बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. आपले बोल्ड फोटो टाकून ती अनेकदा नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत असते. मात्र काही दिवसांपूर्वी इराने ती मानसिक तणावातून गेली असल्याचा खुलासा केला होता. १० ऑक्टोबर रोजी World Mental Health Day च्या निमित्त इराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने चार वर्षांपासून डिप्रेशनचा सामना केला असल्याचे सांगितले होते. मानसिक आजारावर तिने उपचार घेतले असून ती आता बरी झाली आहे. त्यातच आता तिने आणखी एक व्हिडिओ अपलोड करत मोठा खुलासा केला आहे.
इराने तिच्या इन्स्टाग्रामवर काल (दि. १ नोव्हेंबर) एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटनांबद्दल खुलासा केला आहे. लहानपणापासून कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला रडावे लागले तर कोणत्या गोष्टीमुळे मनाला आधार मिळाला, अशा काही गोष्टींचा ऊहापोह तिने या व्हिडिओत केला आहे. तसेच आई-वडीलांच्या घटस्फोटावर देखील तिने भाष्य केले आहे. मात्र १४ व्या वर्षी माझ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासाही इराने केला आहे.
इराने सांगितले की, जेव्हा ती १४ वर्षांची होती, तेव्हा तिचे शारीरिक शोषण केले गेले. त्यावेळी अत्याचार करणारा व्यक्ती नक्की काय करतोय? हे मला माहीत नव्हते. मात्र एका वर्षांनंतर इराला समजले की, त्या व्यक्तीचा उद्देश आपले शोषण करणे होता. धक्का बसलेल्या इराने नंतर आपल्या आई वडीलांशी याबाबत चर्चा केली आणि हळुहळु त्या धक्क्यातून ती सावरली. पण मी असे होऊच कसे दिले? याचा विचार करुन करुन तिचा आजही मनस्ताप होतो, असेही तिने व्हिडिओमध्ये सांगितले.
या व्हिडिओच्या शेवटी इराने सांगितले की, मला अनेकजण विचारतात की मी डिप्रेशनमध्ये का आहे? इराच्या मतानुसार घटस्फोट होऊन देखील वडील आमिर खान आणि तिच्या आईमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. माझा मित्र परिवार चांगला आहे. पैशांची काही चणचण नाही, तरिही मी डिप्रेशनमध्ये का आहे? याचे उत्तर तिला स्वतःला माहीत नाही, असेही इरा म्हणते.