घरसंपादकीयदिन विशेषस्वातंत्र्यलढ्यातील वीरांगना अरुणा असफ अली

स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगना अरुणा असफ अली

Subscribe

अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी नेत्या, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना होत्या. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. त्यांचा जन्म १६ जुलै १९०९ रोजी पंजाबमधील कालका शहरात एका श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. पुढे हे कुटुंब कोलकाता शहरात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रॉटेस्टंट विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. त्यांनी सुप्रसिद्ध मुस्लीम वकील असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला (१९२८). असफ अली हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

त्यामुळे अरुणा यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी आला. त्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्या. महात्मा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यांच्याबरोबर त्या सभा, प्रभातफेर्‍या यांमध्ये सहभागी झाल्या. १९३० व १९३२ च्या कायदेभंग चळवळीत तसेच १९४१ मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या, त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९३० पासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे वापरले. महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी मीठ बनविणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरविणे हे काम त्यांनी सर्वत्र फिरून केले.

- Advertisement -

छोडो भारत आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्यास वेगळे वळण मिळाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर आयोजित केले होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकल्याने देशात राजकीय पोकळी निर्माण झाली होती. गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा पहारा होता. अशा वेळी पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. ऑगस्ट क्रांतिदिनाच्या त्या वीरांगना ठरल्या. अशा या थोर वीरांगनेचे २९ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -