घरसंपादकीयअग्रलेखमहाराष्ट्राला अशांत कोण करतेय?

महाराष्ट्राला अशांत कोण करतेय?

Subscribe

सध्या बळीराजाला वेध लागले आहेत ते पावसाचे. पावसाची साथ लाभली तर या बळीराजाला वर्षभराची बेगमी करता येईल. दुसरीकडे राजकारण्यांनाही वेध लागले आहेत ते निवडणुकांचे. मतदारांची साथ लाभली तर त्यांनाही पाच वर्षांसाठी बेगमी करता येईल. याचसाठी मतांचे पीक घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांचा असतो. यातूनच जातीवाद, धर्मांधता डोके वर काढायला सुरुवात करते. कोल्हापूरलाही तेच सुरू आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि हिंदुत्वादी संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिस्थिती आणखी चिघळली. शहरातील काही भागांत तोडफोड झाली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात महाराष्ट्रात येऊन औरंगाबादस्थित औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून फुले वाहिली होती. तेव्हापासूनच राज्यातील राजकारण ‘धर्मा’च्या भोवती फिरू लागले. राज्यात काही ना काही घटना घडतच होत्या, पण यावर्षी परिस्थिती आणखी बिघडल्याचे चित्र आहे. ३० मार्च रोजी रामनवमी होती आणि त्याच्या आदल्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली होती. त्यानंतर रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात दगडफेकीची घटना घडली. त्यापाठोपाठ अकोला शहरात एका सोशल मीडिया पोस्टवरून वातावरण चिघळले आणि तिथे जाळपोळ आणि दगडफेक झाली.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यात काही ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर झळकले. जानेवारी महिन्यात वाशिममध्ये एका मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकावले. त्यानंतर औरंगाबाद, अहमदनगर आणि आता कोल्हापूरपर्यंत हे लोण पसरले आहे. एकीकडे निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत असताना दुसरीकडे त्यांच्याच महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावाखाली अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहादूर मावळ्यांनी ज्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले, त्याच औरंगजेबाचे काही समाजकंटक उद्दात्तीकरण करून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.

भाजपाला मुघलांचा इतिहास पुसायचा आहे. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १२वीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही हीच भूमिका मांडली. ‘मुघलांचा इतिहास म्हणजे कुतूबशाही, आदिलशाही शिकवणे बंद झाले पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यानाचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले आहे. असे असतानाही शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे पोस्टर झळकत आहेत, हे न सुटणारे कोडे आहे. महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण करण्याच्या घटना या कनेक्शनची चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

रामनवमी आणि हनुमान जयंतीसारखे सण आणि त्यांच्या निघणार्‍या मिरवणुका या दंगली घडवण्यासाठीच असतात. आगामी २०२४ हे वर्ष दंगलींचे वर्ष असेल, असे राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात म्हटले होते. फडणवीस यांचा रोख त्यांच्याकडेच नाही ना? पण या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी झाली, मात्र त्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत ही चौकशी थांबता कामा नये. कारण आतापर्यंतच्या घडामोडींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात, पण त्याची तड लागणे गरजेचे आहे. कारण केवळ चौकशीचा फार्स केला तर पुन्हा असे प्रकार घडत राहतात.

औरंगाबादमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी अफवा नेमक्या कशा पसरल्या? मुंबईतील दंगल पूर्वनियोजित होती, असे पोलीस चौकशीत समोर आले होते, तर त्याचे या ताणतणावामागचे नियोजनकर्ते कोण आहेत? अकोल्यात सोशल मीडियावर ती प्रक्षोभक पोस्ट कोणी व का शेअर केली? त्यामागचा कुणी मास्टरमाईंड आहे का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या देशात पाकिस्तानचे झेंडे कसे आले? असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला होता. त्याच धर्तीवर औरंगजेबाचे एवढे मोठे पोस्टर कोणी आणि कुठे छापले, याचाही शोध घेणे आवश्यक आहे.

केवळ हे पोस्टर नाचवणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचे एवढ्यापुरती कारवाई नसावी. मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अन्यथा ती वरवरची मलमपट्टी ठरेल. A politician divides mankind into two classes : tools and enemies म्हणजेच राजकारणी मानवांना साधने आणि शत्रू अशा दोन वर्गांत विभाजित करतात, असे जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नीत्शे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपली राजकीय पोळी भाजू पाहणार्‍यांच्या बोलण्याला कोणी भुलू नये. कारण या सर्व गोष्टींमध्ये भरडला जातो तो सर्वसामान्यच. म्हणूनच सर्वसामान्यांनी सारासार विचार करावा. जीवित आणि वित्तीय नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आग लावून त्यात तेल ओतत राहणार्‍यांपासून सावध राहायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -