घरमनोरंजन'सिंघम' आणि 'संजू' येणार ८ वर्षांनी एकत्र!

‘सिंघम’ आणि ‘संजू’ येणार ८ वर्षांनी एकत्र!

Subscribe

अभिनेता अजय देवगण आणि रणबीर कपूर यांच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे.

बॉलीवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर सध्या लाईम लाईटमध्ये आहे. ‘संजू’ चित्रपटामध्ये रणबीरने केलेल्या दमदार अभिनयाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मात्र, आता रणबीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते त्याच्या नव्या चित्रपटामुळे.  या नव्या चित्रपटामध्ये रणबीरसोबत अभिनेता अजय देवगणही काम करणार आहे. या निमित्ताने बॉलीवूडचा सिंघम आणि संजू यांना एकत्र काम करताना पाहायला मिळेल.नुकतीच सोशल मीडियाद्वारे या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले, तरी दोन्ही अभिनेत्यांचे चाहते या बातमीमुळे खुष झाले असणार हे नक्की.

- Advertisement -

८ वर्षांनी पुन्हा एकत्र

या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि अजय देवगण तब्बल ८ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. याआधी ‘राजनीती‘ चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. दिग्दर्शक लव रंजन या दोन आघाडीच्या हिरोंना एकत्र घेऊन हा चित्रपट बनवत आहेत. लव रंजन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याबद्दल जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी रणबीर आणि अजयसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. दिग्दर्शक रंजन यांनी ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ हे दोन सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहे. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची आणि विशेषत: तरुण वर्गाची भरभरुन पसंती मिळाली होती. त्यामुळे रंजन घेऊन येत असलेल्या या नव्या चित्रपटाची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

दरम्यान चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले नसले तरी रंजन यांनी त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजय आणि रणबीर यांचा हा चित्रपट २५ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार असल्याचं, रंजन यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या सिनेवर्तुळात आणि चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत चर्चा होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -