घरसंपादकीयओपेडचहापेक्षा किटली गरम, पोस्टपेक्षा कमेंट भारी!

चहापेक्षा किटली गरम, पोस्टपेक्षा कमेंट भारी!

Subscribe

मोबाईलवर रिल्स पाहणारा समाज आणि पोस्टखाली कमेंट करणारा समाज यामध्ये एक मूलभूत फरक नक्कीच आहे. रिल्स पाहणार्‍याला नुसतेच मनोरंजन हवे आहे. त्याला फारसा विचार करायचा नाही, पण कमेंट करणारी व्यक्ती सभोवताली घडणार्‍या घडना, घडामोडी यांच्याबद्दल सजग आहे. त्याला विसंगती दिसत आहे, दिखावूपणा जाणवत आहे, त्रुटी तो हेरतो आहे आणि या सगळ्यासोबतच तो हे सगळं बिनधास्तपणे समोरच्याला दाखवूनही देत आहे. त्याच्यामध्ये हिंमत आहे. त्याला एकसुरी व्हायचे नाही. त्याला समोरच्याला प्रश्न विचारायचे आहेत. राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षांच्या हँडलवर केल्या जाणार्‍या पोस्टखाली येणार्‍या कमेंट्स पोस्टपेक्षा भारी अशाच असतात.

सध्या वातावरण तापू लागलंय. एकीकडे उन्हाचा पारा वर जातोय आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही गरम होऊ लागलंय. वाद-विवाद, टीका-प्रत्युत्तर, हल्ला-प्रतिहल्ला असं सगळं सुरू आहे, पण या सगळ्याचा लंबक सध्या सोशल मीडियाकडे वळला आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे राष्ट्रीय नेते, प्रादेशिक नेते, स्थानिक नेते, उपनेते सोशल मीडियावर सक्रिय झालेत. जे या व्यवस्थेत सक्रिय नाहीत, त्यांना अलगदपणे बाजूलाही केले जात आहे.

आपली बाजू मांडण्यासाठी, मुद्दा पटवून देण्यासाठी, जुन्या गोष्टी उकरून काढण्यासाठी, नवी स्वप्ने दाखवण्यासाठी, आश्वासने देण्यासाठी, न पाळलेली आश्वासने आठवून देण्यासाठी सर्वाधिक वापर कशाचा केला जातोय, असा प्रश्न अगदी सहजपणे कोणालाही विचारला तर त्याचे उत्तर सोशल मीडिया असेच येते. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यू ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप या सगळ्याच व्यासपीठांच्या सहाय्याने आपापला अजेंडा पुढे घेऊन जाण्याचे काम चालू आहे.

- Advertisement -

आकडेवारी बघितली तर या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये भारतात ४६.२ कोटींच्या घरात लोक सोशल मीडियाचा वापर करीत होते. देशाचा एकूण विचार केला तर ३२.२ टक्के लोक त्या महिन्यात सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होते. हा आकडा निश्चितच कमी नाही. देशातील एवढे लोक जर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतील, तर प्रचाराच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व नक्कीच वाढते. त्यातूनच मग रिल्स, मीम्स, कार्ड्स, स्टोरीज, स्टेटस, लाईव्ह अशी सगळी हत्यारे उपसून त्यातून आपला मुद्दा आपल्या फॉलोअर्सपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो.

अलीकडच्या काळात घासून गुळगुळीत झालेला शब्द म्हणजे नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह सेट करणे हे वाक्य तर दिवसातून एकदा तरी कुठून ना कुठून ऐकायला मिळतेच. हे नॅरेटिव्ह सेट करण्याचे कामही सोशल मीडियावरच येऊन पडले आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी लागणार्‍या पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचविल्या जातात. काही राजकीय पक्ष यामध्ये एकदम पारंगत झाले आहेत. कधी कोणता मुद्दा पुढे आणायचा, कोणत्या मुद्यावर तावातावाने व्यक्त व्हायचे, कोणता मुद्दा आला की आळीमिळी गुपचिळी व्हायचे हे त्यांना चांगले माहिती असते. काही वेळा काहीच न बोलण्यातूनही समोर जे घडते आहे त्याला अप्रत्यक्षपणे तुम्ही पाठिंबाच तर देत असता.

- Advertisement -

निवडणुकीच्या धामधुमीमुळे सोशल मीडियावर सध्या राजकीय स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढले आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या, नेत्यांच्या पोस्ट लोकांच्या फीडमध्ये येत असतात. आम्ही केलेली कामे, त्यांनी न केलेली कामे, आमचे कसे बरोबर, त्यांचे कसे चूक, आजच्या बैठका, उद्याचे प्लॅनिंग असे सगळेच पोस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविले जाते. त्यापैकी काही पोस्टना चांगली एंगेजमेंटही मिळते. म्हणजेच लोक त्या पोस्ट लाईक करतात, त्यावर कमेंट करतात आणि गरज पडली तर आपल्या वॉलवर शेअरही करतात.

पण या एंगेजमेंटमध्ये सर्वाधिक मजेशीर काही असेल तर या पोस्टखाली येणार्‍या कमेंट्स. सहज म्हणून या कमेंट्स बघितल्या तर अनेक वेळा वर दिलेल्या पोस्टमधील फोलपणा समोर येतो किंवा अगदी मार्मिक शब्दांत पोस्टवर टीका केलेली असते. या कमेंट्स वाचताना एक गोष्ट अनेकांच्या मनात येते. कसं सुचतं यांना हे सगळं? एकतर पोस्टच्या तुलनेत अत्यंत कमी शब्दांत कमेंट लिहिलेली असते, पण त्यातून त्या पोस्टमधील विसंगती, खोटारडेपणा ठळकपणे उघड केला जातो.

पोस्टमध्ये केलेल्या दाव्यातील फोलपणा एका वाक्यात निकाली काढला जातो. त्यामुळेच या कमेंट्स रंजक होत जातात. त्यातही जर पोस्टखाली एकतर्फी कमेंट्स येत असतील आणि मध्येच एखाद्याने त्याला छेद देणारी दुसरीच कमेंट केली तर मग तिथल्या चर्चेला आणखी धार येते. कधी कधी असंसदीय शब्दही अगदी सहजपणे वापरले जाऊ लागतात, पण एवढं सगळं होऊनही विरोधी मत मांडणारे किंचितही न घाबरता आपले मत मांडत राहतात. त्यांना धमकावले तरी ते अजिबात बधत नाहीत. या कमेंट्स वाचताना राज्यघटनेने आपल्याला दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे याची नक्कीच आठवण येते.

राजकारणाशी जवळचा संबंध असलेल्यांना एक वाक्य चांगले माहिती असेल. चहापेक्षा किटली गरम. अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी त्यांच्या भाषणात हलके-फुलकेपणाने याचा वापर केला आहे. राजकीय नेत्यांचे वैयक्तिक सहाय्यक अर्थात पीए हे त्या नेत्यापेक्षा जास्त रुबाब दाखवतात. त्यालाच उद्देशून हे वाक्य सर्रास वापरले जाते. राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षांच्या हँडलवर केल्या जाणार्‍या पोस्टखाली येणार्‍या कमेंट्स पोस्टपेक्षा भारी अशाच असतात. पोस्टखाली येणार्‍या कमेंट्स वाचणे हे मोबाईलच्या स्क्रिनवर रिल्स पाहण्यासारखेच आहे. वेळ कसा गेला आणि किती मजा आली याचे मोजमापच करता येत नाही.

महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याची पोस्ट मध्यंतरी सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध झाली होती. त्यावर एका वाचकाने लिहिले होते की, मी तर फक्त या पोस्टवर येणार्‍या कमेंट्स वाचायला आलो आहे. माझ्यासारखे अजून कोणी आहेत का, असतील तर या कमेंटला लाईक करा. अनेक लोकांनी त्या कमेंटला लाईक केले होते. कमेंटची अजून एक गंमत म्हणजे ती करणारे हे तुमच्या-आमच्यासारखे सामान्य लोकच असतात. एखाद्या राजकीय पक्षाच्या वॉर रूममधले पेड कार्यकर्ते नसतात. त्यामुळे त्यांच्या कमेंट्स या वस्तुस्थितीला धरून तर असतातच शिवाय त्यामधून लोकांचे मूळ प्रश्न अगदी नेमकेपणाने समोर येतात.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मेट्रोच्या कामासंदर्भात एका राजकीय पक्षाने पोस्ट केली होती. मेट्रोमुळे पुणेकरांचे आयुष्य कसे सुखकर होणार आहे, असे त्यामध्ये म्हटले होते. त्यावर एका वाचकाने थेटच विचारले की, मेट्रो वगैरे ठीक आहे पण मुळात इथली पीएमपीएमएलची म्हणजे सार्वजनिक बस वाहतुकीची स्थिती कधी सुधारणार. या कमेंटमधून स्थानिक लोक आपला रोष तर व्यक्त करीत असतातच तसेच व्यवस्थेतील त्रुटींवरही ते नेमकेपणाने बोट ठेवतात.

अलीकडे करायचे चिमूटभर आणि दाखवायचे मूठभर असा ट्रेंड सगळ्याच क्षेत्रात आला आहे. राजकारणी त्यात मागे कसे राहतील. त्यामुळे नवी स्वप्ने दाखवताना आधी दाखवलेल्या स्वप्नांचे काय झाले, याची उत्तरे द्यायचे ते सोयीस्करपणे टाळतात. आजचे सत्ताधारी कालच्या विरोधकांवर टीका करतात आणि विरोधक तर कायम सत्ताधार्‍यांना विरोध करण्यातच मश्गुल असतात. या सगळ्या गदारोळात मूळ प्रश्न काय आहेत याकडे सगळेच कानाडोळा करतात.

नागरिकांना आपले मत मांडायला सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम वाटत आहे. मोबाईलमुळे समाजात वाढलेला एकलकोंडेपणा, व्यग्र दिनचर्या यामुळे भेटून एकमेकांशी बोलायला वेळ मिळतो कुठे अशी स्थिती आहे. पूर्वी जसे लोक गावात पारावर बसून बोलायचे तसे आता सोशल मीडियाच्या कट्ट्यावर येऊन बोलतात. सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांवर, विविध पोस्टखाली केलेल्या कमेंट्स राजकीय नेते, पक्ष वाचत असतील.

अशी त्यांची भाबडी समजूत नक्कीच नाही, पण समोर जे काही सुरू आहे ते डोळे झाकून आम्ही स्वीकारतो आहोत. तुम्ही जे काही सांगता आहात ते सगळं आम्हाला खरंच वाटतंय, अशी समजूत राजकीय नेत्यांनी किंवा पक्षांनीही करून घेऊ नये, असेच त्यांना आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून सांगायचे असते. त्यामुळे या कमेंट्स नीटपणे वाचल्या तर त्या तिरकस असल्याचे ठळकपणे दिसते. त्यात हलक्या-फुलक्या शब्दांत समोरच्या व्यक्तीला घायाळ करण्याची क्षमता असते.

मोबाईलवर रिल्स पाहणारा समाज आणि पोस्टखाली कमेंट करणारा समाज यामध्ये एक मूलभूत फरक नक्कीच आहे. रिल्स पाहणार्‍याला नुसतेच मनोरंजन हवे आहे. त्याला फारसा विचार करायचा नाही, पण कमेंट करणारी व्यक्ती सभोवताली घडणार्‍या घडना, घडामोडी यांच्याबद्दल सजग आहे. त्याला विसंगती दिसत आहे, दिखावूपणा जाणवत आहे, तो त्रुटी हेरतो आहे आणि या सगळ्यासोबतच तो हे सगळं बिनधास्तपणे समोरच्याला दाखवूनही देत आहे. त्याच्यामध्ये हिंमत आहे. त्याला एकसुरी व्हायचे नाही. त्याला समोरच्याला प्रश्न विचारायचे आहेत. त्याला उत्तरे हवी आहेत. समाजात असे लाखो लोक आहेत, त्यांचेच प्रतिनिधित्व तो करीत आहे. म्हणूनच चहापेक्षा किटली गरम आणि पोस्टपेक्षा कमेंट भारी, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -