घरमनोरंजनकिरणबाला सचदेव उर्फ तबस्सुम- अबाधित स्मितहास्य !

किरणबाला सचदेव उर्फ तबस्सुम- अबाधित स्मितहास्य !

Subscribe

वयाची पन्नाशी पार केलेला क्वचितच कुणी सिनेरसिक असेल ज्याला ‘तबस्सुम’ माहिती नाही. तिच्या चुणचूणीत व्यक्तित्वाला लाभलेला तिचा गोल-गोंडस चेहरा, तिच्या आवाजातील मिठास आणि तिने सांभाळलेला भाषेचा लहेजा या सार्‍या तिच्यातील खुबी !… नावाला अनुरूप असं व्यक्तिमत्व क्वचितच आपल्याला पाहायला मिळते. तबस्सुम या नावाचा अर्थ होतो ‘स्मितहास्य’. आज ते स्मितहास्य पंचतत्वात विलीन झालेले आहे.

तबस्सुमचे मूळ नाव किरणबाला सचदेव. तबस्सुमच्या या दोन्ही नावांबद्दल असे म्हटले जाते की, तिचे वडील अयोध्यानाथ सचदेव, जे एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई असगरि बेगम या पत्रकार व लेखिका होत्या. या दोघांचाही आंतरधर्मीय विवाह झाला होता. तबस्सुमचा जन्म झाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांच्या धर्मांचा विचार करून तिची नावे ठेवली. वडील ‘तबस्सुम’ म्हणायचे, तर आई ‘किरणबाला’ म्हणायची. म्हणजे एकूणच पाहता तबस्सुम ही गंगा-जमुनी परंपरेचे प्रतीक होती असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

1944 मध्ये मुंबईमध्ये जन्म झालेली तबस्सुम जात्याच हरहुन्नरी होती. रुपेरी पडद्यावर एक बालकलाकार म्हणून तिची सुरुवात झाली. बेबी तबस्सुम या नावाने ती प्रसिद्ध झाली. 1947 ला ‘नरगिस’ या चित्रपटातून तिला बालकलाकाराची भूमिका मिळाली . एका रात्रीत प्रसिद्ध झालेली बेबी तबस्सुम त्या काळातील सर्वात प्रसिद्ध बालकलाकार होती. असे म्हटले जाते की, पोस्टरवरील तिचा फोटो पाहूनच प्रेक्षक तिचा चित्रपट पाहायला येत असत. यानंतर मेरा सुहाग, मझधार, बडी बहन, सरगम, छोटी भाभी, दीदार अशा वेगवेगळ्या वीस चित्रपटांमधून बेबी तबस्सुम ने काम केले. ‘बैजू बावरा’ चित्रपटात तिने मीनाकुमारीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्या काळात गाजलेले ‘ बचपन के दिन भुला ना देना…’ हे हिंदी गाणे तबस्सुमवर चित्रीत करण्यात आले होते. धर्मपुत्र, फिर वही दिल लाया हूँ, गंवार, बचपन, जॉनी मेरा नाम, गॅम्बलर, मुगल- ए- आजम आणि अगदी ऐंशीच्या दशकामध्ये ‘चमेली की शादी’ या चित्रपटांतून तबस्सुम रुपेरी पडद्यावर दिसली.

बालकलाकार म्हणून पडद्यावर चमकलेली बेबी तबस्सुम पुढे मोठी हिरोईन होईल असे अनेकांना वाटले होते. परंतु तसे झाले नाही कारण ज्याला ‘हिरोइन मटेरियल’ असे म्हटले जाते, असे तिच्या चेहऱ्यामध्ये काहीच नव्हते. पण तरीही तबस्सुमचे भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळे योगदान आहे. दूरदर्शनवरील सर्वात पहिला टॉल्क शो ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ तबस्सुमला मिळाला. तिथून पुढे एक वेगळी मुलाखतकार तबस्सुम सर्वांना पाहायला मिळाली. हा कार्यक्रमाच तब्बल 21 वर्षे दूरदर्शनवर चालला. या दरम्यान तबस्सुम ने भारतीय चित्रपट सृष्टीतील कित्येक फिल्मी हस्तींच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी निर्मात्यांच्या मनात आलेला ‘फुल खिले है… ‘ हा पहिलाच प्रयोग होता. प्रत्यक्ष फिल्मी कलावंतांना स्टुडिओमध्ये बोलवून, त्यांना बोलते करणे हे खूप मोठे आव्हान होते. तबस्सुमची त्यासाठी निवड झाली आणि चुणचूणीत तबस्सुमने ते आव्हान सहज पेलले. वहिदा रहमान, नर्गिस, दिलीप कुमार, अशोक कुमार, जीवन, दुर्गा खोटे, कामिनी कौशल, सुनील दत्त असे न जाणे कित्येक लिजेंड्स तबस्सुमने बोलते केले. तिच्या मुलाखतीमध्ये समोरच्याला कम्फर्टेबल करण्याचे कसब होते. त्यामुळे कळत-नकळत समोरचा कलाकार पटकन तिच्याजवळ आपले मन मोकळे करताना आपण दूरदर्शनवर पाहिले आहे. मुलाखत घेण्याची तिची स्वतःची एक वेगळी शैली तिने विकसित केली. असे म्हटले जाते की, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अनेक चित्रपट कलावंत तिच्या मुलाखतीसाठी स्वतःहून उत्सुक झाले. तबस्सुमने या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. कलाकारांच्या तारखा मिळवून लाईनअप् करणे, त्यांच्यासोबत काय संवाद साधायचा आहे, याची स्क्रिप्ट तयार करणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखती घेणे या सर्व गोष्टी ती एकटी पार पाडायची. याबद्दल तबस्सुम ने सांगितले होते, “ आम्ही तीस मिनिटांचा सिंगल ट्रॅक शूट करायचो. आमच्याकडे त्यावेळी ‘कट’ ही संकल्पनाच नव्हती. ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा एक सिंगल वन वुमन शो होता. तिथे कोणत्याही प्रकारची प्रोडक्शन टीम नव्हती. शो चा संपूर्ण रिसर्च मी एकटीच करायचे.” दूरदर्शनला प्रसिद्धी मिळवून देण्यात तबस्सुमच्या ‘फुल खिले है… ‘ या कार्यक्रमाचे योगदान होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

- Advertisement -

तबस्सुमचे बोलके व्यक्तिमत्व आणि तिच्यातील जिवंतपणा याचाच प्रभाव म्हणून अनेक मोठे कलाकार, तिला त्यांच्या परदेशात होणाऱ्या स्टेज शोमध्ये घेऊन जाऊ लागले. मधल्या काळात १९८५ च्या दरम्यान तबस्सुम ने लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले. त्यावेळी ‘तुम पर हम कुर्बान’ या चित्रपटाची निर्मिती तिने केली होती. त्यात तिचा स्वतःचा मुलगा होशांग गोविल याला नायकाच्या भूमिकेत घेतले होते. दुर्दैवाने तो या क्षेत्रात तरला नाही. मात्र प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यालाही तिने याच चित्रपटात सर्वात पहिली संधी दिली होती. 2009 मध्ये होशांगची मुलगी, म्हणजे तबस्सुमची नाती खुशी हिला घेऊन ‘हम फिर मिले ना मिले’ या चित्रपटाची निर्मितीही तिने केली होती. याही पलीकडे जाऊन तबस्सुमने ‘गृहलक्ष्मी’ या हिंदी मासिकाचे पंधरा वर्षे संपादकपद सांभाळले. ती हिंदी चित्रपटांच्या सुवर्णयुगाची माहिती देणारा ‘अभी तो मै जवान हूँ ’ हा कार्यक्रम टीव्ही एशिया, यु.एस. ए. व कॅनडासाठी सादर करत असे.

तबस्सुम एक अशी कलाकार होती जिने मनोरंजन क्षेत्रातील जवळजवळ प्रत्येक फॉर्ममध्ये कुशलतेने काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांमध्ये ती युट्यूबवर ‘तबस्सुम टॉकीज’ या शोमधून संवाद साधत होती. तिच्या युट्यूब चॅनेलला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चॅनेलचे जवळजवळ साडे सात लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. या कार्यक्रमात चित्रपट सृष्टीतील अनेक नव्या-जुन्या, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या नायक-नायिकांबद्दल ती बोलत होती. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील समस्या, आव्हाने याचाही ऊहापोह ती करत होती. तिची त्यांच्याबद्दलची कळकळ त्यातून दिसायची. बऱ्याचदा तर तिच्या संवादातून असे जाणवायचे की, ती त्या कलावंतांच्या कुटुंबातलीच एक आहे. अनेक वर्षे मुलाखतींच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंतांसोबत तिचे ऋणानुबंध जुळले होते.

तिचा हसतमुख चेहराच आजपर्यंत चाहत्यांनी पाहिला आहे. ते हास्य त्यांच्या तसेच लक्षात राहावे, म्हणून मृत्युपश्चात अंत्यविधीनंतरच लोकांना तिच्याबद्दल कळावे अशी तबस्सुमचीच अंतिम इच्छा होती. त्यानुसार अंत्यविधीपश्चात तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी, तिने घेतलेला जगाचा निरोप घोषित केला. किरणबाला सचदेव उर्फ तबस्सुमच्या आता फक्त आठवणीच उरलेल्या आहेत. बाकी वेबदुनियेच्या माध्यमातून तबस्सुम अबाधितच राहिल !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -