देशातील लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा सगळ्याच पक्षांवरील आणि इच्छुक उमेदवारांवरील दबाव वाढत जात असून हृदयाची धडधड वाढत आहे. मेरा क्या होगा, असा प्रश्न प्रत्येक इच्छुकाला पडलेला आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याविषयी कुतूहल आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळणार याविषयी प्रचंड कुतूहल आहे. कारण महाराष्ट्रात भाजपने सत्ता मिळवण्यासाठी अडीच वर्षे प्रचंड मेहनत घेतली होती.
त्यासाठी त्यांनी केंद्रातील आपल्या बहुमताच्या सत्तेचा भरपूर वापर करून घेतला. त्याचसोबत २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली होती. त्याला उद्धव ठाकरे यांचा निर्णय कारणीभूत ठरला होता. त्यामुळे भाजपचा पुरता अपेक्षाभंग झाला होता. तसेच २०१९ ची विधानसभा निवडणूक ही आमच्यासाठी केवळ एक औपचारिकता आहे, मी पुन्हा येईन, अशीच भावना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती, पण उद्धव ठाकरे यांनी इरेला पेटून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे सगळे चित्र बदलले.
उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सगळी पारंपरिक राजकीय समीकरणे उलटीपालटी झाली. कारण शिवसेना हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक राजकीय शत्रू मानला जाणारा पक्ष होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कायम खरडपट्टी काढली होती. सोनिया गांधी यांच्यावर बोचरी टीका केली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांना सत्तेत बसवले आणि त्यांच्या पालखीचे भोई होणे पसंत केले. ही गोष्ट महाराष्ट्रात फार मोठे राजकीय परिवर्तन घडवणारी होती. आपण असे करणे हे वैचारिकदृष्ठ्या चुकीचे आहे हे त्या दोन्ही पक्षांना पटत होते, पण भाजप आपला दीर्घकालीन शत्रू आहे. त्याला रोखण्याची ही एक संधी आहे हे लक्षात आल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जी महाविकास आघाडी केली आहे त्यामुळे त्यांची मोठी वैचारिक तोडमोड झालेली आहे. कारण हे दोन पक्ष शिवसेनेला कायम धर्मवादी, जातीयवादी, प्रांतवादी म्हणून हिणवत होते, पण त्याच पक्षाच्या नेत्याला त्यांना खांद्यावर घ्यावे लागले आणि मुख्यमंत्री बनवावे लागले. त्यातून खरे पाहता स्वत:ला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणवून घेणार्या या दोन पक्षांचे नुकसान झाले आहे. कारण शिवसेनेची भूमिका या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांना पटणारी नाही.
कारण ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्ताच काम करत असतो. त्याला त्या ठिकाणी अडचण येत असते. तीच परिस्थिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीही होते. त्यात पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडून ते पार विस्कळीत झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर भाजप आणि मित्रपक्षांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून फारशी ताणाताण दिसत नाही, पण महाराष्ट्रात मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीमध्ये ताणाताण दिसत आहे.
इतकेच नव्हे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून ताणाताण सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी सरमिसळ झाली आहे की हा गुंता सोडवणे फारच अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सामूहिक निर्णय होण्याअगोदर आपले उमेदवार आपणच जाहीर करून मोकळे झाले आहेत. काहींनी तर स्वत:चे नाव स्वत: घोषित करून अभिनंदनाच्या मिरवणुका काढून त्यात मिरवून घेतले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे जरी सध्या केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करून तडीपारची भाषा करत असले तरी त्यांचा सगळा जीव हा महाराष्ट्रात अडकलेला आहे. कारण मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांच्या आघाडीला एका सक्षम नेत्याची गरज आहे. तसे नेतृत्व सध्या विरोधकांकडे दिसत नाही. त्यामुळे आपण कितीही आगपाखड केली तरी मोदींवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही याची कल्पना उबाठा आणि शरद पवार यांच्या गटांना आहे.
त्यामुळे ते एका बाजूला टीका करताना दुसर्या बाजूला त्यांचे सगळे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे मुख्य केंद्र महाराष्ट्र आहे. त्याचसोबत भाजपने शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतले आहे. बहुमत आपल्याकडेच आहे असे दाखवून शिंदे आणि पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला आणि त्याची मालकी मिळवली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून ही मालकी त्यांना देण्यात आली असली तरी लोकांच्या मनातील नाराजीचा सामना त्यांना करावा लागणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
त्यामुळे राज्यातील सरकार कुठल्याही निवडणुकांना सामोरे जायला तयार नाही. कारण निवडणुकीत लोकांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसण्याची शक्यता आहे याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी परिस्थिती अनुकूल होईल यासाठी सगळ्याच गोष्टी पुढे ढकलत आहेत किंवा मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊन आपली नौका पार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपच्या दृष्टीने ही लोकसभा फार महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदींना यावेळी चारसो पार करून आपली प्रतिमा उंचवायची आहे. तसेच लोकसभेत भाजपला जितक्या जास्त जागा मिळतील तितकी त्यांची राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्थिती मजबूत होणार आहे, पण जर लोकसभेत स्थिती खालावली तर मात्र विधानसभा निवडणुकीतही भाजपची स्थिती अवघड असेल. त्यामुळे भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीत सगळी ताकद पणाला लावत आहेत.
कारण त्यांची सगळी भिस्त ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. त्याचसोबत भाजपसोबत आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे नवीन भागीदार आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत जागा द्याव्या लागणार आहेत, पण त्याचसोबत भाजपला आपला वरचष्मा ठेवावा लागणार आहे. कारण भाजपने राज्यात सत्ता आणली तरी त्यांचा मुख्यमंत्री बनला नाही हे त्यांचे दु:ख आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुखासुखी मुख्यमंत्रीपद दिलेले नाही.
पण त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला नाही, तर विधानसभा निवडणुकीत त्यांचे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. त्यात पुन्हा बर्याच नेत्यांचा जीव महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गुंतला आहे. कारण दिल्लीत जाण्यापेक्षा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात त्यांना जास्त रस आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतात याची महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली आहे. कारण त्यातच अनेकांचे भवितव्य दडलेले आहे. सध्याचा कल पाहता नरेंद्र मोदींना लोकांचा प्रतिसाद मिळू शकला तरी महाराष्ट्रात आपले काय होणार याची चिंता महाराष्ट्रातील भाजपसह सगळ्याच पक्षांतील नेत्यांना आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. जो तो आपला तोल सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कारण कुणालाही पडायचे नाही, पण सगळेच काही जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसेल यात शंका नाही.
मोदींच्या बळावर आपल्याला लोकसभा जिंकता येईल असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात आपले काय होणार याची धाकधूकही त्यांच्या मनात आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याचा भाजपविषयीचा राग लोकांच्या मनात आहे. मुख्य पक्षातून बाहेर पडल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर लोकांची नाराजी आहे. दुसर्या बाजूला काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची राष्ट्रवादी हे सध्या दुर्बल स्थितीत असल्यामुळे आपले काय होणार याची त्यांनाही चिंता आहे. थोडक्यात काय तर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय होणार हे ठरवणार आहे.