वाणी ज्ञानेश्वरांची

कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तीचजोगें ॥
अथवा, सर्व पृथ्वी जरी जलमय झाली, तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो,
तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥
त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत, ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा तेवढा स्वीकार करतात.
म्हणौंनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥
म्हणून पार्था, ऐक. या सर्व गोष्टींचा विचार करून पाहता तू स्वकर्म करणे उचित आहे.
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला, तेव्हा आमच्या मनास असे आले की, तू आपले कर्तव्यकर्म सोडू नये.
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥
पण कर्मफळाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे.
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ॥
अर्जुना, तू योगयुक्त होऊन फळाची इच्छा टाकून मन लावून कर्मे कर.
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥
परंतु आरंभिलेले कर्म दैवयोगाने पूर्ण झाले तरी त्याचा संतोष मानू नको.
कीं निमित्तें कोणे एके । तें सिद्धी न वचतां ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥
किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तरी त्याबद्दल मनात असंतोष मानून त्रासू नको.