घरसंपादकीयअग्रलेखरंग माझा वेगळा...

रंग माझा वेगळा…

Subscribe

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या दिग्गजांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यावेळी भाजपमधील अनेक नेते दुखावले गेले होते, पण त्यांना पुरून उरण्याचे काम फडणवीस यांनी केले. 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याचे दिसताच फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी उरकला होता, पण काही तासातच अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने फडणवीस यांचा डाव फसला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद घेतल्याची सल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खदखदत होती, पण स्वस्थ न बसता फडणवीस यांनी राज्यात ऑपरेशन लोटस सुरू ठेवले होते. 2022 साली शिवसेनेत फूट पाडून फडणवीस यांनी सत्ता हातून गेल्याचा बदला घेतला. यावेळी उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. तेव्हा फडणवीस यांचे पंख कापले जात असल्याची चर्चा होती. त्याकडे दुर्लक्ष करत फडणवीस यांनी काही महिन्यांतच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीत फूट पाडून सत्ता मजबूत केली. देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची शकले होऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. म्हणूनच की काय दोन पक्ष फोडून अडीच वर्षांनी पुन्हा सत्तेत आलो, असे वक्तव्य करणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणात आपण तरबेज असल्याचे दाखवून दिले आहे. आता भाजपमध्येही देवेंद्र फडणवीस यांची पकड मजबूत असल्याचे महाराष्ट्रात भाजपने जाहीर केलेल्या 20 उमेदवारांवरून दिसून आले आहे.

पक्षांतर्गत विरोधकांवरही फडणवीस वरचढ असल्याचे भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीवरून दिसून आले आहे. महाराष्ट्रात पक्षांतर्गत आव्हान देऊ शकणार्‍या अनेकांचा पत्ता कट करण्याचे काम फडणवीस खुबीने करतात. 2014 साली देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार नाराज झाले होते. ही दिग्गज मंडळी डोईजोड होतील अशी धास्ती होती, पण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्यामागे भोसरी जमीन प्रकरणाचा ससेमिरा लागला. खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीटही नाकारले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत असलेल्या एकनाथ खडसे यांची भाजपने पुन्हा एकदा कोंडी केली आहे. सून रक्षा खडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याने खडसे चक्रव्यूहात सापडले आहेत. मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन रक्षा खडसे यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यासाठी शरद पवार यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. हा चक्रव्यूह खडसे कसा भेदणार हे येत्या काही दिवसात दिसून येईल. विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते. गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य असलेल्या तावडे यांनी फडवणीस विरोध कायम ठेवला होता, पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने तावडे यांचे राज्यातील स्थान डळमळीत झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळेल, अशी तावडे यांची अपेक्षा होती, पण पक्षाने पीयूष गोयल यांना उमेदवारी देऊन तावडे यांना डावलले आहे. 2014 मध्ये युती सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, पण संधी न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज होते. राज्यातील राजकारणात रस असल्याने मुनगंटीवार यांना लोकसभेत जाण्याची इच्छा नव्हती. तशा बातम्या यादी जाहीर होण्याआधी बाहेर पडल्या होत्या, पण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले मुनगंटीवारही आता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद झाले आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे मानत असलेल्या पंकजा मुंडे याही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भाजपच्या राजकारणातूनही लांब फेकल्या गेल्या.

- Advertisement -

फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या पंकजा मुंडेंचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी आपले शल्य अनेकदा बोलून, शक्तिप्रदर्शन करत दाखवून दिले होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यातच राष्ट्रवादी फुटल्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाल्याने पंकजा मुंडे यांची राजकीय कोंडीच झाली आहे. पक्षाने बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली असली तरी बहिणीचे तिकीट कापून दिलेल्या उमेदवारीमुळे पंकजा मुंडे नक्कीच सुखावलेल्या नसतील. लोकसभेत पाठवून महाराष्ट्रातील राजकारणातूनही पंकजा मुंडे यांचे स्थान कमकुवत झाले आहे. त्यामुळे मुंडे लोकसभेची उमेदवारी नाकारतील अशीच अटकळ बांधली जात होती, पण तसे घडले नाही. अपमानाचा घोट गिळून मुंडेंनी राजकारणातून बाहेर पडू नये याची खबरदारी घेत लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असावा. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पक्षांतर्गत विरोधकांचे महाराष्ट्रातील राजकीय महत्त्व कमी करण्यात यश मिळवल्याचे लोकसभेच्या यादीवरून दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा दावाही घट्ट झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट विधानसभा निवडणुकीत कितपत मजल मारेल हे लोकसभा निवडणुकीनंतर दिसून येईलच. त्याआधीची पहिली लढाई जिंकत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आपले स्थान बळकट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -