घरसंपादकीयओपेडमाथेरानमध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ई-रिक्षाची प्रतीक्षा!

माथेरानमध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ई-रिक्षाची प्रतीक्षा!

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये ई-रिक्षा चालविण्याबाबत शक्यता पडताळून पाहण्यास सांगितल्यावर त्यानुसार सहा वेगवेगळ्या कंपन्यांनी नुकतीच दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन अशी ई-रिक्षा चाचणी घेतली. आता एकाच मार्गावर तीन महिने प्रायोगिक तत्वावर या रिक्षा चालवून संबंधितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय ई-रिक्षा चालविण्याबाबत अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष आहे. हातरिक्षा चालकांप्रमाणे घोड्याचा परवाना असलेल्या काहींनी ई-रिक्षा परवान्याची मागणी केली आहे. परंतु यात हातरिक्षा चालकांना प्राधान्य देण्याचा या चालकांचा आग्रह आहे.

महाराष्ट्रामध्ये जी काही मोजकी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे आहेत, त्यात रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील माथेरानचा समावेश होतो. किंबहुना, हे ठिकाण काहीसे हटके असे आहे. समुद्र सपाटीपासून २६०० फुट उंचीवर हे टुमदार शहर वसलेले आहे. विविध प्रकारची वृक्षराजी आणि पक्षी, प्राणीसंपदा ही माथेरानची श्रीमंती आहे. लाल मातीचे रस्ते, आल्हादायक वातावरण यामुळे देशी पर्यटकांप्रमाणे विदेशी पर्यटकही माथेरानकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असतात. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने तेथे नगर परिषदेची सुविधा दिली आहे. पाच हजार लोकसंख्येच्या या शहरात मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे काम नगर परिषद प्रशासनाकडून पार पडले जात असते. सध्या तेथे प्रशासकीय राजवट सुरू आहे.

इतक्या उंचीवरील हे ठिकाण कोणी शोधून काढले, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. माथेरानच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. इ. स. १८५० मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. तो उत्तम ट्रेकरही होता. त्याने त्या काळात अनेक ठिकाणी ट्रेकिंग करीत डोंगर, दुर्गम किल्ले पालथे घातले. त्याने दौर्‍यात चौक येथून एक डोंगर पाहिला. का कुणास ठाऊक, पण तो त्याकडे आकर्षित झाला. एका स्थानिकाला सोबत घेत आताच्या वन ट्री हिल पॉइंटवरून मॅलेट तो डोंगर चढला आणि रामबाग पॉइंटवरून खाली उतरला. डोंगराबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झाल्यामुळे दूरदृष्टी असलेला मॅलेट पुन्हा त्या डोंगरावर गेला. तेथे स्वतःसाठी घर बांधले. नंतर अनेक इंग्रजही या गिरीस्थानावर स्थायिक झाले. हेच गिरीस्थान पुढे माथेरान म्हणून नावरुपाला आले. हळूहळू या स्थानाची महती सर्वदूर पसरत गेली आणि अनेक हौशी पर्यटक मिळेल त्या वाटेने, घनदाट जंगलातील वाट तुडवत वर येऊ लागले. निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेऊन परतताना पुन्हा एकदा येण्याचा निश्चय केला जात होता.

- Advertisement -

माथेरानला येण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता. मळलेल्या वाटेवरूनच चालत किंवा घोड्यावरून प्रवास होत असे. या ठिकाणाची महती इतकी पसरली की पर्यटकांची संख्या वाढू लागली. पर्यटकांना येण्यासाठी रस्ते मार्ग नसल्याने आदमजी पिरभॉय या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने इ. स. १९०७ मध्ये मिनी ट्रेन सुरू झाली. नेरळ ते माथेरान मार्गावर धावणारी ही मिनी ट्रेन पुढे ‘माथेरानची राणी’ नावाने प्रसिद्ध झाली. या ‘राणी’ने पर्यटकांवर केलेले गारुड आजही कायम आहे. त्यावेळी माथेरानला येण्याचे हक्काचे साधन निर्माण झालेले असताना १९७४ च्या मे महिन्यात रेल्वे कर्मचार्‍यांच्या संपामुळे मिनी ट्रेनची सेवा ठप्प झाली.

माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढत असताना येण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने स्थानिकांनी पुढाकार घेत आणि एकजुटीचे दर्शन घडवत श्रमदानातून नेरळ ते माथेरान हा रस्ता तयार केला. माथेरानला येण्यासाठी हा एकमेव रस्ता असून, ८ किलोमीटर लांबीचा आहे. १९७८ मध्ये या रस्त्यावरून प्रवासी टॅक्सी सुरू झाली. स्वाभाविक पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माथेरानमध्ये अंतर्गत वाहतुकीसाठी घोडे आणि हातरिक्षा हाच पर्याय आहे. पर्यावरणदृष्ट्या हा भाग संवेदनशील ठरविण्यात आल्याने इंधनावर चालणार्‍या वाहनांना माथेरानमध्ये परवानगी नाही. अपवाद फक्त रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचा बंब यांचाच आहे. पोलिसांनाही तपासानिमित्त जा-ये करण्यासाठी घोड्याचा वापर करावा लागत असतो.

- Advertisement -

शहरात वाहनांना परवानगी नसल्याने मालवाहतुकीची समस्या अतिशय जटिल बनलेली आहे. साधारणतः ९० च्या दशकात रेल्वेनेही मालवाहतूक कायमची बंद केल्याने या समस्येने अधिकच गंभीर रूप धारण केले. १९९२ च्या सुमारास तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात मालवाहतुकीचे वाहन (टेम्पो) आणण्याची मुभा दिली होती. पण पर्यावरणवाद्यांनी त्यावर आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्यामुळे हा टेम्पोही बंद झाला. आता दस्तुरी नाक्यापासून घोड्यावर सामान लादून शहरात आणले जाते. ही वाहतूक खर्चिक असली तरी तूर्त याला पर्याय नाही. सद्यःस्थितीत हजार ते बाराशे घोडे मालवाहतुकीचे एकमेव साधन म्हणून काम करीत आहेत. यामुळे आणण्यात येणारे सामान महागडे ठरत आहे.

उदाहरणार्थ, एक सिलिंडर घरापर्यंत आणायचा असेल तर शंभर ते दीडशे रुपये अधिक खर्च होतात. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने इतर सामानाची आहे. त्यामुळे एका ठराविक वेळेत मालवाहतूक करणार्‍या टेम्पोला परवानगी देण्याची माथेरानकरांची मागणी आहे. मालवाहतुकीप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा प्रश्नही बिकट आहे. इंधनावरील वाहनांना परवानगी नसल्याने शहरांतर्गत प्रवासासाठी हातरिक्षा किंवा घोडे हेच दोन पर्याय आहेत. अर्थात यात घोड्यावरील प्रवासाला पर्यटक पसंती देतात. परंतु महिला, वृद्ध प्रवासी (किंवा पर्यटक) असतील तर हातरिक्षाचा वापर अनिवार्य ठरतो. शहरात अशा ९४ हातरिक्षा आहेत. त्या ओढण्यासाठी मालक आणि मजूर असे २५० हून अधिकजण आहेत. तर ४६० हून अधिक प्रवासी वाहतूक करणारे घोडे आहेत.

घोडे ही माथेरानची शान असल्याचे स्थानिक अभिमानाने सांगतात आणि त्यात तथ्यही आहे. खास घोड्यावरून रपेट करता येते म्हणून माथेरानमध्ये येणारे पर्यटकही आहेत. तसेच घोडेस्वारी (हॉर्स रायडिंग) करिता येणारी धनिक मंडळीही आहेत. परंतु हातरिक्षा व्यवसाय म्हणजे रक्ताचे अक्षरशः पाणी करणारा आहे. माणसाने माणसाला शरीराच्या नसा ताणेपर्यंत जोर लावून रिक्षातून नेणे ही खरं तर आधुनिक जमान्यात अमानवी वाटावी अशी पद्धत आहे. स्थानिकांप्रमाणे आदिवासी समाजातील अनेकजण या रिक्षा व्यवसायात आहेत. अनेकदा यांचे रिक्षा ओढणे पाहिल्यानंतर मन कासाविस होते. पण त्यांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी हे करावे लागत आहे.

त्यांची अशा अमानवी कामातून कायमची सुटका करावी म्हणून त्यांना सीएनजीवर चालणार्‍या किंवा ईलेक्ट्रिक (ई) रिक्षाचे परवाने द्यावेत अशी मागणी झाली. २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याची घोषणा झाल्यानंतर केंद्र सरकारने मॉनिटरिंग कमिटी अर्थात सनियंत्रण समितीची स्थापना केली. या समितीकडे असे परवाने देण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासाठी माजी शिक्षक आणि समाजसेवक सुनील शिंदे शासन दरबारी चकरा मारीत आहेत. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचल्याने न्यायालयाकडून सनियंत्रण समिती आणि शासनाला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

पुढे सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये ई-रिक्षा चालविण्याबाबत शक्यता पडताळून पाहण्यास सांगितले. त्यानुसार सहा वेगवेगळ्या कंपन्यांनी नुकतीच दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन अशी ई-रिक्षा चाचणी घेतली. आता एकाच मार्गावर तीन महिने प्रायोगिक तत्वावर या रिक्षा चालवून संबंधितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय ई-रिक्षा चालविण्याबाबत अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष आहे. हातरिक्षा चालकांप्रमाणे घोड्याचा परवाना असलेल्या काहींनी ई-रिक्षा परवान्याची मागणी केली आहे. परंतु यात हातरिक्षा चालकांना प्राधान्य देण्याचा या चालकांचा आग्रह आहे. घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक या ई-रिक्षाला किती पसंती देतील, हे सांगणे अवघड असले तरी या रिक्षाचा उपयोग ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून शाळेत पोहचणारे विद्यार्थी, तसेच रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांना नक्कीच होणार आहे.

शिवाय घोड्यावर बसू न शकणारे पर्यटक, विशेषतः ज्येष्ठ पुरुष आणि महिला, यांना ई रिक्षाचा पर्याय असणार आहे. या रिक्षांनी विविध पॉइंटवर न जाता ठराविक मार्गावरच धावावे असा एक सूर आहे. पण घोड्याव्यतिरिक्त प्रवासाचे अन्य साधन नसल्यामुळे डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या पॉइंटचा आनंद न घेता येऊ शकणारे पर्यटक जेव्हा ई रिक्षाचा आग्रह धरतील तेव्हा काय, या प्रश्नांची सोडवणूक आताच करून ठेवावी लागणार आहे. तर दुसरीकडे ई रिक्षाला रितसर परवानगी मिळाली तर इतर कारसारखी मोठी ई-वाहने माथेरानमध्ये घुसखोरीसाठी आग्रही राहणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. आपल्याकडे कायद्यातून पळवाटा शोधणारे कमी नाहीत. त्यामुळे ई रिक्षा हाच हा शहराचा वाहतुकीचा एकमेव पर्याय असेल, हे निश्चित झाले पाहिजे. किंबहुना, ई-रिक्षाशिवाय सरसकट ई वाहनांना परवानगी देण्याला माथेरानकर नक्कीच विरोध करतील, असे बोलले जाते.

ई-रिक्षा आल्यानंतर घोडे व्यवसायावर परिणाम होईल, अशी एकीकडे भीती व्यक्त केली जात असल्यामुळे ई- रिक्षाला अनेकांचा छुपा विरोधही आहे. घोडे व्यवसायातही स्थानिक आणि बाहेरचे असा वाद आहे. ई-रिक्षाचे समर्थन करणारे घोड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणावर कसा परिणाम होतोय, याकडे लक्ष वेधत आहेत. घोड्यांची लीद किंवा विष्ठेत मिथेन वायूचे प्रमाण लक्षणीय असल्याने ही लीद झाडांच्या मुळापर्यंत पोहचली की झाडे मरतात. आतापर्यंत हजारो झाडे मृत्युमुखी पडल्याकडे लक्ष वेधले जात आहे. एक घोडा दिवसात साधारण ५ किलो लीद टाकतो. पंधराशेहून अधिक घोडे आहेत असे गृहित धरले तरी साडेसात हजार किलो लीद तयार होते. पावसाळ्यात ही लीद वाहत आसपासच्या जंगलात पसरते. तेथे झाडे मरून पडत असल्याने पर्यावरणाला धोका पोहचत असल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. लीदेवर प्रक्रिया करून गॅस बनविण्याचा प्रकल्प नगर परिषदेने राबविला. पण तो बासनात गेल्यासारखा आहे. घोडे व्यवसायावरही अनेकांच्या कुटुंबांचे पालनपोषण चालते. हे लक्षात घेऊन लीदेच्या समस्येवर तातडीने मार्ग काढला पाहिजे. कारण घोडे हा माथेरानच्या पर्यटनाचा प्राण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

माथेरानमध्ये आजही ब्रिटिशकालीन कायदे पाळले जात असल्याचे बोलले जात आहे. माथेरान पर्यावरण अधिसूचनेत बदल करण्याची मागणी २०१८ मध्ये राज्याने केंद्राकडे केली होती. यावर काहीही निर्णय झाला नाही. माथेरानचे घोडे आणि पर्यायाने घोडेमालक, इतर नोकरही जगले पाहिजेत, तसे काळाची गरज म्हणून ई-रिक्षाचाही वापर झाला पाहिजे. रायगड रोपवेला सुरुवातीला तीव्र विरोध असताना काळाची गरज म्हणून तेथे रोपवे झालाच. असे अनेक ठिकाणी झाले आहे. त्यामुळे घोडे आणि ई-रिक्षा यात सुवर्णमध्य काढून दोन्ही व्यवसाय कसे हातात हात घालून कार्यरत राहतील याची काळजी घ्यावी लागेल. याकरिता स्थानिक राजकीय मंडळीना आपापसातील मतभेद ३८ पैकी एखाद्या पॉइंटवरून ढकलून द्यावे लागतील. शेवटी माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याची जाणीव सर्वांनी ठेवायची आहे.

माथेरानमध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ई-रिक्षाची प्रतीक्षा!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -