Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें //
अर्जुना, तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास हे त्रैलोक्यही अल्प दिसू लागते. तुझा पराक्रम इतका मोठा आहे.
तो तूं कीं आजि एथें । सांडूनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी //
तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस!
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी?//
अर्जुना, तू विचारी आहेस, तथापि करुणेने तू दीन होतोस! पण अरे, अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का, सांग बरे?
ना तरी पवनु मेघासी बिहे? कीं अमृतासी मरण आहे? | पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें? //
किंवा वार्‍यास मेघाचे भय कधी वाटले आहे? अथवा अमृतास कधी मरण आहे? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे?
कीं लवणेंचि जळ विरे? | संसर्गें काळकूट मरे? | सांग पां महाफणी ददुरें | गिळिजे कायी? //
अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे? किंवा काळकूट विष हे दुसर्‍याच्या संसर्गाने मेले आहे? अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे?
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि के जाहला? | परी तो त्वां साच केला । आजि एथ //
बरे, कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधी तरी घडल्या आहेत का? पण त्या तू येथे आज खर्‍या करून दाखविल्यास!
म्हणौनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना। वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई //
म्हणून अर्जुना, तू या मोहाला आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. मनास त्वरित धीर देऊन सावध हो.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -