घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥
किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, अथवा पुष्कळ किरणे दृष्टीस पडली तरी ती जशी एकाच सूर्याची असतात.
तेवीं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥
त्याप्रमाणे अनेक व्यक्ती असून जरी त्यांची नावे व स्वभाव भिन्न आहेत, तरी भिन्नभिन्न भूतांमध्ये अभिन्न जो मी त्या मलाच जाणतात.
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणौनि ॥
हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते वेगळी आहेत, असे जाणून जे उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्नभाव उरत नाही.
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥
किंवा जेव्हा व ज्या ठिकाणी ते जी जी वस्तू पाहतात. त्यात माझ्यावाचून दुसरे काही नाही, असा ज्याच्या मनाचा निश्चय असतो.
पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजीं ॥
हे पाहा-पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो, तिकडे त्याला एक पाणीच आहे, मग तो नाहीसा झाला अथवा राहिला तरी तो पाण्यातच असतो.
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले । आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥
किंवा वार्‍याने मातीचे कण उंच उडाले तरी त्यांना काही पृथ्वीपणाहून वेगळे केले नाही आणि पुन्हा जरी ते खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -