घरसंपादकीयओपेडकष्टकर्‍यांच्या पोटातील भूकेला वास्तवाची फोडणी!

कष्टकर्‍यांच्या पोटातील भूकेला वास्तवाची फोडणी!

Subscribe

अशोक कांबळे हे इंडियन एअरलाईन्सचे निवृत्त अधिकारी, मोठ्या पदावर काम करतानासुद्धा त्यांची नजर मात्र अंधारलेल्या कोपर्‍यांवर, श्रमिक, कष्टकरी हातावर पोट असणार्‍यांच्या व्यथा वेदनांवर पडल्यानेच त्यांच्या कथांची सकस निर्मिती झाली आहे. त्यांनी निवडलेल्या कथांची पात्रं ही उपेक्षित वर्गातील असल्याने कथा काल्पनिक असल्या तरी वास्तवाच्या दुनियेत घेऊन जातात. त्यामुळे या कथा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. काही कथा आणि कथाकार जात-धर्माच्या विळख्यात अडकलेले दिसतात. ‘ठिकरीची फोडणी’च्या कथा या कुणा एका जाती-धर्माच्या किंवा विशिष्ट समूहाचं अजिबात प्रतिनिधित्व न करता, समस्त कष्टकर्‍यांच्या श्रमिकांच्या श्रमाचं आणि घामाचं प्रतिनिधित्व करतात. किंबहुना उपेक्षितांचा दबलेला आवाज समाजाच्या कानावर पोहोचावा हाच उद्देश आणि दृष्टिकोन ठेवून अशोक कांबळे यांनी या कथा दिलेल्या असाव्यात.

-प्रदीप जाधव

साहित्य मनोरंजनासाठी की माणूस घडवण्यासाठी असे प्रश्न अनेक वर्षे चर्चिले जात असले तरी, वास्तविक पाहता साहित्यातून मनोरंजन आणि समाज प्रबोधनातून निकोप समाज निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. माणूस, समाज आणि साहित्य यांचं अतूट नातं आहे. साहित्य ही मानवनिर्मित प्रक्रिया असल्याकारणाने मानवाच्या हिताच्या कल्याणासोबतच सुख, दु:खांच्या वेदनाही त्यात प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. कारण साहित्य आरसा समजला जातो. साहित्याच्या संस्कारातून समाजमन तयार होत असतं. काहींच्या बाबतीत हा एकेरी विचार केला जातो.

- Advertisement -

काही लोक साहित्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणून बघतात, तर काही माणूस घडवणारं प्रबोधन, परिवर्तनाचं शस्त्र. साहित्याच्या सगळ्याच प्रकारातून निखळ मनोरंजनाबरोबरच निर्भय समाज निर्मिती अपेक्षित आहे. कथा, कादंबरी, कविता, नाटक यातून आनंद मिळतो. त्याचबरोबर शाहिरी, जलसा, पोवाडा, गाणी, कव्वाली हे रोमांच उभे करतात. साहित्यातून अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा त्याचबरोबर अंधश्रद्धा यावर प्रहार झालाच पाहिजे. आपल्या सजग सम्यक दृष्टीतून साहित्याची मांडणी व्हायला पाहिजे. आपण जे लिहितो, ते का? कशासाठी? कुणासाठी? हा साधा प्रश्न साहित्यिकांना पडलाच पाहिजे.

कारण लिहिणारे साहित्यिक, हे विचार करणारे असतात, त्यांच्यावर लोकांचा विश्वास असतो. त्यांच्या शब्दात आणि साहित्यात सामर्थ्य असते. समाजाला योग्य दिशा दाखवणारे यादृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. वेगवेगळी विचारधारा स्वीकारून अनेकांनी साहित्य संस्था, मंडळे स्थापन केली असली, तरी शेवटी अंतिम ध्येय मानवाचं कल्याण हा एक समान धागा असावा. अलीकडे विविध जातीत साहित्य आणि साहित्यिक निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाने आपली जात, बोलीभाषा, संस्कृतीचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी साहित्य लिहिलं आहे. त्यातही समाज प्रबोधनाचा धागा निश्चित सापडतो.

- Advertisement -

कथा साहित्यातील अत्यंत अवघड प्रकार. त्यामुळे कथेच्या वाट्याला कोणी सहसा जात नाही. कथेतून पुढे काय? अशी उत्कंठा वाढवून वाचकांसमोर जिवंत उभी करण्याची ताकद कथाकारामध्ये असते. अलीकडच्या काळात कथा आणि कथाकार अत्यंत दुर्मीळ आहेत. मोजक्या कथाकारांमध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते प्रसिद्ध कथाकार अशोक कांबळे. त्यांनी विविध दिवाळी अंकांमध्ये आपल्या कथा लिहिल्या असून त्या प्रचंड गाजल्या. साठ-सत्तरच्या दशकात आपल्या कथालेखनाला सुरुवात करूनही त्यांचं कथालेखन कथासंग्रहाच्या स्वरूपात उशिरा आल्याने मराठी कथाविश्वाला त्यांचं नाव अपरिचित होतं.

‘कृष्णाजळी’ हे स्वकथन. ऐक्याचा खेळखंडोचा, त्यांसि म्हणे जो आपुले, नाट्यरंग ही लोकप्रिय ठरलेली पुस्तकं. त्यांच्या सर्वच साहित्यकृतीला सन्मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘ठिकरीची फोडणी’ हा कथासंग्रह वयाच्या ८० व्या वर्षी लिहिला असून नुकताच प्रसिद्ध झाला आहे, परंतु खेदाची बाब म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या एक महिना आधीच त्यांचं निधन झालं. या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांना पाहता आला नाही, याची खंत त्यांच्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागली. त्यांच्या कुटुंबीयांनी हे पुस्तक प्रकाशन केलं.

कथा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ठिकरीची फोडणी’. एखादा पदार्थ बनवताना त्याच्या फोडणीचा खमंग वास आला की तो पदार्थ आपणास कधी खातो असं होतं. तशाच प्रकारची ‘ठिकरीची फोडणी’ हे पुस्तक हातात घेतल्याबरोबर हा कथासंग्रह पहिल्या पानापासून शेवटपर्यंतच्या कथा कधी वाचतो अशी उत्कंठा निर्माण होते आणि पूर्ण कथा वाचूनच शांत होतो. इतकी प्रतिभा कथा आणि कथाकारामध्ये आहे.

आपल्या देशात आणि समाजात जाती-धर्माबरोबरच गरीब आणि श्रीमंत हे दोन वर्ग कायमच आहेत. जाता जात नाही ती जात. त्याप्रमाणे श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला असून गरीब अधिक गरीब होत आहे. ही दरी वाढतच आहे. पैसेवाले श्रीमंतांचा इंडिया आणि काबाडकष्ट करून एक वेळ उपाशी राहून या देशावर अपार प्रेम असणार्‍या गरिबांचा भारत. असं उपरोधाने म्हटलं जातं. किमान काही लोक जेवतील इतकं अन्न दररोज श्रीमंत फेकत असतात, तर तेच उष्टे अन्न खाण्यासाठी रांग लागते त्यासाठी आपापसात भांडणारे आपण पाहत आहोत.

पोटाची खळगी न भरल्याने भूक कंगाळांची एक वेगळीच जमात निर्माण झाली आहे. भूकबळींची संख्या वाढली आहे, हे विदारक सत्य आहे. श्रीमंत लोक खाल्लेलं अन्न पचत नाही म्हणून तासन्तास व्यायाम करत असतात, तर गरीब कष्टकरी मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाड कष्ट करत असतो. त्या काबाडकष्ट करणार्‍या गरीब कष्टकरी, श्रमिकांच्या श्रमाचं प्रतिबिंब ‘ठिकरीची फोडणी’ या कथा संग्रहात उमटलं आहे.

अशोक कांबळे हे इंडियन एअरलाईन्सचे निवृत्त अधिकारी, मोठ्या पदावर काम करतानासुद्धा त्यांची नजर मात्र अंधारलेल्या कोपर्‍यांवर, श्रमिक, कष्टकरी हातावर पोट असणार्‍यांच्या व्यथा वेदनांवर पडल्यानेच त्यांच्या कथांची सकस निर्मिती झाली आहे. त्यांनी निवडलेल्या कथांची पात्रं ही उपेक्षित वर्गातील असल्याने कथा काल्पनिक असल्या तरी वास्तवाच्या दुनियेत घेऊन जातात. त्यामुळे या कथा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. काही कथा आणि कथाकार जात-धर्माच्या विळख्यात अडकलेले दिसतात. ‘ठिकरीची फोडणी’च्या कथा या कुणा एका जाती-धर्माच्या किंवा विशिष्ट समूहाचं अजिबात प्रतिनिधित्व न करता, समस्त कष्टकर्‍यांच्या श्रमिकांच्या श्रमाचं आणि घामाचं प्रतिनिधित्व करतात.

जात-धर्माच्या परिघाबाहेर माणूस केंद्रस्थानी मानून जेव्हा साहित्य लिहिलं जातं, तेव्हा त्या साहित्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होत असतो. म्हणूनच साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस असावा. मानवतावाद म्हणजे नक्की काय तर सर्वांना सोबत घेऊनच विकासाचा टप्पा गाठणे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, करुणा, न्याय, मैत्री प्रेमाने सर्व माणसे एका धाग्यात गुंफणे. माझं जेवण झालं तू जेवलास का? एवढं जरी उपाशी माणसाला विचारलं तरी, दोघांच्या सुसंवादातून उपाशी असणारा तुडुंब पोट भरलं आहे असं भासवतो. म्हणूनच एकमेकाविषयी जिव्हाळा आणि प्रेम अत्यंत आवश्यक आहे.

प्रेमानं सारं जग जिंकता येतं म्हणून प्रेम हे वाटलं पाहिजे, त्याच पद्धतीने आपल्याकडे असणारी अतिरिक्त संपत्ती दान स्वरूपात वाटली पाहिजे. म्हणजेच समाजाचं हित आणि कल्याण साधता येईल. समाज समान पातळीवर आणता येईल. नेमका हाच धागा पकडून अशोक कांबळे यांनी सर्व कथा लिहिल्या आहेत. हा मानवतावादी विचार त्यांच्या या कथासंग्रहात वाचावयास मिळतो. म्हणून तो उच्च दर्जाचा कथासंग्रह ठरला आहे. या कथासंग्रहातल्या कथांमधून मानवी स्वभावाचं, भावभावनांचं दर्शन तर घडतंच, परंतु सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरातले बारकावे तपशिलासह मांडताना अशोक कांबळेंची कथा वास्तवाचं सादरीकरणही ताकदीनं करते.

ग्रामीण आणि शहरी भागातील तसेच डोंगर, दरी-खोरी, कड्या कपार्‍यातील मानवी जीवनात घडणार्‍या घटनांचा अचूक आढावा घेत त्यांनी कथेत मांडल्या आहेत. खरंतर आपल्या आसपासच्या परिसरात अशा घटना घडतच असतात, परंतु ते आपल्या नजरेला मात्र दिसत नाहीत. कथाकारांनी त्या बरोबर टिपल्या आहेत. त्यातून वास्तवता सिद्ध होते, तद्वतच संस्कृतीतल्या समस्यांचा लेखाजोखा मांडते. लालित्यपूर्ण भाषा आणि संवाद या संग्रहाचं खास वैशिष्ठ्य आहे. संवेदनशीलता, अफाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर आजूबाजूला घडणार्‍या घटना नेमकेपणानं टिपलेले प्रसंग कथाबीज होऊन ते अंकुरलं आहे.

तो झोपलाय, माझ्या आत्महत्येला अन्य कुणी जबाबदार नाही, पुनरावृत्ती, तू सोबतीला हवी होतीस, ठिकरीची फोडणी, सावूची सखी शेवंता, सपनातला वामन्या, उजाड निवारा, एक उहान, प्रतीक्षा, परिवर्तन, रावसाहेब, वाट नेईल तिकडं, सर्वव्यापी बापूराव, निरोप, इटाल अशा एकूण सोळा कथा या संग्रहात आहेत. सर्व कथा वाचताना वाचकांच्या हृदयाला भिडतात.

वाचकाला खिळवून ठेवण्यात कथाकार यशस्वी झाले आहेत. कथानकाला साजेशी पात्रं, स्थळं, काल योजना, भाषा, प्रतिमा आणि प्रतिकांच्या शैलीने कथा विस्तारते त्यामुळे अधिक खोलवर परिणामकारक ठरते. प्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद देवडेकर यांच्या प्रस्तावनेने कथासंग्रह अधिक उंचीवर नेऊन ठेवला आहे. भाषा उच्च दर्जाची असली तरी सहज समजणारी आहे. या कथासंग्रहाने एकूणच मराठी कथेच्या वैभवात भर टाकली आहे.

=लेखक -अशोक कांबळे
=प्रकाशक – सकाळ मीडिया
=मूल्य-१९० रुपये, पृष्ठे-११६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -