घरसंपादकीयदिन विशेषप्रसिद्ध भाषावैज्ञानिक रघु वीरा

प्रसिद्ध भाषावैज्ञानिक रघु वीरा

Subscribe

रघु वीरा हे भारतातील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक, कोशकार, संशोधक तसेच कुशल राजकारणपटू आणि संसद सदस्य होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १९०२ रोजी रावळपिंडी इथे झाला. पंजाब विद्यापीठातून एम.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी लंडन येथून विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. १९४८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९५२ आणि १९५७ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

भाषावैज्ञानिक म्हणून त्यांचे हिंदी, संस्कृत, पर्शियन, अरेबिक, इंग्लिश, उर्दू, बांग्ला, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व होते. भारतीय नेतृत्वाला इंग्रजी भाषेच्या प्रभावापासून परावृत्त करून भारतीय भाषांकडे वळवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. युरोपातील प्रवासामुळे त्यांची तेथील प्राच्यविद्येच्या अभ्यासकांशी चांगली वैचारिक देवाणघेवाण होती. भाषाविषयातील त्यांच्या कामाची सुरुवात त्यांनी लाहोरमधील सनातन धर्म महाविद्यालयातील संस्कृत विभागातून केली. संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून अतिशय उत्तम काम केल्यामुळे त्यांना संपूर्ण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती; परंतु त्यासाठी त्यांना राजकीय वर्तुळापासून दूर राहण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे त्यांनी ही संधी नाकारली.

- Advertisement -

संशोधनाच्या क्षेत्रात त्यांच्या काही कामांचा उल्लेख हा मूलभूत योगदान म्हणून करावा लागतो.‘इंग्लिश-भारतीय शब्दकोश’, ‘आंग्ल भारतीय प्रशासन शब्दकोश’, ‘अर्थशास्त्र शब्दकोश’ अशा अनेक कोशांची निर्मिती त्यांनी केली. इंग्लिश हिंदी शब्दकोशाच्या प्रस्तावनेत त्यांनी या शब्दकोशाच्या निर्मितीमागची स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत हा अजूनही मध्ययुगातून बाहेर पडतो आहे. हिंदी आणि तिच्या अन्य भगिनीभाषांना आधुनिक युगातील संकल्पनांच्या अभिव्यक्तीसाठी सक्षम बनवण्याकरिता इंग्रजीमधील जवळपास सर्व शब्दांसाठी प्रतिशब्दांची निर्मिती करणे हे एक मोठे कार्य आहे. म्हणून त्यांनी जवळपास ६०० ज्ञानशाखांमधील शब्दांचे संकलन केले आहे. जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, बुद्धिबळ, वाणिज्य, अर्थशास्त्र अशा वैविध्यपूर्ण विषयातील शब्दांचा संग्रह या शब्दकोशात केलेला आहे. अशा या प्रसिद्ध भाषावैज्ञानिकाचे १४ मे १९६३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -