उत्पादन शुल्क विभागाची मद्य तस्करीविराधात मोहिम

दमण बनावटीच्या दारू साठ्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (E) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोर: उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे जव्हार तालुक्यातील जव्हार सिल्वासा रस्त्यावर खिरारी पाडा भागात सापळा रचून केलेल्या कारवाईत सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कारवाईत स्कॉर्पिओ कारमधील वीस बॉक्स दमण बनावटीच्या दारू साठ्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (E) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यालगतच्या केंद्र शासित प्रदेशातून होणार्‍या मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकामार्फत दिवसरात्र गस्त घातली जात आहे. शुक्रवारी पहाटे उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दमण बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी रात्री जव्हार तालुक्यातील जव्हार सिल्वासा रस्त्यावरील खिरारी पाडा भागात सापळा रचला होता.पथकाने शुक्रवारी पहाटे एक संशयित स्कॉर्पीओ कार थांबवून कारची झडती घेतली घेतली असता कार मध्ये दमण बनावटीचा दारूचा साठा आढळून आला. दमण बनावटीच्या दारूच्या विक्रीसाठी महाराष्ट्र राज्यात बंदी असताना बेकायदेशीर वाहतूक आणि दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कायद्याच्या कलम 65 (E) नुसार गुन्हा दाखल करून कारसह दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.कार चालकासह एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईत सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाला यश आले आहे.