घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आपुली तहान भूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें । तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करी ॥
किंवा आपली तहान भूक न जाणता आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भाव मजवर टाकला आहे, त्यांच्या सर्व इच्छा मीच पूर्ण करतो.
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सूयें ॥
त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली, तर मी त्यांचे तेच कौतुक पुरवितो किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील, तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करितो.
ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागे तयां देवों । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करीं ॥
याप्रमाणे ते आपल्या मनात जी जी इच्छा करितात, ती ती वारंवार मला पुरवावी लागते आणि जे त्यांना दिलेले असते, त्याचे रक्षणही मीच करितो.
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचिया सर्वभावां । आश्रयो मी ॥
हे पांडवा, ज्याचा सर्व भाव मजवरच असतो, त्यांचा योगक्षेम मजवरच पडतो.
आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जे अग्निइंद्रसूर्यसोमाये । म्हणौनि यजिती ॥
आता आणखीही संप्रदाय आहेत, पण ते मला सर्व व्यापकरूपाने जाणत नाहीत, म्हणून ते अग्नी, इंद्र, सूर्य, चंद्र यांना भजतात.
तेही कीर मातेंचि होये । कां जें हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषमे पडे ॥
त्यांचे ते पूजन खरोखर माझेच होय. कारण या सर्व जगात मीच भरून राहिलेला आहे, परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -