घरसंपादकीयओपेडराजकारणातील ‘लिव्ह इन’ म्हणजे ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’!

राजकारणातील ‘लिव्ह इन’ म्हणजे ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’!

Subscribe

भारतीय राजकारणात कधी काय घडेल, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आज एखाद्या पक्षावर शेलक्या भाषेत (सध्या हीच भाषा प्रचलित आहे) टीका करणारे उद्या त्याच पक्षात जाऊन बसतात. यामागे त्यांची असहायता जरी असली तरी, असहायता निर्माण करणारेही तेच असतात. अशा प्रकारे असहायतेत सापडलेल्यांना मदत करण्याचा आव आणला तरी, त्यांचा केवळ वापरच केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हेच तर पहायला मिळत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सध्या भाजपच्या कचाट्यात सापडलेले आहेत. मूळ पक्षापासून वेगळे होण्याचे आततायीपणाचे पाऊल त्यांनी उचलले आहे. ते आता भाजपबरोबर लिव्ह इनमध्ये राहात असल्याने त्यांना तडजोड करावी लागत असेल, मात्र लिव्ह इनमध्ये जोडीदाराला संपविण्याचे प्रकारही घडले आहेत. तसे काही होणार नाही, याची काळजी या दोन नेत्यांनी घ्यावी.

‘वापरा आणि फेका’ (Use and Throw) या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम झालेला दिसतो. त्यातूनच लिव्ह-इन-रिलेशनशिप वाढत आहेत, अशी टिप्पणी सुमारे दीड वर्षांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाने केली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर लगेचच एका घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने ही टिप्पणी केली होती, पण पावणेदोन वर्षांनंतर राजकारणातही ‘लिव्ह इन’चीच संस्कृती रुजत आहे आणि तिचे सूत्रही ‘यूज अँड थ्रो’ हेच असल्याचे सर्वांना दिसत आहे.

एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाले. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत त्यांच्यासह आमदारांचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाला. स्वत: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी मनातील खदखद बाहेर काढली. मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, पण गाडी तिथेच थांबते. मला पण राज्याचा प्रमुख व्हावे असे वाटते. मला राष्ट्रवादी काँग्रेस पुढे न्यायची आहे, असे ते म्हणाले होते. एवढेच नव्हे, तर गेल्या काही वर्षांत सातत्याने पक्षाच्या आमदार-खासदारांची संख्या घटत चालली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते, पण आताचे चित्र काय आहे? 2024च्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम चार ते पाच जागा मिळणार आहेत, असे सांगितले जाते. बारामती, रायगड, शिरुर आणि परभणी या जागांवर उमेदवार जवळपास निश्चित आहेत आणि त्यापैकी तीन जागांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे आणि परभणीतून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय, गेल्या वर्षाच्या अखेरीस कर्जतमध्ये झालेल्या पक्ष मेळाव्यात अजित पवार यांनी सातार्‍याच्या जागेचाही उल्लेख केला होता. आता ही जागा त्यांना खरोखरच मिळणार आहे का, हे स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

मागील निवडणुकीत (2019) राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील 48पैकी 19 जागा लढविल्या होत्या. एकूणच, खासदारांची संख्या वाढवण्याचा निर्धार करणार्‍या अजित पवार यांच्या पदरी सध्या तरी केवळ चारच जागा पडल्या आहेत. त्यातही त्यांच्या कोट्यातील एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यावी लागली, तर निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या आढळराव पाटील यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जाणार आहे. म्हणजेच, तेथील निष्ठावान कार्यकर्ता-नेता तसाच राहणार! आता या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला, असे गृहीत धरले (ते तूर्तास तरी शक्य दिसत नाही) तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या खात्यात तीनच जागा असतील. चौथी रासपची! याचाच अर्थ, 2019मध्ये चार जागा जिंकणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी तीनच जागा मिळणार. मग खासदारांची संख्या वाढवण्याची वल्गना कशासाठी? अशा स्थितीत, राज्याचे प्रमुख होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शाश्वती त्यांना अजूनही वाटते का? विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याला साथ देणार्‍या आमदारांच्या विजयाची हमी घेतली, पण खासदारांचे काय?

भाजपची मदत घेतल्यानंतर आपले अस्तित्व काय असेल, याचा विचार त्यांनी केला नसावा. कारण दरम्यानच्या काळात दोन पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होऊनदेखील स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची संधी त्यांना मिळाली नाही (न पेक्षा दिली गेली नाही). जून 2022 च्या बंडानंतर थेट फेब्रुवारी 2024 च्या राज्यसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार महाराष्ट्राने पाहिला. तोही या निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसमधून आलेला! मग, मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणार्‍या कथित ‘निष्ठावंतां’चे काय? आता लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल फारसे दिलासदायक चित्र दिसत नाही.

- Advertisement -

गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 25, तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते, पण आता जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. त्यात भाजप 35 हून अधिक जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना 12 ते 13 जागा मिळणार. त्यापैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांची तयारी केली आहे, तर शिवसेनेने आतापर्यंत आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर शिवसेनेचे रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून अलीकडेच काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश करणार्‍या राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे. त्यातच हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. त्यांची उमेदवारी मागे घेण्याची मागणीच भाजप नेते आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी केली आहे.

भाजपने आतापर्यंत 24 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिंदे गटाचे आठ, तर अजित पवार यांनी तीन जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. म्हणजे अजून 13 उमेदवारांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यात शिवसेनेच्या विद्यमान पाच खासदारांना पुन्हा संधी मिळते का, हा खरा प्रश्न आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. अजित पवार यांनी त्या निवडणुकीत 71 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याचा पण केला आहे, तर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला साथ देणार्‍या सर्व पन्नास आमदारांना विजयी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिकीट वाटपात या दोघांना आपापले गड राखता येतील का, हे पहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2014 पासून 2022 पर्यंत भाजपबरोबर जाण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी निर्णय बदलला. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच याची माहिती दिली आहे, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सध्याची स्थिती पाहता, शरद पवार यांचा माघार घेण्याचा निर्णय योग्य होता, असेच दिसते. शेवटी गाठीशी असलेला अनुभवच कामाला येतो. सरकार चालवायची आमच्यात धमक नाही का? राज्याच्या राजकारणात चार-पाच लोक आहेत, त्यात माझे नाव नाही का? अशी विचारणा अजित पवार यांनी वांद्रे येथील बैठकीत केली होती. तर त्याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. सप्टेंबर 2019 मध्ये राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांनी सत्ताधार्‍यांचे फासे उलटे फिरवले. या प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात होते. त्यावर शरद पवार यांनी आपण स्वत: ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे सांगताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. परिणामी, ईडीने शरद पवार यांना ईमेल पाठवून ‘सध्या चौकशीची गरज नाही’, असे कळवले होते. शिवाय, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांनी विनंती केल्यावर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचे रद्द केले आणि वातावरण निवळले. एवढी ताकद अजित पवार यांची आहे का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेना फुटीनंतर निष्ठा कायम ठेवणार्‍या पाच खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. याचे वेगळे संकेत जनमानसात गेले आहेत. त्यांच्या यादीतील दोन जागांबाबत काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला असला तरी, तो समजूतदारपणामुळे सोडवला जाईल, असे दिसते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी प्रगल्भता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कदाचित नसल्याने हे आततायीपणाचे पाऊल त्यांनी उचलले असावे. ते आता भाजपबरोबर लिव्ह इनमध्ये राहात असल्याने त्यांना तडजोड करावी लागत असेल, मात्र लिव्ह इनमध्ये जोडीदाराला संपविण्याचे प्रकारही घडले आहेत. तसे काही होणार नाही, याची काळजी या दोन नेत्यांनी घ्यावी. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाचा हा उद्देश यापूर्वीच जाहीर केला आहे, हे उल्लेखनीय.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -