मिर्झापूरच्या खासदारांची Mirzapur 2 वर बंदी घालण्याची मागणी

mirzapur mp anupriya patel
मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध Mirzapur 2 Web Series ही प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आधी ट्विटरवर #BycottMirzapur हा ट्रेंड चालविण्यात आला होता. त्यानंतर आता खुद्द मिर्झापूरमधूनच याविरोधात आवाज उचलण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी मिर्झापूर वेब सीरीजवर आक्षेप नोंदविला आहे. पटेल म्हणाल्या की, या सीरीजमध्ये मिर्झापूर जिल्ह्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. मात्र यामुळे जिल्ह्याचे नाव संपुर्ण देशात खराब होत आहे. पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील आपल्या ट्विटमध्ये टॅग करुन या सीरीजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अनुप्रिया पटेल या भाजपच्या खासदार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापूरचा विकास होत आहे. मिर्झापूर हे समरसतेचे केंद्र आहे. मात्र Mirzapur 2 Web Series मध्ये या जिल्ह्याला हिसेंचे केंद्र दाखवून बदनामी केली जात आहे. तसेच या सीरीजमुळे जातीय वैमनस्य देखील वाढत आहे. मिर्झापूर जिल्ह्याची खासदार या नात्याने माझी मागणी आहे की, या सीरीजची चौकशी झाली पाहीजे.”

मिर्झापूरचा दुसरा सीझन २२ ऑक्टोबर रोजी रात्री रिलीज करण्यात आला होता. याचा पहिला सीझन नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. मिर्झापूरच्या स्थानिक भाषेचा लहेजा, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि संवादफेक, हिंसा, लैंगिक दृश्यांचा भडिमार यामुळे पहिल्या सीझनमध्येच मिर्झापूरचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यामुळे चाहते दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते. मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, दिव्येंदू शर्मा, अली फजल, व्रिकांत मेसी, श्वेता त्रिपाठी आणि कुलभूषण खरबंदा यांची अदाकारी पाहायला मिळते.