घरसंपादकीयओपेडलव्ह इनपासून ते लिव्ह इनपर्यंतचा एक प्रीतम प्रवास...

लव्ह इनपासून ते लिव्ह इनपर्यंतचा एक प्रीतम प्रवास…

Subscribe

समाजाच्या रूढ चाकोरीत न बसणार्‍या आपल्या प्रेमासाठी कायम चर्चेत राहिलेल्या बंडखोर लेखिका अमृता प्रीतम यांचा प्रियकर इमरोज यांचे नुकतेच निधन झाले. अमृता यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अविवाहित राहून त्यांनी त्यांची साथ दिली. त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा केली. इमरोज आणि अमृता हे औपचारिक विवाह बंधनात कधीच अडकले नाहीत. आता रूढ झालेल्या लिव्ह इन रिलेशनची त्यांच्या संबंधासोबत बरोबरी करता येणार नाही. कारण या दोघांमधील जिव्हाळा पाहता ते त्याहीपेक्षा पलीकडचे म्हणजेच लव्ह इनचे होते, असेच म्हणावे लागेल.

अमृता प्रीतम या आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत, त्याचसोबत त्या आपल्या बिनधास्त आणि बंडखोर भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. अमृता यांच्या तरुणपणी आताइतकी समाज व्यवस्था खुली नव्हती. आता महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. जागतिकीकरणामुळे जगातील विविध प्रवाह देशात आले आहेेत. टीव्ही, वेगवान संपर्क माध्यमे, सोशल मीडिया, थेट दृकश्राव्य दर्शन घडवणारे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल अशी संपर्क साधने त्यांच्या वेळी नव्हती. त्या काळात एका महिलेने आपल्याला मनाला जे पटतात ते निर्णय घेणे आणि समाजात टिकून राहणे सोपे नव्हते. त्याविरुद्ध अमृता यांनी बंड केले. ते त्यांचे बंड हे केवळ त्यांच्या एकटीसाठी नव्हते. त्या प्रसिद्ध लेखिका असल्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव एकूण भारतातील महिलांच्या मनावर होत आला आहे.

स्त्री स्वातंत्र्याचा विचार मनात असला तरी भारतीय स्त्री ही समाज व्यवस्था आणि पारंपरिक रूढींमध्ये जखडलेली आहे. एखाद्या मुलीने कुणाशी प्रेमविवाह केला तर तिला स्वैराचाराचा दोष लावण्याची मानसिकता असण्याचा तो काळ होता. अशा काळात आपल्याविषयी मनोमन प्रेम वाटणार्‍या व्यक्तीसोबत विवाह न करता आयुष्यभर राहणे, केवळ राहणे इतकेच नव्हे तर कायम बोचर्‍या नजरांनी पाहणार्‍या समाजामध्ये टिकून राहणे सोपे नव्हते, पण त्यात त्या टिकून राहिल्या. साहिर लुधियानवी यांची सोबत फार काळ टिकली नाही, याची खंत मनाला छळत असताना इमरोज ही व्यक्ती अमृता यांच्या जीवनात स्वत:हून येते आणि त्यांना आपलेपणाचे साकडे घालते हाही अमृता यांच्यासाठी एक धक्काच होता आणि त्यात पुन्हा एखाद्याने आपल्या तरुणपणी सांगितले की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, हाही एक प्रश्न असतो. दोन माणसांचा ताटातूट होण्याचा कटू अनुभव आल्यानंतर पुन्हा अशा औपचारिक नात्यामध्ये अडकू नये, असे तर अमृता यांच्या मनाला वाटत नसेल ना? त्यामुळेच अमृता यांनी इमरोज यांच्याशी विवाह बंधनात न अडकता त्यांचे केवळ प्रेमाचे आवाहन अधिक भावले असावे. त्यात पुन्हा त्यांच्या जीवनात एकाकीपणाची निर्माण झालेली पोकळी भरून काढणारा कुणीतरी विश्वासू माणूस हवासा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

अमृता प्रीतम आणि इंदरजित सिंग उर्फ इमरोज ही दोन्ही आपापल्या क्षेत्रातील नामवंत माणसे होती. त्यात पुन्हा ज्यांच्याकडून अमृता यांचा अपेक्षाभंग झाला होता, ते साहिर लुधियानवी हेही भावस्पर्शी कवी आणि गीतकार होते. त्यांची अनेक गीते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत, पण त्यांना अमृता यांच्यासोबत घर करून का राहता आले नाही, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मेरे दिल मे आज क्या है, तुम अगर साथ देने का वादा करो, कभी कभी मेरे दिले मे, ए दिल तुम बिन लगता नही, अभी ना जाओ छोडकर, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अशी एकापेक्षा एक गाणी लिहिणारे शायर, कवी साहिर यांना अमृता यांची साथ का निभावता आली नाही? की त्यांना एका व्यक्तीच्या प्रेमात अडकून आपल्या मुक्त प्रतिभेला एका व्यक्तीच्या पायाची दासी करून ठेवायची नव्हते. जे इमरोज यांना जमले नेमके तेच साहिर यांना जमले नसावे.

दोन माणसे एकत्र राहण्यासाठी डावे उजवे असावे लागते. अगदी आपल्या शरीराचे पाहिले तरी असे दिसेल की आपल्या शरीराच्या दोन बाजू आहेत, डावी आणि उजवी. उजव्या बाजूमध्ये डाव्या बाजूपेक्षा जास्त ताकद असते. उजव्या हाताने आपण अधिक वेगाने काम करू शकतो, मोठे वजन उचलू शकतो, पण डाव्या हाताने ते शक्य होत नाही. डावा हात हा उजव्या हाताला सहाय्यकाचे काम करतो, पण उजवा हात भले डाव्या हातापेक्षा जास्त ताकदवान असला तरी त्याला केवळ एकट्याने काम करणे अवघड जाते. त्याला डाव्या हाताची मदत लागते. निसर्गाने मानवी शरीराची अशी डावी उजवी, कमी ताकदीची आणि जास्त ताकदीची रचना का केली असेल त्यामागे शरीराचा समतोल राखण्याचे कारण असावे असे एकूणच निरीक्षण केल्यावर दिसते. कारण शरीराच्या दोन्ही बाजू सारख्याच शक्तिशाली असत्या तर हा समतोल टिकणार नाही, मोडून पडेल याची निसर्गाला कल्पना असावी. त्यामुळेच एकाने पुढाकार घेतला तर दुसर्‍याने त्याला सहाय्यकाची भूमिका पार पाडावी लागते. ज्यावेळी तुमच्याकडे काही विशेष असते, त्यावेळी तुमचा इगो हादेखील प्रखर होत जातो आणि जेव्हा हे इगो आडवे येतात, त्यावेळी दोन माणसांचे पटणे अवघड होऊन बसते. अशा वेळी दोघेही सुशिक्षित असले तरी एकमेकांना समजून घेणे त्यांना अवघड होऊन बसते. याचा अर्थ त्या दोघांकडे परिपक्वता नसते अशातला भाग नाही, पण इगो हा घटक असतो की तो समजूतदारपणाला निष्प्रभ करून टाकतो. त्यामुळे मग कळतं पण वळत नाही अशी त्या दोघांची अवस्था होऊन बसते.

- Advertisement -

साहिर आणि अमृता यांच्या जीवनात असेच काही झाले असावे. त्यामुळे त्यांना इमरोज ही संयमित व्यक्ती अधिक भावली असावी. अमृता यांचा १६व्या वर्षी पहिला विवाह पाकिस्तानात प्रीतम सिंह यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. भारताची फाळणी झाल्यावर त्या दिल्लीत आल्या. तिथे राहू लागल्या. त्यावेळी त्या अगोदर साहिर यांच्याकडे आकर्षित झाल्या, पण पुढे ते संबंध फार काळ टिकले नाहीत. त्यानंतर त्यांचे पहिले पती जिवंत असताना इमरोज अमृता यांच्या प्रेमात पडले. पडले असेच म्हणावे लागले, कारण त्यांनी अमृता नावाच्या समुद्रात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांना त्यातून पुन्हा बाहेर पडायचेच नव्हते. त्यामुळे ते अमृता यांना भावले असावे.

जेव्हा अमृता यांचे पती प्रीतम सिंह आजारी होते, तेव्हा इमरोज त्यांची सेवा करत, अमृता यांच्या मुलांना आपल्या स्कूटरवरून शाळेत सोडत असत. इतकेच नव्हे तर अमृता यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा केली. हे सगळे पाहिल्यावर असे दिसते की इमरोज यांनी स्वत:ला अमृता यांच्यासाठी वाहून घेतलेले होते. अर्थात काही माणसे ही जगात दुसर्‍यासाठी वाहून घेण्यासाठीच जन्माला येतात. त्यांचा तो मूलभूत नैसर्गिक स्वभाव असतो. ज्यांच्यासाठी ते स्वत:ला वाहून घेतात त्यांच्याकडून ते कसली अपेक्षाही करीत नाहीत. इमरोज यांचे व्यक्तिमत्त्व असे असावे. त्यामुळेच ४० वर्षे या दोघांचा हा याराना टिकून राहिला. अर्थात असे म्हणणेही चुकीचे ठरले, कारण त्यांच्यात जे प्रेम होते, त्याला अशी वर्षांची मर्यादा घालता येणार नाही. अशा संबंधांना केवळ प्रेम इतकेच नाव देणे अपुरे ठरेल, हे त्याहीपेक्षा पलीकडचे काहीतरी होते, असेच म्हणावे लागेल.

अमृता प्रीतम यांचे 16व्या वर्षी ज्या प्रीतम सिंह यांच्याशी लग्न झाले त्यांच्या त्या लहानपणापासून प्रेमात पडलेल्या होत्या. पुढे त्या भारतात आल्या त्यावेळी साहिर लुधियानवी यांच्याशी त्यांची जवळीकता आली, पण पुढे ती फार काळ टिकली नाही. त्यानंतर इमरोज त्यांच्या जीवनात आले. केवळ आले नाही तर ते अमृतामय होऊन गेले. अमृता प्रीतम यांच्या प्रितीच्या अमृतात ते आकंठ बुडाले आणि प्रेमाच्या प्रातांत अमर होऊन गेले. इमरोज यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. तो घेतानाही त्यांच्या मनात आणि मुखात अमृता हेच नाव असावे. अमृता आणि इमरोज हे दोघे ज्या प्रकारे एकत्र राहिले त्याला आताच्या भाषेत लिव्ह इन रिलेशन म्हणता येईल का, असा प्रश्न पडतो. कारण लिव्ह इन रिलेशनमध्येही एकमेकांची सोय पाहून एकत्र राहिले जाते. एक दुसर्‍याला तपासून पाहिल्यावरच मग सुरक्षित संबंध ठेवले जातात. सुरक्षित संबंध आणि सुरक्षित संभोग हे बरेचदा केवळ आनंद घेण्यासाठी ठेवले जातात. त्यात एक व्यवहारिकपणा असतो. इमरोजचा अमृताशी असलेला संबंध लिव्ह इनपेक्षाही खूप वरच्या पातळीवरचा होता. त्याला लव्ह इन असेच म्हणावे लागेल. लिव्ह इनवाले मनाला वाटेल तेव्हा त्या संबंधातून बाहेर पडू शकतात, पण इमरोज आणि अमृता हे लव्ह इनवाले होते. ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्यामुळे त्या संबंधातून बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -