घरसंपादकीयओपेडपश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

Subscribe

पश्चिम महाराष्ट्र हा पाणी आणि नैसर्गिक साधन संपत्तीने सधन असलेला प्रदेश. त्यासोबतच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळी पट्टा म्हणूनही ओळखला जातो. दूध संघ, साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांवर पूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांचे वर्चस्व राहिलेले. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा गड म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. तेव्हा शरद पवारांचे वर्चस्व या भागावर कायम राहिले आहे का, याचीही परीक्षा यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. बारामतीमध्ये ज्यांचे वर्चस्व राहणार तीच येत्या काळात खरी राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे हेही तेवढेच सत्य आहे. त्यामुळे ही लढाई कौटुंबिक असेल नाहीतर वैचारिक, पण राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांना निकराचा लढा यंदा द्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक यांचा समावेश आहे. या पाच मतदारसंघांत प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढत आहे. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीला विदर्भातून सुरुवात झाली असली तरी खरी रंगत ही पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीत येताना दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात दोन्ही शिवसेनेने हसत हसत आपल्या मतदारसंघांचा त्याग आणि उमेदवारांची नाराजी ओढवून घेतली, मात्र पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसचा रोष ओढावून घेत एका मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद सांगली ते दिल्लीपर्यंत गेला. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय तथा आर्थिक आणि औद्योगिकदृष्ठ्या श्रीमंत जिल्हा म्हणून पुणे ओळखले जाते.

- Advertisement -

सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचे राजकारण हे महाराष्ट्रावर परिणाम करणारे ठरते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राने राज्याला दिले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे वंशजही पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात स्वत:चं वेगळं स्थान राखून आहेत. छत्रपतींचे दोन्ही वशंज यंदा लोकसभेच्या रिंगणात आहेत.

मराठा आणि धनगर समाजाची या विभागात निर्णायक मतदारसंख्या आहे. राज्याच्या राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे, ते पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेतृत्वाच्याच जोरावर. राज्यात बहुतेक काळ पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाचेच राज्य राहिले आहे. त्याची सुरुवात यशवंतराव चव्हाणांपासून झाली. त्यानंतर वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचे हे वर्चस्व कायम ठेवले. अलीकडच्या काळात सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.

- Advertisement -

एकंदरीत काँग्रेसचे या विभागात वर्चस्व राहिले. याच वर्चस्वाला धक्का देण्याचे काम यंदा भाजप येथे करताना दिसत आहे, मात्र यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत बहुतेक मतदारसंघांत घडवून आणली आहे. भाजपने सोलापूरमध्ये काँग्रेसविरोधात उमेदवार दिला आहे, तर सांगली आणि सातारा या दोन मतदारसंघांतच भाजप अनुक्रमे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात लढत देत आहे.

महायुतीने उमेदवारी जाहीर करण्यात भरपूर वेळ घेतला. त्या तुलनेत महाविकास आघाडीने लवकर उमेदवार जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत आघाडीच्या उमेदवारांची मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे, तर महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात घातलेला घोळ यामुळे उमेदवारांना अतिशय कमी वेळ मिळणार आहे. बारामतीचेच उदाहरण घेतले तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सुटणार हे आधीपासून स्पष्ट असताना सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर करण्यास खूप वेळ घेण्यात आला.

अशीच परिस्थिती उदयनराजे भोसले यांच्याबाबतदेखील झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेराव्या वंशजांना तिकिटासाठी दिल्लीवारी करावी लागली. तोपर्यंत महाविकास आघाडीने शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करून टाकली. शरद पवारांनी निष्ठावान शशिकांत शिंदेंवर दाखवलेला विश्वास हा महत्त्वाचा मानला जात आहे. सातारकर कायम शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

२०१९ ची सातार्‍यामधील पावसातील सभा राज्याचे राजकीय वातावरण बदलवणारी ठरली होती. शरद पवारांचा ऐरा संपला असा प्रचार भाजप आणि देवेंद्र फडणवीसांकडून केला जात होता, मात्र सातार्‍यातील सभेने लोकसभेची पोटनिवडणूकच नाही तर विधानसभेचेही वातावरण बदलून टाकले. यंदा सातारकर गादीचा मान राखणार की शरद पवारांना साथ देणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत. सर्वसामान्यांचा साथीदार, आपला माणूस अशी पक्षापलीकडे धंगेकरांची ओळख आहे. पोटनिवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर, असा सवाल केला होता. त्याला भाजपचा गड मानल्या जाणार्‍या कसबा पेठेतील मतदारांनीच दाखवून दिले की धंगेकर कोण आहेत.

मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचा एक गट नाराज आहे. सत्तेच्या जवळ असलेले मोहोळ यांनाच सर्व पदे दिली जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे, तर मनसे सोडून वंचितमध्ये दाखल झालेले वसंत मोरे यांचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स त्यांना मतदानात किती मदत करतात यावरही मोहोळ आणि धंगेकरांचे गणित अवलंबून राहणार आहे.

बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या जोरदार वाक्युद्ध रंगले आहे. अजित पवार हे शरद पवारांचा थेट नामोल्लेख टाळून वडीलधारी माणसे, सासू अशी रुपकं वापरत थोरल्या पवारांवर हल्लाबोल करीत आहेत, तर सुप्रिया सुळे अजूनही नातं आणि राजकारण एकमेकांच्या आड येणार नाही अशी सामंजस्याची भूमिका घेऊन ही कौटुंबिक नाही तर वैचारिक लढाई असल्याचे सांगत आहेत.

या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे फुटलेल्या दोन्ही पक्षांध्येच प्रामुख्याने लढती होत आहेत. मग ती बारामतीची असेल नाहीतर कल्याणची. शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होताना दिसत आहे. यात कोणीही हरले आणि कोणीही जिंकले तरी भाजपच्या दृष्टीने एक विरोधक संपलेला असणार आहे. गोष्टीच्या रूपाने हे समजून घ्यायचे झाले तर आंबा सर्वांनाच हवा आहे.

पण तो झाडावर जाऊन तोडायचा असेल तर शेजारच्या बाळूला झाडावर चढवले जाते. तो व्यवस्थित झाडावर चढला आणि आंबे तोडले तर आमरसाचा बेत. जर तो झाडावरून पडला आणि त्याचे काही बरेवाईट झाले तर त्याच्या श्राद्धाचे जेवण असा दुहेरी फायदा शेजारच्यांना होतो. तोच या निवडणुकीत बारामती आणि कल्याणमध्ये भाजपला होताना दिसत आहे.

शिरूरमध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध अढळराव सामना रंगला आहे, मात्र यंदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी लढत शिरूरमध्ये होत आहे. महायुतीत शिवसेनेच्या कोट्यातील ही जागा अजितदादांची राष्ट्रवादी लढवत आहे, मात्र त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या अढळरावांच्या हाती घड्याळ बांधले आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. म्हणजे शिवसेनेचा उमेदवार निवडणूकही लढवत आहे आणि मतदारसंघात राष्ट्रवादीचे चिन्हही कायम राहिले आहे.

ही झाली राजकीय तडजोड, मात्र जनता, शिरूरचे मतदार या तडजोडीला कसे स्वीकारतात हे पाहावे लागणार आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला, मात्र आघाडी धर्म पाळत काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला हा मतदारसंघ सोडला. यामुळे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील कशी लढत देतात आणि विशाल पाटलांची बंडखोरी कोणाला गोत्यात आणते हे ४ जूनला समजेलच, पण पश्चिम महाराष्ट्रातील हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे भाजप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बंडखोराशीही सामना करीत आहे.

कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना काँग्रेसचे शाहू महाराजांचे तगडे आव्हान आहे. कोल्हापूरकर कोणाला साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, तर सोलापूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे, मात्र यंदा दोन्ही पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपकडून राम सातपुते, तर काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे.

प्रणिती शिंदे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मतदारसंघ पिंजून काढला आहे. काँग्रेस आपला गेलेला गड प्रणिती शिंदेंच्या माध्यमातून पुन्हा मिळवणार का, हे लवकरच कळेल. पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवत आहे. यात त्यांचे २ विद्यमान खासदार आहेत. एका मतदारसंघात शरद पवारांची मुलगी स्वत: उमेदवार आहे. त्यामुळे ही निवडणूक शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -