घरमनोरंजनगली बॉय

गली बॉय

Subscribe

गटारगल्लीत हरवलेल्या स्वप्नांचा नव्याने शोध

रणवीर सिंगच्या अभिनयातली एनर्जी हा बॉलिवूडमधल्या कौतुकाचा विषय झालाय. चित्रपटात या एनर्जीला मनात दबलेल्या स्फोटापूर्वीच्या तणावात त्यानं रुपांतरीत केलं आहे. ढसाळ, मंटो, नारायण सुर्वे यांच्या लेखनातील या घुसमटीने मराठी साहित्य आणि समीक्षकांना आणि त्याच त्या स्वप्निल जगात रमणार्‍या साहित्य रसिकांनाही केस ओढून ६० ते ७० च्या दशकांत जागं केलं होतं. हे जागलेपण समांतर सिने चळवळीनिमित्ताने पडद्यावरही दाखल झालं होतं. आज समांतर किंवा कल्ट किंवा व्यावसायिक सिनेमा असं काही राहिलेलं नाही. मानवी जगण्याच्या वास्तववादी पैलूंना व्यावसायिक कथानकाचा मुलामा देऊन सादर करण्याची पद्धत मागच्या २० वर्षांत बर्‍यापैकी रुजली आहे. ‘गली बॉय’ हा त्याच्या पुढचे पाऊल म्हणावे लागेल.

‘सलिम लंगडे पत मत रो’ आणि ‘धारावी’ हे दोन चित्रपट हिंदी पडद्यावर येऊन आता अडीच दशकांपेक्षा मोठा काळ लोटला आहे. यातल्या कामगार वर्गाची वेदना, त्यांच्या जगण्यात आजच्या अत्याधुनिक मानल्या जाणार्‍या जगातही बिलकूल फरक पडलेला नाही. वेळ तिथंच थांबलेली आहे. स्वप्नांची धूसर रेषा वास्तवाच्या अंधारकोठडीत आजही तशीच दिसेनाशी आहे. ‘गली बॉय’ पहाताना काळाच्या या दरीतील अंधार कायम असल्याचं स्पष्ट होतं. कथानक मुंबईतल्या धारावीतलं असतं. वांद्य्रातला बेहराम पाडा, धारावी, वांद्य्राहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाताना लोकलच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त सांडलेल्या झोपड्यांचं हे शहर आजही तस्सच आहे. त्याच नाकर्त्या, हरवलेल्या विखुरलेल्या जगण्याला नकार देणारं बंड म्हणजे ‘गली बॉय’ चित्रपट. नागराजच्या फँड्रीचं जगण्याची आपण दखल घेऊन अरेरे च्चच्च..हे काय पाहतोय आपण? असे सोयीस्कर आपल्या हतबलतेचे निःश्वास ढाळले होते. त्याच अर्थाने ‘गली बॉय’ मधला मुराद हा शहरातला जब्या आहे. उपेक्षितांचं प्रतिनिधीत्व करणार्‍या या दोन्ही नायकांच्या जगण्यातली वेदना सामाईक आहे. जरी संदर्भ वेगळे असले तरीही. त्यामुळे खान मंडळींच्या तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या स्वित्झर्लंडच्या स्वप्नांनी व्यापलेल्या हिंदी पडद्याला ‘गली बॉय’च्या निमित्ताने दिग्दर्शक झोया अख्तरने धारावीच्या झोपडपट्टीत आणून पुन्हा खडबडून जागं केलं आहे.

- Advertisement -

रणवीर सिंगच्या अभिनयातली एनर्जी हा बॉलिवूडमधल्या कौतुकाचा विषय झालाय. चित्रपटात या एनर्जीला मनात दबलेल्या स्फोटापूर्वीच्या तणावात त्यानं रुपांतरीत केलं आहे. ढसाळ, मंटो, नारायण सुर्वे यांच्या लेखनातील या घुसमटीने मराठी साहित्य आणि समीक्षकांना आणि त्याच त्या स्वप्निल जगात रमणार्‍या साहित्य रसिकांनाही केस ओढून ६० ते ७० च्या दशकांत जागं केलं होतं. हे जागलेपण समांतर सिने चळवळीनिमित्ताने पडद्यावरही दाखल झालं होतं. आज समांतर किंवा कल्ट किंवा व्यावसायिक सिनेमा असं काही राहिलेलं नाही. मानवी जगण्याच्या वास्तववादी पैलूंना व्यावसायिक कथानकाचा मुलामा देऊन सादर करण्याची पद्धत मागच्या २० वर्षांत बर्‍यापैकी रुजली आहे. ‘गली बॉय’ हा त्याच्या पुढचे पाऊल म्हणावे लागेल.

मुंबईतल्या उपेक्षितांच्या वस्त्यांमध्ये खोपटवजा झोपड्यातील कोंदट घरात दिवस ढकलत जगणारी मानवी वेदना नवी नाही. ही परेशानी, घुसमट, सोसलेपण माणसाच्या माणूस म्हणून जगण्याचं भेसूर विडंबन आहे. १९७८ मध्ये आलेल्या गमनमध्ये हेच हतबल सोसलेपण होतं. त्याची कारणं शहरयारने ‘ सिने में जलन..आखों में तूफान सा क्यूं है…इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ हैं’ असा प्रश्न विचारून शोधण्याचा प्रयत्न केला. ‘गली बॉय’मधला मुराद शेख ( रणवीर सिंग) हा कॉलेजवयीन तरुणही स्वतः रचलेल्या रॅप गाणी कवितेतून हाच प्रश्न नव्याने विचारतो. त्याच्या बापाने लग्न करून नवी आई घरी आणली आहे. तर रणवीरची पहिली आई रजिया (अमृता सुभाष) ही उपेक्षितांच्या वस्तीतल्या उपेक्षित कुटुंबातली उपेक्षितांहूनही उपेक्षित बाई आहे.

- Advertisement -

चित्रपटाचा पूर्ण पडदा हा अशा सोसलेपणाने व्यापलेला आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनात झोया अख्तर, रिमा कागती, विजय मौर्य अशी संवेदनशील लेखकांची नावं असल्यानंतर पडद्यावर साकारलेला ‘गली बॉय’ खूपच ‘त्रासदायक ’ ठरतो. एरवी करन जोहर किंवा तत्समांच्या हिंदी पडद्यावर दिसणार्‍या सुखवस्तू कुटुंबासारखं हे कुटुंब नाही. इथल्या माणसांना जगण्याच्या मर्यादा आहेत, भीती आहे. इथल्या माणसांना पोट आणि शरीराची भूक आहे. पूर्ण होत नसलेल्या या अनिवार इच्छांची दाटी झाल्यानं झोपडपट्टीतल्या घरासारख्याच या माणसांचं जगणंही एक कोंडवाडा झालं आहे. ही घुसमट रणवीरने ज्या खुबीने डोळ्यांतून उभी केलीय ती कौतुकास्पद आहे.

सर्व बाजूंनी होणारी ही घुसमट तो आपल्या रॅपवजा कवितांमधून फोडतो. मग टॅक्सी ड्रायव्हरचं काम करताना हातात स्टेअरिंग असतानाही त्याच्या डोक्यात नामदेव ढसाळसारखी हीच कविता आहे. ही कविता त्याला जगू देत नाही. त्यात अंगार, उद्वेग, एल्गार आहे. यू ट्यूबवर आपल्या रॅपरुपी कविता अपलोड केल्याने त्याचं नाव मोठं होतंय. त्याची वेदना त्याच्यासारख्या इतरांनाही आपलीशी वाटतेय. यातूनच आपलं हरवलेलं जगणं पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्याने केलेली धडपड म्हणजे ‘गली बॉय’ चित्रपट. त्याच्या कविता या घुसमटीतून त्याची सोडवणूक करतात का? याचं उत्तर पडद्यावर पाहायला हवं.

मनात मुरादची मुराद जपणारी सफीना अली (आलिया भट्ट) ने सहज अभिनयातून उभी केलीय. मुराद आणि सफीना दोघांमधली आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील दरी दोघांच्या संवादातून जाणवत राहते. मुंबईतल्या गल्लीबोळात तरुण टोळक्यांकडून नियमित वापरल्या जाणार्‍या शब्दांनी संवादाचे रुप घेतले आहे. त्यामुळे ‘गली बॉय’ प्रभावी झालाय. अमृता सुभाषने उभी केलेली रजिया आणि तिचा नवरा आफताब (विजय राज) ही माणसं नैतिक, अनैतिकतेच्या सामाजिक, कौटुंबिक गरजेचं प्रतिनिधीत्व करतात. थोडक्यात इतक्या वर्षांनंतरही ‘गली बॉय’चा उपेक्षित विषय पडद्यावर मांडण्याचं धैर्य दाखवणार्‍या निर्माता फरहान अख्तरचं कौतुक करायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -