घरसंपादकीयओपेडमुंबई, नवी मुंबई...आता वेध तिसर्‍या मुंबईचे!

मुंबई, नवी मुंबई…आता वेध तिसर्‍या मुंबईचे!

Subscribe

दक्षिण मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील उरण तालुक्यातील चिर्ले या दोन ठिकाणांना जोडणार्‍या अटल सेतूचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. दळणवळणाच्या दृष्टीने या सेतूला अर्थात पुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथून पनवेल मार्गे मुंबईला जाणार्‍या वाहनांना आता इतका मोठा वळसा न घालता थेट चिर्ले गाठून मुंबईत जाता येणार आहे. तेथून मुंबई अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने रायगड आणि मुंबई खर्‍या अर्थाने हाकेच्या अंतरावर आल्याचे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. स्वाभाविक आता तिसर्‍या मुंबईची चर्चा अधिक वेगवान झाली आहे. मुंबई, नवी मुंबई ही जुळी शहरे गर्दी पेलण्याच्या पलीकडे गेली असल्याने तिसर्‍या मुंबईची गरज अनिवार्य ठरली आहे.

मुंबईचा विस्तार प्रचंड झाला असून ठाणे शहरही मुंबईचाच एक भाग वाटू लागले आहे. तिकडे डहाणूपर्यंत मुंबईतील गर्दी विस्तारत गेली आहे. सत्तरच्या दशकात मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईचा उदय झाला. सिडकोने हे नियोजित शहर वसवले. ठाणे खाडीचा अडसर नसता, तर मुंबई शहर केव्हाच पनवेलपर्यंत पोहचले असते. ठाणे खाडीवर तीन रस्ते वाहतुकीचे पूल, तर एक रेल्वे पूल आहे. मुंबईतील गर्दी काही प्रमाणात नवी मुंबईत विभागली गेली आहे.

आता नवी मुंबईचा श्वासही गर्दीने गुदमरू लागला आहे. नियोजनबद्ध शहर अशी नवी मुंबईची ख्याती असली तरी आता आजूबाजूच्या उपनगरांतून बेसुमार गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी वेडीवाकडी बांधकामे केली जात असल्याने नागरी सुविधांचे तीनतेरा वाजत आहेत. वाहनांचीही गर्दी प्रचंड वाढली आहे. नवी मुंबई वसविताना नियोजन करण्यात आले, पण पुढे गर्दी किती वाढू द्यायची याचे नियोजन नसल्याने सर्वत्र अस्ताव्यस्त पसारा झाला आहे. नवी मुंंबईची हद्द थेट खारपाड्यापर्यंत आहे. तेथे नवी मुंबई पोलिसांचा अंमल चालतो.

- Advertisement -

मुंबई, नवी मुंबईतील गर्दी हाताबाहेर गेल्याने तिसरी मुंबई वसविण्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेची उपनगरी सेवा आता कर्जतहून थेट खोपोलीपर्यंत पोहचल्याने हा भाग जणू मुंबईचाच वाटू लागला आहे. पनवेलच्या पळस्पेपासून खोपोलीपर्यंत हमरस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर हा भाग माणसांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. तिच परिस्थिती खारपाड्यापासून पेण, अलिबाग, वडखळपर्यंत झाली आहे. तेथेही बांधकामे होत आहेत.

त्यामुळे तिसरी मुंबई तयार करताना आजूबाजूला प्रचंड प्रमाणात जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. सिडकोची त्या दृष्टीने चाचपणीही सुरू आहे. मुंबई, नवी मुंबई याला आणखी एक पर्याय म्हणून तिसर्‍या मुंबईची निर्मिती अनिवार्य असली तरी त्यात काटेकोर नियोजनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. आज जागा मिळेल तेथे बांधकामे केली जात आहेत. अनेकदा बांधकामे अनधिकृत असली तरी पाणी, विजेची सुविधा लिलया उपलब्ध होत आहे. तिसर्‍या मुंबईला पाणी देताना आणखी एखाद्या जलाशयाची गरज भासणार आहे. आज नवी मुंबईला हेटवणे, मोर्बे येथून पाणी पुरवठा केला जात आहे. तिसर्‍या मुंबईला धरणाची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे.

- Advertisement -

तिसरी मुंबई वसविताना स्थानिक माणूस ‘अदृश्य’ होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तेथील जमिनीला सोन्याचा भाव येणार असल्याने अर्थातच जमिनी विकण्याकडे कल वाढणार आहे. चार दिवसांपूर्वी याच मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी बोट ठेवले आहे. शेतकरी किंवा स्थानिक माणूस आपली जमीन विकून दुसरीकडे जात आहे, तर मूळ भूमिपुत्राच्या जमिनीवर दुसरेच आले आहेत.

आजमितीला पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, पेण, अलिबाग या भागात जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. यापैकी बरीच जमीन बिगर स्थानिकांच्या हातात केव्हाच गेली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे जमीन आहे, त्यापैकी अनेकजण जमीन विकण्यासाठी अधीर आहेत. तिसर्‍या मुंबईचे सूतोवाच झाल्याने जमिनीचे भाव अजून गगनाला भिडणार आहेत. या जमीन विकू पाहणार्‍या स्थानिकाला आता कुणी तरी समजून सांगायला पाहिजे की बाबारे जमीन विकू नको.

तिसर्‍या मुंबईच्या निर्मितीनंतर रायगड जिल्ह्याचा चेहरामोहरा पुरता बदलणार आहे. ऐतिहासिक ठिकाणे, प्रशस्त समुद्र किनारे ही रायगडची ओळख आहे. तिसरी मुंबई तयार होताना या अशा ठिकाणी विस्कळीतपणा येणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. रायगडात अनेक ठिकाणी कारखानदारीही असून त्यापैकी अनेक कारखाने प्रदूषणकारी आहेत. रायगडची वस्ती वाढत असताना यापुढे प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. नवीन शहर किंवा वसाहत तयार करताना डोंगर कापले जातात आणि पर्यायाने जंगल संपत्तीचाही त्यात नाश होतो.

तिसरी मुंबई तयार करताना हे होणारच आहे. उरण, अलिबाग या पट्ट्यातील डोंगर भागावर गदा येऊ शकते. मध्यंतरी राज ठाकरे बोलले, अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्याचे वाटोळे अटळ आहे, पण तसे होऊ देता कामा नये. गरज आहे ती स्थानिकांना योग्य त्या मार्गदर्शनाची! जमीन विकून येणारा पैसा कुठे गुंतवायचा हे अनेकांना ठाऊक नाही. त्यामुळे ट्रक, दागिने, एखादे घर याच्यात पैसा गुंतवला जातो. वाहतुकीच्या व्यवसायात कोणताही अनुभव नसल्याने अनेकांची वाहने जप्त झाली. यासाठी मार्गदर्शन गरजेचे आहे. रायगडात तिसर्‍या मुंबईमुळे जागांचे भाव पुन्हा गगनाला भिडणार आहेत. आताच हे भाव कोटींची उड्डाणे घेत आहेत.

भविष्यात रेवस ते रेड्डी (जिल्हा सिंधुदुर्ग) हा मार्ग तयार झाल्यानंतर तिसर्‍या मुंबईची व्याप्ती अधिक वाढणार आहे. येत्या काही दिवसात रेवस ते करंजा पुलाचे काम पूर्ण झाले की मुंबई शहर अलिबागच्या अधिक जवळ येणार आहे. याचाच अर्थ अलिबाग आणि पेणच्या टापुत लोकसंख्या वाढणार आहे. त्यातच मुरुड तालुक्यातील काशीद येथे जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते काशीद अशी प्रवासी, रो-रो सेवा सुरू होईल. त्यामुळे तेथूनही मुंबई जवळ आल्यासारखी होणार आहे.

मुंबईतून रायगडात येण्यासाठी असे वेगवेगळे मार्ग उपलब्ध झाल्यानंतर मुंबईतील गर्दींचे विकेंद्रीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. दुसरीकडे, खोपोलीपासून पाली मार्गावरही प्रचंड निवासी बांधकामे सुरू आहेत. त्याच्या पुढे नागोठणे, रोहे, कोलाड या पट्ट्यातही औद्योगिकीकरणाबरोबर निवासी वसाहतींच्या बांधकामांना वेग आलेला आहे. पूर्वी तळकोकणातून मुंबईकडे येताना महाडपासून पनवेलपर्यंतचा प्रवास जंगल भागातून, तुरळक वस्तींतून होत असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

शहरांचे असे वेगवेगळ्या मार्गांनी विस्तारीकरण सुरू होत असताना तिसरी मुंबई नेमकी कुठून सुरू होणार, हा सवाल उपस्थित झाला तर आश्चर्य वाटणार नाही. रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली, तर याच्या चारही बाजूने नागरीकरणाचा वेग वाढत असल्याचे लक्षात येईल, परंतु अनेक ठिकाणी नियोजनाअभावी नागरी सुविधांवर असह्य ताण येत असल्याचे लक्षात येते. यावर कुणी आवाज उठवत नसल्याने मनमानीपणे बांधकामे केली जात आहेत. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात टपर्‍या, भंगार गोडाऊन असे सारे बिनदिक्कतपणे उभे राहत आहे.

पनवेलसारखे शहरही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहे. तिसरी मुंबई तयार होताना असे काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या शहराचे सुंदर रुपडे अनधिकृत बांधकामे खराब करून टाकत असतात. वाहत्या गंगेत हात धुवून घेणार्‍या महाभागांना आपल्याकडे तोटा नसतो. मुंबई-गोवा महामार्ग असो किंवा मुंबई-पुणे महामार्ग असो, यांच्या दोन्ही बाजूला अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे. भविष्यात तिसरी मुंबई आपल्या जवळ येणार म्हणून आसपास अशी हजारो अनधिकृत बांधकामे होणार आहेत. यांना आवरण्याची गरज आहे.

अटल सेतूमुळे उरणचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. आताच हा भाग जुळ्या मुंबईसारखा वाटत आहे. उरणहून पेणकडे जाण्यासाठी दादर (तालुका पेण) मार्गे रस्ता आहे. काळाची गरज ओळखून हा रस्ता आता प्रशस्त होईल. परिणामी कधीकाळी मागासलेल्या या भागाचे खूप चांगल्या स्वरुपात परिवर्तन होणार आहे. या रस्त्यामुळेच तिसरी मुंबई पेणपर्यंत पोहचणार आहे. पेणमध्ये जागांचे भाव वाढणार असून तेथून कामार्ली-खोपोली मार्गावरील जागांचे भावही तेजीत येणार आहेत.

रायगड जिल्ह्यात मोठाले उद्योग येऊ घातल्याने लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर राहण्याचे जागांचे नवेनवे पर्याय शोधले जातील. यातून पारंपरिक निसर्ग संपन्नतेला हानी पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. गावातील जागा अपुर्‍या ठरू लागल्याने वस्त्या डोंगरांच्या पायथ्यापर्यंत पोहचल्या आहेत. यात वनसंपदेची हानी होत असल्याकडे कोणाचेही लक्ष नाही. यातूनच वन्य प्राण्यांचे नागरी वस्त्यांशी ‘सख्य’ नको तेवढे वाढले आहे. तिसरी मुंबईची निर्मिती करताना जंगल संपदेची जी नासाडी होणार आहे, त्यात वन्यजीवांची काळजी घेतली गेली पाहिजे.

काळ बदलेल तशा गरजाही बदलतील. भविष्यात तिसरी मुंबईही कदाचित हाऊसफुल होऊन जाईल. मग चौथ्या मुंबईची गरज भासेल! जे काही व्हायचे ते होऊ देत, आपल्या बर्‍याचशा पारंपरिक खेडेगावांची नावे मात्र यात कायमची पुसली जाणार आहेत.

मुंबई, नवी मुंबई…आता वेध तिसर्‍या मुंबईचे!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -