घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें अमूर्तीं तियें विशुद्धें । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥
त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मांत प्रकृती-अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात.
पैं निर्विकल्पाचिये बरडीं । फुटे आदिसंकल्पाची विरूढी । आणि तें सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांच्या ॥
परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत, मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर निर्माण होऊन, त्याला लागलीच ब्रह्मांडाचे पुष्कळ धोंडे (आकार) उत्पन्न होतात.
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवा ॥
प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे असे दिसते; आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात व जातात याची गणना करता येत नाही.
मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥
मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आदिसंकल्प निर्माण होतात. असो; अशा रीतीने सुष्टीचा विस्तार होतो.
परि दुजेनविण एकला । परब्रह्मींचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥
परंतु दुसर्‍या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते.
तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे । पाहातां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥
त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना कारण नसता उगीच होऊन त्यात अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही, परंतु पाहू गेले असता लक्षवधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -