात अंदाज वर्तविण्यात येतो. यंदाचे अंदाज कोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी घटमांडणी म्हणजे नेमके काय ते समजून घ्यावे लागेल. शेताच्या मध्यभागी गोल खड्डा करून त्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते. घागरीवर पापड, भजा, वडा, कुरडई असे पदार्थ ठेवून बाजूला पानसुपारी ठेवली जाते. तसेच वेगवेगळ्या १८ प्रकारची कडधान्ये मांडण्यात येतात. रात्रभर त्यात होणार्‍या बदलाचे सूर्योदयापूर्वी सूक्ष्म निरीक्षण करून पदार्थांतील बदलावरून महान तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज अंदाज व्यक्त करतात.

- Advertisement -

यंदा पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसण्याचा अंदाज असून अतिवृष्टी होईल असे सांगण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे, मात्र तरीही पीक जोमात येईल, परंतु त्याला अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. यावेळच्या घटमांडणीत प्रथमच विंचू निघाल्याने देशात रोगाईचे संकट येण्याचाही अंदाज आहे. राजकीय भाकितामध्ये देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान कायम असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटमांडणीच्या अंदाजानुसार शेतकरी आपल्या शेतीची कामे करतात हे विशेष! शेतकर्‍यांचा काय कल असू शकतो हे जाणून घेण्यासाठी विविध बियाणे विक्रेत्यांचे प्रतिनिधीही घटमांडणीच्या वेळी भेंडवळमध्ये येत असतात. या घटमांडणीला विज्ञानाचा कोणताही आधार नसला तरी शेतकर्‍यांची यावर श्रद्धा असल्याने घटमांडणीचा अंदाज ऐकण्यासाठी ते आतुर असतात. हा कसला आलाय अंदाज, असे म्हणणारेही लपून-छपून का होईना अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतील. २०२१ मध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीसोबत महामारीचा वर्तविण्यात आलेला अंदाज कोरोनामुळे खरा ठरला होता.

तसेच जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहील हा अंदाजही बरोबर ठरला. २०२२ च्या अंदाजात मात्र तफावत जाणवली. जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील असे सांगितले गेले तरी प्रत्यक्षात १५५ मिलिमीटर पाऊस झाला. सप्टेंबरचा अंदाज काहीसा मिळताजुळता आला होता. राजकीय अंदाज मुख्यमंत्री बदलल्याने चुकला होता. तसेच अन्नधान्याच्या बाबतीत अंदाज वेगळा आला होता. अर्थात अशाप्रकारचे अंदाज वर्तविण्याची पद्धत अजबच म्हटली पाहिजे. विशेष म्हणजे त्यावर शेतकर्‍यांचा प्रचंड विश्वास असून प्रसारमाध्यमेही घटमांडणीचा यंदाचा अंदाज काय असणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. भारत जरी विज्ञान क्षेत्रात आघाडीवर असला तरी फलज्योतिषात अनेकांना रुची असते. यात सर्वसामान्यांसह राजकारणीही मागे नाहीत. निवडणुकीतील अर्ज असो, मतदान करण्याची वेळ असो किंवा अगदी शपथविधीची वेळ असो, यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकले जाते.

- Advertisement -

आधुनिक विज्ञान युगातही फलज्योतिषाची चांगलीच चलती आहे. प्रगतशील म्हणविणारे अनेक शेतकरीही शेतीची कामे सुरू करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेतात. अलीकडे वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याकडे झुकलेला मोठा वर्ग आहे. वाहनाचा क्रमांक कोणता असावा यावरही सल्ला घेतला जातो. फलज्योतिष थोतांड असल्याचे म्हणणारे महाभाग आडमार्गाने त्याचा आधार घेतात. देशातील बरीचशी जनता देवभोळी किंवा देवावर श्रद्धा असणारी आहे. त्यांच्याकडून ज्योतिषाचा आधार घेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आज ज्योतिष सांगणे हा मोठा धंदा होऊन बसला आहे. कॉर्पोरेट ज्योतिषांना आपल्या इथे तोटा नाही. त्यांची वेळ कित्येक दिवस मिळत नसते. ज्योतिष किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र यातील तोडग्यांसाठी लागणार्‍या विविध वस्तूंची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

त्यात आणखी एक फेंगशुई हा प्रकार भलताच लोकप्रिय आहे. त्यामुळे ज्योतिषावर विश्वास ठेवू नका, असे काहींचे म्हणणे असले तरी ज्योतिष जाणून घेणार्‍यांच्या संख्येपुढे त्यांची संख्या नगण्य असल्याचे मान्य करावे लागेल. या पार्श्वभूमीवर शेतकरीही घटमांडणीच्या आधारे वर्षानुवर्षे भविष्याचा वेध घेत आहेत. शेवटी कमी शिकलेला असो अथवा जास्त, प्रत्येकाला आपल्या भविष्याविषयी चिंता आणि उत्सुकता असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेधशाळेतून हवामानाचे अंदाज वर्तवले जातात, ते तरी तंतोतंत खरे कुठे ठरतात, असा सवाल घटमांडणीवर विश्वास ठेवणारे शेतकरी उपस्थित करू शकतात. असे असले तरीही विज्ञानाची कास सोडता कामा नये. कारण त्यात केवळ अंदाज नसतो, त्यामागे शास्त्रीय मांडणी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -