घरसंपादकीयअग्रलेखसावरकर की मोदी, हा एकच प्रश्न!

सावरकर की मोदी, हा एकच प्रश्न!

Subscribe

विल्यम शेक्सपिअर याच्या जगप्रसिद्ध ‘हॅम्लेट’ या नाटकातील राजपुत्र हॅम्लेट हा अनेक अडचणींनी वेढला गेलेला असतो. त्याच्या मनात प्रचंड वादळ उसळलेले असते. काय करावे हे त्याला कळेनासे झालेले असते. अशा वेळी त्याच्या तोंडातून शब्द निघतात, “टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, म्हणजे जगावे की मरावे, हा एकच प्रश्न”. अशीच मानसिक अवस्था सध्या गांधी घराण्यातील राजपुत्राची झालेली आहे. राजपुत्र म्हणण्याचे कारण असे की, काँग्रेस ही गांधींशिवाय चालत नाही. गांधींच्या नंतर गांधी येत असतात. अगदीच नाईलाज झाला तर दुसर्‍या एखाद्या काँग्रेसजनाला संधी दिली जाते, पण पक्षाची सूत्रे ही गांधी घराण्यातील व्यक्तीकडे असतात. त्यामुळे काँग्रेसने बाहेरून लोकशाहीच्या कितीही गप्पा केल्या तरी तो पक्ष गांधी आडनाव असलेल्या पंडित नेहरूंच्या वारसदारांच्या एकाधिकारशाहीवरच चालत असतो. काँग्रेसमध्ये गांधींना न पटणारे मत मांडणे किंवा त्यांना आव्हान देणे सोपे नसते, याचा अनुभव बर्‍याच काँग्रेसजनांनी घेतला आहे.

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगणारे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सतत टीका करत राहिले तर त्यातून आपल्या विरोधी आघाडीचा कसा तोटा होईल, हे समजाविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हा अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच त्यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या माणसांवर बोचरी टीका केल्यानंतर त्यांच्यावर सुरत न्यायालयात अवमानाचा खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच्या परिणामस्वरुप लोकसभेतील त्यांची खासदारकी रद्द झाली.

- Advertisement -

मोदी आडनावाच्या लोकांवर आपण केलेल्या टीकेबद्दल माफी मागणार का, असे विचारले असता त्यांनी मी माफी मागणार नाही, मी गांधी आहे, माफी मागायला मी सावरकर नाही, असे विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यभर आक्रमक आंदोलन केले. तरीही त्यांनी आपली ताठर भूमिका सोडली नाही, पण त्यांचा हा ताठरपणा विशेषत: महाराष्ट्रातील सध्या काँग्रेससह महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीचा ठरला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील आपल्या भाषणातून काँग्रेसशी जरी आमची आघाडी असली तरी आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांना बजावले.

उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर त्यांनी फक्त बोलू नये, कृती करून दाखवावी. त्यांना सावरकरांचा अपमान सहन होत नसेल तर काँग्रेसची साथ सोडावी, असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले. त्यामुळे शिवसेनेची स्थिती अवघड होऊन बसली. मोदींच्या विरोधात एकत्र येऊ इच्छिणार्‍या पक्षांच्या नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी सोमवारी बैठक झाली, पण त्या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला. मोदींच्या विरोधात एकत्र येणार्‍या पक्षांमध्ये जर अशी फूट पडत गेली तर परिस्थिती अवघड होऊन बसेल हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावध भूमिका घेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना परिस्थितीची कल्पना दिली असावी.

- Advertisement -

त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण सावरकरांवर जाहीरपणे टीका करणार नाही, असे सांगितले. आपल्याला मोदींशी लढायचे आहे, सावरकरांशी नाही, हे विरोधी पक्षांतील नेत्यांनी खर्गे आणि राहुल गांधी यांना समजावून सांगितले. त्यामुळे सध्या राहुल गांधी हे सावरकरांविषयी शांत झाले आहेत, पण त्यांची ही शांती किती काळ टिकेल हे पाहावे लागेल. कारण भारत जोडो यात्रेसाठी जेव्हा ते महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी सावरकरांवर टीका करून वादळ उठवले, पण महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सावरकर हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे म्हटले होते, पण राहुल गांधी यांनी खासदारकी जाताच पुन्हा माफीवरून सावरकरांवर टीका केली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे योगदान मोठे आहे, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना आपला आदर्श मानत असत. या सगळ्या गोष्टींचा उद्या भाजप राष्ट्रीय पातळीवर फायदा उठवेल, अशी शक्यता लक्षात घेऊन राहुल गांधी यांना शांत करण्यात आले आहे. राहुल गांधी यांची अवस्था सध्या राजपुत्र हॅम्लेटसारखी झालेली आहे, असे म्हणावे लागेल. कारण काँग्रेसचे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, पण त्याच वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या प्रमुख राज्यांमधील विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यात पुन्हा प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ, असे अनुभवी काँग्रेसजन सांगत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक होऊन आपल्याला पंतप्रधानपदासाठी पसंती द्यावी, असे वाटत असले तरी ते तितके सोपे नाही. काँग्रेसला एकहाती बहुमत मिळविणे तर खूपच दूर आहे. मोदींवर कितीही टीका केली तरी लोकसभा निवडणुकीत तेच बाजी मारतात. त्यात पुन्हा सावरकर यांच्याविषयी त्यांच्या सल्लागारांनी दिलेली अर्धवट माहिती अशा सगळ्या कोंडीत राहुल गांधी सापडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला नेमके कुणाशी लढायचे आहे, सावरकरांशी की मोदींशी, असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -